बहुतेकदा ज्या शेतकऱ्यांकडे शेती क्षेत्र जास्त आहे ते शेतकरी पारंपरिकरीत्या खुल्या वातावरणातच शेती करतात; परंतु ज्यांच्याकडे कमी क्षेत्र, कमी पाण्याची व्यवस्था आणि शेतमजुरांचा अभाव आहे, बिगरमोसमी व तांत्रिक पद्धतीने ज्यांना विविध पिके (फळे, फुले, भाजीपाला) घ्यावयाची असतात, ते शेतकरी आधुनिक पद्धतीने म्हणजेच वातावरण नियंत्रित शेती करतात. याच पद्धतीस हरितगृह किंवा शेडनेटमधील शेतीपद्धत म्हटले जाते.
हरितगृह उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, लागणारे साहित्य, येणारा खर्च, शासनाचे अनुदान, पीक रचना यांची संपूर्ण माहिती, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग यांच्यामार्फत प्रशिक्षणाद्वारे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर देण्यात येते. महाराष्ट्रामध्ये अवर्षण परिस्थिती लक्षात घेऊन व पाण्याची टंचाई गृहीत धरून बीड, जालना, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती, अहमदनगर, सोलापूर, सांगली, पुणे, जळगाव, धुळे, सातारा इत्यादी जिल्ह्यांमध्ये शेतकरी हरितगृहातील भाजीपाला पिके (ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची, काकडी, फुलकोबी, साधी मिरची, कलकत्ता पानवेल) तसेच फुलझाडे (कान्रेशन, जरबेरा, गुलाब, मोगरा, लिली इत्यादी फूलपिके) घेऊन अपेक्षित उत्पादन मिळवीत आहेत.
शेडनेट किंवा हरितगृह शेती ही नियंत्रित शेती आहे. म्हणजेच विविध पिकांचे प्रखर सूर्यकिरणांपासून रक्षण, सोसाटय़ाचा वारा, पाऊस, गारपीट यांपासून संरक्षण, कार्बन डायॉक्साइडच्या प्रमाणात वाढ, अतिनील किरणांपासून संरक्षण, कीडरोगांपासून संरक्षण व कमी मनुष्यबळ हे तांत्रिक मुद्दे या पद्धतीमध्ये आहेत. तांत्रिक दृष्टीने हरितगृहाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे वातावरण नियंत्रित हरितगृह. या प्रकारच्या हरितगृहामध्ये तापमान व आद्र्रता सूक्ष्म सिंचन तंत्र वापरून नियंत्रित केली जाते. या हरितगृहामध्ये वायुविजनाची सोय तसेच पंखे, पडदे आवश्यक असतात. हे हरितगृह पूर्णपणे बंद असते. हे हरितगृह उच्च प्रतीच्या फुलांसाठी व ऊतीसंवर्धनासाठी वापरले जाते. दुसरा हरितगृह प्रकार म्हणजे नैसर्गिक वायुविजन हरितगृह. यात नैसर्गिक वायुविजन असते. पिकांच्या आवश्यकतेनुसार तापमान, आद्र्रता, कार्बनडायॉक्साईड वायूचे प्रमाण राखता येते. शेडनेटसाठी कमीत कमी ५०० चौरसमीटर व जास्तीत जास्त ४००० चौरस मीटर क्षेत्राची मर्यादा आहे. यासाठी योग्य निकषानुसार उभारलेल्या शेडनेट हरितगृहासाठी शासनाच्या कृषी विभागातर्फे खर्चाच्या ५० टक्के अनुदान मिळू शकते.
