गोविंद शंकर कुरूप यांना त्यांच्या मल्याळम् काव्यसंग्रह- ‘ओट्क्कुणल’साठी १९६५चा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित भारतीय भाषेतील सर्जनात्मक साहित्यासाठी देण्यात आला. एक लाख रुपयांच्या या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून १९६८ मध्ये त्यांनी ‘ओट्क्कुणल’ पारितोषिकाची सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळमधील एर्नाकुलम् जिल्ह्य़ातील नायतोट या निसर्गसंपन्न गावी ३ जून १९०१ रोजी त्यांचा जन्म झाला. शंकर वारियर आणि वडक्कनी लक्ष्मीकुट्टीअम्मा यांचा हा मुलगा. वडिलांच्या अकाली निधनाने त्यांचे बालपण खडतरच गेले. मग मामाच्या देखरेखीखाली त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यांचे मामा प्रसिद्ध ज्योतिषी होते. व्यासंगी पंडित असल्याने त्यांच्या सहवासात सहजपणे त्यांना संस्कृतची आवड निर्माण झाली. वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत ‘अमरकोश’, ‘सिद्धरूपम्’, ‘श्रीरामोदन्तम्’ इ.ग्रंथ त्यांनी मुखोद्गत केले होते. ‘रघुवंशा’सारख्या महाकाव्याचे श्लोकही त्यांनी वाचले होते. इंग्रजी भाषा आणि साहित्याच्या अध्ययनामुळे त्यांना काव्य आवडू लागले. त्यातही केरळच्या निसर्गसंपन्न भूमीच्या आकर्षणामुळे ते कवी बनले. पुढे १९१८ मध्ये कुरूपजी मल्याळी साहित्यातील ‘पंडित’ ही परीक्षा उत्तीर्ण झाले.  १९२६ मध्ये मद्रास विश्वविद्यालयाच्या विद्वान परीक्षेत उत्तीर्ण झाले. १९३६ मध्ये एर्नाकुलम येथील महाराजा कॉलेजमध्ये मल्याळी आणि संस्कृत या विषयांचे लेक्चरर म्हणून त्यांची नेमणूक झाली. काही व्यक्तींना कुरूप पदवीधर नसताना कॉलेजमध्ये शिकवतात- हे आवडले नाही. त्यांनी कुरूप हे पक्के कम्युनिस्ट असून, इंग्रज सरकार व महाराज यांच्याविरुद्ध लोकांना भडकवण्याकरिता, क्रांतिकारी कविताद्वारे प्रेरणा देतात- अशी कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांची ‘नाल’ (भविष्यकाळ) ही कविता या तक्रारीचे कारण झाली होती. या कवितेत शोषणाविरुद्ध क्रांतिकारक संदेश होता व क्रांतिकारी तरुणांनी या कवितेची खूप प्रशंसा केली होती.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

प्रतिभावंत गणितज्ञ भास्कराचार्य

भास्कराचार्य या प्रतिभावंत गणितज्ञ-खगोलशास्त्रज्ञाचा जन्म १११४ साली झाला. ११४४ मध्ये त्यांनी ‘सिद्धांतशिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला. ‘मोजमापन’ संदर्भातील अभिनव पद्धती, विभिन्न एकके आणि यंत्रे यांची महत्त्वपूर्ण माहिती ‘सिद्धांतशिरोमणी’मध्ये आढळते.

‘सिद्धांतशिरोमणी’मधला ‘लीलावती’ हा प्रथम खंड ६००हून अधिक वष्रे भारतभर पाठय़पुस्तक म्हणून अभ्यासला गेला. त्यातले पहिलेच प्रकरण ‘परिभाषा’ म्हणजेच तत्कालीन एकके व त्यांची कोष्टके यासंबंधी आहे. अंतर मोजण्यासाठी ‘आठ यवांचे (एकमेकांना टेकवलेल्या आठ जवस दाण्यांचे) एक अंगुळ, २४ अंगुळांचा एक हात, चार हातांचा एक दंड, २००० दंडांचा एक कोस’ ही एकके, तर  घनफळासाठी ‘खारीचा १६वा भाग द्रोण, द्रोणाचा ४था भाग आढक, आढकाचा चौथा हिस्सा प्रस्थ आणि प्रस्थाचा चौथा भाग कुडव’ शिवाय ‘गुंजा- मासा- कर्ष- पल’ ही सोने तोलण्याची एकके, ‘कवडय़ा-काकिणी-पण-द्रम्म’ ही चलनातील एकके या प्रकरणात आहेत. गणिताध्याय या तिसऱ्या खंडात कालमापनाची एकके आहेत. पापणीच्या उघडझापीचा कालावधी म्हणजे ‘निमिष’, निमिषाचा ३०वा भाग ‘तत्पर’ आणि तत्पराचा १००वा भाग ‘त्रुटी’ हे कालाचे अतिसूक्ष्म एकक भास्कराचार्यानी ग्रहांची तात्कालिक गती काढण्यासाठी वापरले आहे.

कलनशास्त्राशिवाय गोलाचे घनफळ आणि पृष्ठफळ मोजण्याची रीतही भास्कराचार्य सांगतात. चिकणमातीचा गोल, त्या गोलाइतकाच व्यास आणि उंची असलेल्या पंचपात्रात चेपून बसवला, तर पंचपात्राचा १/३ भाग रिकामा राहतो. म्हणजेच गोलाचे घनफळ पंचपात्राच्या घनफळाच्या २/३ भाग भरणार. पृथ्वीचा परीघ मोजण्याची भास्कराचार्याची पद्धतही अभिनव आहे. एका रेखांशावरील वरच्या दोन शहरातले अंतर आणि त्यांच्या अक्षांशमधला फरक या गुणोत्तरास ३६०ने गुणल्यास पृथ्वीचा परीघ मिळेल, असे ते सांगतात.

खगोलशास्त्रीय निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांचीही माहिती भास्कराचार्य ‘यंत्राध्याय’ प्रकरणात देतात. ‘गोलयंत्र’ हे शैक्षणिक साधन, नाडीवलय म्हणजे सूर्यघडय़ाळ, सूर्याचा उन्नतांश काढण्यासाठी चक्र, चाप आणि तुरिया यंत्रे, तसेच भास्कराचार्यानी खास प्रयत्नपूर्वक बनवलेले फलक यंत्र, वस्तूची उंची शोधण्यासाठी धीयंत्र अशासारख्या यंत्रांची रचना व कार्यपद्धती या प्रकरणात आहे.

तांत्रिक गुंतागुंत नसलेली साधी यंत्रे आणि कल्पक गणितीपद्धती वापरून मोठे शोध लावणाऱ्या या प्रतिभावंत शास्त्रज्ञाला शतश: प्रणाम.

प्रा. माणिक टेंबे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Govind shankar kurup
First published on: 06-01-2017 at 05:46 IST