डॉ. विनायक पांडुरंग सुतार
आपल्या शरीरातील पेशीत आढळणारा डीएनए हा प्रचंड माहितीचा संग्रह आहे. आपली उंची किती असेल, डोळ्यांचा रंग कसा असेल, आपल्याला कोणते आजार होऊ शकतात, यांसारख्या असंख्य गोष्टींची माहिती जनुकांच्या रूपात डीएनएमध्ये लपलेली असते. या पूर्ण माहितीच्या संचाला ‘जीनोम’ असे म्हणतात. ही माहिती ‘ए’, ‘टी’, ‘जी’ व ‘सी’ या न्युक्लिओटाईडच्या विशिष्ट क्रमात सांकेतिक भाषेत साठवली जाते; त्या विशिष्ट क्रमाला त्या सजीवाचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ म्हणतात. जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये ‘ए’, ‘टी’, ‘जी’ व ‘सी’ या चार अक्षरांचा क्रम अचूकपणे शोधला जातो. आंतरराष्ट्रीय मानव जीनोम प्रकल्पाची सुरुवात १९९० मध्ये झाली. तो २००३ मध्ये पूर्ण झाला. मानवाच्या जीनोममधील ३ अब्जाहून अधिक ए, टी, जी व सी या अक्षरांचा क्रम शोधण्यात आला.
जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आधुनिक अशी ‘नेक्स्ट जनरेशन सिक्वेन्सिंग’ पद्धती सध्या सर्वाधिक वापरली जाते. यामध्ये एकाच वेळी लाखो डीएनए तुकड्यांचे वाचन केले जाते. यामुळे संपूर्ण जीनोमचे वाचन कमी वेळात व कमी खर्चात शक्य होते. जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये रक्त, थुंकी किंवा इतर ऊतक असे जैविक नमुने वापरले जातात. त्यातून डीएनए वेगळा केला जातो. हा डीएनए खूप मोठा असल्याने एकाच वेळी सलग वाचता येत नाही; म्हणून त्याचे छोटे-छोटे तुकडे करून खास इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये (सिक्वेन्सर) घातले जातात. हे यंत्र प्रत्येक तुकड्यातील ए, टी, जी व सी अक्षरांचा क्रम वाचते. त्यानंतर संगणक या सर्व तुकड्यांची माहिती एकत्र करून संपूर्ण डीएनए म्हणजेच जीनोम तयार करतो. एक उदाहरण घेऊ या. समजा, आपल्याकडे एक खूप जुने गोष्टीचे पुस्तक आहे, पण त्याची पाने फाटली आहेत आणि एकत्र नाहीत. त्यातील गोष्ट आपल्याला वाचायची आहे, आपण प्रत्येक पान जुळवत जातो, वाचत जातो आणि पूर्ण गोष्ट समोर येते. जीनोम सिक्वेन्सिंग प्रक्रिया याचसारखी आहे. डीएनएचे सर्व तुकडे वाचून संपूर्ण जीनोममध्ये लपलेली माहिती मिळवता येते.
जीनोम सिक्वेन्सिंगचा वापर करून आनुवंशिक रोग ओळखता येतात, बाळामध्ये आनुवंशिक दोष आहेत का हे गरोदरपणात किंवा त्याआधीच कळते. कोविड-१९ सारख्या विषाणूंचे जीनोम सिक्वेन्स करून लस तयार करण्यास मदत झाली. उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांचे आणि जनावरांचे जीनोम अभ्यासून त्यात सुधारणा करता येते. मानवाचे मूळ, स्थलांतर आणि वंशपरंपरा अभ्यासता येते. नवीन विषाणू ओळखण्यासाठी आणि त्यांच्या बदलत्या प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग अत्यावश्यक आहे.
डॉ. विनायक पांडुरंग सुतार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org