–  सुधीर फडके (अहमदनगर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: कर्म
कर्म या शब्दाचे पन्नास अर्थ आहेत. त्यातले पहिले तीन अर्थ क्रिया, कार्य, कृत्य (Action, Work, Deed) असे दिले आहेत. एकंदरच कर्म या शब्दात काहीतरी घडणे अभिप्रेत आहे. विश्व ही एक घटनांची साखळी आहे आणि ती अव्याहत आहे, हे आपल्याला माहीत असते. माहीत नसते ते हे की ही साखळी जे पसरल्यामुळे सुरू होते ते ब्रह्म मात्र कर्मरहित असते. कारण ब्रह्मामध्ये ऊर्जेची समतुल्यता असते. समतुल्य संघांमधला सामना जसा बरोबरीत सुटतो, तसेच काहीतरी ब्रह्मात असते. काहीतरी घडण्यासाठी विषमता असावी लागते. उदा. उंचावरून पाणी खाली पडते किंवा अग्नीमधली ऊर्जा ज्वालेच्या रूपाने वर उफाळते. ब्रह्मातली समतुल्यता बिनसली तर अणुबॉम्बमध्ये समतुल्यता बिघडल्याने जसा स्फोट होतो, तसा स्फोट ब्रह्मात झाला असणार, असे पदार्थ विज्ञानाचे हल्लीचे गृहीतक आहे. या स्फोटामुळे जागा (आकाश) तयार होते. या आकाशात घडणाऱ्या घटनांमुळे वेळापत्रक सुरू होते. ब्रह्मात वेळ नावाची चीज नसते. भिंतीवरच्या घडय़ाळाचा लंबक एका ठरावीक तऱ्हेने हलतो, कारण त्याच्या मागची Spring एका विशिष्ट वेगाने उलगडते. हल्लीची आधुनिक घडय़ाळे Battery वर चालत असली तरी ती खरे तर Quartz नावाच्या एका धातूमधल्या अणूंच्या कंपनावर चालतात. बॅटरी फक्त त्या धातूला स्फूर्ती देण्याचे काम करते आणि त्या धातूला कामाला लावते. हे Quartz चे कर्मच असते, कारण इथे हालचाल असते ती मुळात ब्रह्मातून आलेली असते. ब्रह्मात स्फोट झाल्यावर दोन गोष्टी होतात. हालचाल आणि या हालचालीचे वेळापत्रक. त्याला कर्म आणि काळ म्हणतात. हालचाल हा शब्द बघा. हाल म्हणजे स्थिती. चाल म्हणजे गती. गतीमुळे स्थिती बदलते. त्याला स्थितीगतीचे विज्ञान म्हणतात. मूळ स्फोट होतो तेव्हा उष्णता जबरदस्त असते, अब्ज अब्ज अब्ज अणुस्फोटासारखी. मग परिस्थिती निवळते आणि वेग कमी होतो. उष्णतेचे प्रमाण घटते. स्फोटामधून निघालेले वेगवान तरंग स्थिरावतात. सुसाट वेगाने एकाच दिशेने भरकटण्याऐवजी गोलाकार ज्वालेसारखे फिरू लागतात. या ज्वालांमधल्या तरंगाचे रूपांतर घन पदार्थात होऊ लागते आणि ताऱ्यांचा जन्म होतो आणि पुढे ग्रह तयार होतात. उदा. आपला सूर्य आणि आपली पृथ्वी. या सगळ्या घटनांना आपल्यात वैश्विक कर्म म्हणतात. एक ओवी म्हणते.
‘इथे पाहुणा आला आहे। रस अद्भुत। शांतरसाच्या। घरात’
मुळात आठच रस होते. ज्ञानेश्वरांनी शांतरस नववा मानला आहे. तो अध्यात्माचा रस आहे. अध्यात्म म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो, त्याचा उद्गाता म्हणजे ब्रह्म (अधि आत्म) इथल्या समतुल्यतेमुळे सगळे शांत होते. नंतर विश्व निर्मितीची अद्भुतता प्रकट झाली.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com

Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

वॉर अँड पीस : महारोग : भाग ४
पथ्यापथ्य – १) मीठ वज्र्य, पापड, लोणचे खाऊ नये. दही, मासे, मिसळ पदार्थ, स्राव वाढविणारे पदार्थ खाऊ नयेत, भात शक्यतो टाळावा. २) अतिश्रम करू नयेत, नित्य ताप येणाऱ्यांनी जखमा असतांना ताप पूर्णपणे बरा होईपर्यंत पूर्ण विश्रांती घ्यावी. धट्टेकट्टे असणाऱ्यांनी व ज्यांना ताप कधीही येत नाही त्यांनी भरपूर व्यायाम वा मेहनत करावी. ३) जेवणखाण सात्त्विक असावे. गव्हाचे फुलके, ज्वारीची भाकरी, गाईचे दूध, गोड ताक,  दोडका, पडवळ, कारले, सुरण, कोथिंबीर, कोकम, आवळा, ओलीहळद, मुळा, राजगिरा, पालक, मूगडाळ, डाळिंब यांचा आहारात समावेश असावा. ४) धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. रोगाची चिंता न करता सामाजिक कामात लक्ष द्यावे.  टीकाटिपण्णीचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ५) ‘मन करा रे प्रसन्न’ अशी चित्तवृत्ती ठेवावी.
