हबशी, सिद्दी वा मकरानी हे मूळचे आफ्रिकेतल्या इथिओपिया, सोमालिया आणि अ‍ॅबिसिनिया येथील रहिवासी. सध्या आफ्रिका खंडाव्यतिरिक्त भारत आणि पाकिस्तानात हा समाज अधिक आढळतो. पट्टीचे दर्यावर्दी असलेले हे लोक प्रथमत: मुहम्मद बिन कासिम याच्याबरोबर सैनिक म्हणून भारतात आले. आफ्रिकेतल्या बांटू या वंशाचे लोक या हबशींचे पूर्वज होत. हबशी जमातीचे लोक भारतात सध्या कर्नाटक, आंध्र (हैदराबाद), गुजरात या प्रदेशांत तर पाकिस्तानात कराची आणि मकरान येथे आढळतात. भारतातील लोकसंख्या ५०,००० ते ६०,००० असलेले हे हबशी अधिकतर सुफी मुस्लीम आहेत, यामध्ये काही थोडेफार हिंदू आणि कॅथलिक ख्रिश्चनही आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इथिओपियाजवळलि येमेन आणि अरेबियातल्या अरबांचा भारताशी असलेला व्यापार पाहून काही हबशांनीही दक्षिण भारताशी व्यापार सुरू केला. पण पुढे पोर्तुगीजांचाही भारताशी व्यापार सुरू झाला आणि त्यांनी त्रास दिल्यामुळे यांचा व्यापार बंद झाला. पुढे अरब आणि पोर्तुगीजांनी त्यांना गुलाम म्हणून भारतात आणले. अरबांनी हबशांना आफ्रिकेतून आणताना जहाजांवरच त्यांना इस्लाम धर्माची दीक्षा देऊन मुस्लीम केले. पोर्तुगीजांनी आणलेल्या हबशी गुलामांचे धर्मातर कॅथलिक ख्रिश्चन धर्मात केले. परंतु ते संख्येने फारच कमी होते.

सुरुवातीला गुलाम म्हणून आणलेल्या हबशांचे बस्तान बसल्यावर पुढे अनेक हबशी निजामशाही, आदिलशाही आणि मोगलांकडे लष्करात आणि नौदलात नोकरीस राहिले. मूळचे शूर आणि सुदृढ असल्यामुळे लष्करात आणि नौदलात त्यांनी मोठय़ा कामगिऱ्याही केल्या. हबशी उत्तम दर्यावर्दी असल्याने काहींनी चाचेगिरीचा व्यवसाय स्वीकारला. काहींनी तर जंजिरा, दीव, सचिन (गुजरात) वगैरे ठिकाणी किनारपट्टीत स्वत:ची राज्येही कमावली. काही हबशी त्यांच्या कर्तबगारीवर पुढे राज्यांचे वजीर, सेनापती, राजकीय मुत्सद्दी या पदांपर्यंत पोहोचले. अहमदनगरच्या निजामशहाचा अंमल जंजिरावर बसविणारा सेनाधिकारी पिरमखान हा हबशीच होता. कोकणातील जंजिरा संस्थानावर हबशी राज्यकर्त्यांचे शासन तीन शतकांहून अधिक काळ टिकले. आपल्या चातुर्य, मुत्सद्देगिरी, शौर्य या गुणांमुळे दक्षिण भारतात एक आख्यायिका बनलेला मलिक अंबर हाही हबशीच होता.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Habashi community negro society
First published on: 07-03-2018 at 02:18 IST