फादर स्टिफन्सने ‘ख्रिस्तपुराण’ ही थेट ज्ञानेश्वर, एकनाथ यांच्यासारख्या महाराष्ट्रातील संतकवींच्या लेखनशैलीप्रमाणे ओवीबद्ध प्रासादिक मराठीत केलेली ग्रंथरचना अचंबित करणारी आहे. स्टीफन्सने हिंदू पुराणांचा अभ्यास करून निर्माण केलेल्या या मराठी महाकाव्यात ११,००० श्लोक आणि चार अध्याय असून १९३० सालापर्यंत गोवा आणि महाराष्ट्रातल्या बहुतेक चच्रेसमध्ये त्याचे नियमितपणे गायन-वाचन होत असे. पुढे या ख्रिस्तपुराणाचे अनुवाद निरनिराळ्या भारतीय भाषांमध्येही झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टिफन्सने ३९ वर्षे गोव्यात आणि एक वर्ष वसईत वास्तव्य केले. तो जरी एक ख्रिस्ती मिशनरी म्हणून भारतात आला, तरी त्याने गोव्यातल्या स्थानिक लोकांची जीवनशैली, संस्कृती, भाषा आणि धर्मग्रंथाचा अभ्यास करून त्यातल्या अनेक गोष्टींचा स्वीकार केला. त्यामुळेच स्टीफन्सचे मराठी ख्रिस्तपुराण आणि तत्कालीन हिंदू पुराणग्रंथांच्या लेखनशैलीत कमालीचे साम्य आढळते.

‘ऐसी कथेची वित्पत्ति।

ऐका जे सांगितले अल्पमति!

ते ख्रिस्तदासु करी विनंति।

खेमा किजे अग्क्यानाथें॥ १२३॥’

ख्रिस्तपुराणातील वरील पंक्तींमधून असे दिसते की स्टिफन्स स्वत:चा उल्लेख ‘ख्रिस्तदास’ असा करीत होता. त्याच्या गोव्यातल्या वास्तव्यात स्टिफन्स मडगांव, लोटली, नावेली आणि सालसेट येथे धर्मोपदेशक म्हणून कार्यरत होता. स्टिफन्सने लिहिलेल्या इतर ग्रंथांपैकी ‘दौत्रिना क्रिस्तां’ म्हणजे ख्रिस्ती धर्म-सार हा गोव्याच्या बोली भाषेत म्हणजे कोकणीत लिहिलेला ग्रंथही विख्यात आहे. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात लिहिलेले हे पुस्तक विशेषत: मुलांसाठी लिहिले असून १६२२ साली प्रथम रायतूरच्या जेसुइट कॉलेजमध्ये छापले गेले. अवघ्या ६४ पानांचे हे पुस्तक, कोंकणी भाषेतली पहिली ग्रंथनिर्मिती म्हणून ओळखली जाते. सध्या या पुस्तकाची एक प्रत लिस्बनच्या सरकारी ग्रंथालयात आणि दुसरी प्रत व्हॅटिकन येथील ग्रंथालयात आहे.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father thomas stephens study and style
First published on: 20-02-2018 at 02:57 IST