आयुर्वेदाला सार्थ अभिमान वाटावा अशी सदासर्वदा तत्काळ गुण देणारी शाश्वत मूल्ये असलेली जी काही औषधे आहेत त्यांत एलादि तेल हे एक आहे. आधुनिक शल्यशास्त्राने नि:संकोच स्वीकारावी असे हे एक उत्तम व्रणशोधक व रोपण करणारे तेल आहे. महारोग, किरकोळ त्वचाविकार, इसब, गजकर्ण, नायटा, मधुमेहाच्या जखमा, नाडीव्रण, भगंदर, हाडय़ाव्रण, पुरळ या सर्वाकरिता ‘एलादि तेल’ तत्काळ गुण देणारे आहे. यातील सुगंधी औषधांची योजना करणाऱ्या ऋषिमुनींची कल्पकता, योजकता मानावयास हवी. ‘योग रत्नाकर’ या ग्रंथात हा पाठ आहे. आम्ही अष्टांगहृदय सूत्रस्थान, १५वा अध्याय, एलदिगणांतील औषधांची योजना करून पाठ बसविला आहे. प्रथम वेलदोडा, तगर, नागकेशर, कोळींजन, तालीसपत्र, प्रियंगु वाळा, किरमाणीओवा रोहिष गवत, तमालपत्र, लाजाळू, सुपारी प्रत्येकी १० ग्रॅम भरडीचा एक लिटर पाण्यात काढा करावा. चतुर्थाश उरवून, गाळावा. त्या काढय़ात वेलची, दालचिनी, जटामांसी, नागकेशर, गुग्गुळ, काळाबोळ, धूप गंधाभिरोजा प्र. २।। ग्रॅम चूर्ण व तीळतेल १०० मिली असे एकत्र मंदाग्निवर तेल सिद्ध करणे. सतत ढवळावे. तयार झाल्यावर गाळून वापरावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १५ जून
१९०६ >  बट्र्राड रसेलच्या ‘मॅरेज अँड मॉरल्स’ आधारे ‘विवाह आणि नीती’ तसेच ‘इब्सेन : व्यक्ती आणि वाङ्मय’, तसेच ‘मराठी वाङ्मयाचा परामर्श : आरंभापासून १८७४ पर्यंत’ व ‘ग्रंथांच्या सहवासात’ (ग्रंथसमीक्षा) अशी पुस्तके लिहिणारे गंगाधर भाऊराव निरंतर यांचा जन्म. गृहिणी, अर्धागी, भूकंप या कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या होत्या.
१९३१ > चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी)  हा नवा प्रकार हाताळणारे ‘संदेशचे संपादक अच्युत बळवंत कोल्हटकर यांचे निधन.  
१९४५> कवी, आंबेडकरी विचारप्रवाहाचे अभ्यासक व कथाकार अर्जुन उमाजी डांगळे यांचा जन्म. ‘छावणी हलत आहे’ हा त्यांचा काव्यसंग्रह दलित, सर्वहारा जाणिवांचा होता. ‘उद्ध्वस्त क्षितिजे’, ‘बांधावरची माणसे’ हे कथासंग्रह, ‘यादवी’ ही कादंबरी, तसेच ‘दलित साहित्य : एक अभ्यास’, ‘दलित विद्रोह’ आणि ‘आंबेडकरी चळवळीचे अंतरंग’ ही त्यांची वैचारिक पुस्तके.
१९७९> त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का? या हृदयनाथ मंगेशकरांनी अजरामर केलेल्या गीताचे कवी सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचे निधन. ‘सावली’, ‘पानफूल’ हे कवितासंग्रह व बालकवितांचा ‘छुमछुम’ हा संग्रह हे त्यांचे पुस्तकसंचित.
– संजय वझरेकर