इंग्लंडमधील विम्बल्डन येथे ६ डिसेंबर १९४७ रोजी जन्मलेले जेफ्री हिंटन हे ब्रिटिश कॅनेडियन संगणक शास्त्रज्ञ आणि संज्ञानात्मक मानसशास्त्रज्ञ (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट) आहेत. ते त्यांच्या कृत्रिम न्यूरल नेटवर्क क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध आहेत.

जेफ्री हिंटन यांचे शिक्षण ब्रिस्टलमधील क्लिफ्टन कॉलेज आणि केंब्रिजमधील किंग्ज कॉलेजमध्ये झाले. त्यांनी १९७०मध्ये प्रायोगिक मानसशास्त्रात कला शाखेची पदवी प्राप्त केली. एडिनबर्ग विद्यापीठातून १९७८साली कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयात केलेल्या संशोधनासाठी त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर त्यांनी ससेक्स विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ तसेच कार्नेगी मेलन विद्यापीठात काम केले. पुढे ते टोरोंटो विद्यापीठात संगणक विज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. कॅनेडियन इन्स्टिट्यूट फॉर अॅडव्हान्स रिसर्च येथे मशीन लर्निंग अॅन्ड ब्रेन प्रोग्राम्ससाठी ते सल्लागार आहेत. ते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पावर काम करण्यासाठी २०१३साली गूगल या कंपनीत कार्यरत झाले. त्यांचे संशोधन मशीन लर्निंग, स्मृतिमंजूषा आणि न्युरल नेटवर्क वापरणे यांच्याशी संबंधित आहे. ते ‘डीप लर्निंग’ अर्थात सखोल अध्ययन क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी एआयच्या क्षेत्रात केलेल्या प्रचंड कामामुळे त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे भीष्मपितामह म्हणून संबोधले जाते.

मे २०२३मध्ये जेफ्री हिंटन यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या जोखमींबद्दल चिंता व्यक्त करून गूगल कंपनीतून राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यांचा असा दावा आहे की आपण कल्पनाही करू शकत

नाही, इतक्या वेगाने या तंत्रज्ञानाचा विकास होईल. व्यापक कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल जनरल इंटलिजन्स) वापर यंत्रांनी केल्याने ती माणसाप्रमाणे किंवा माणसापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. मानवी मेंदूपेक्षा मोठ्या चॅटबॉट्समध्ये कितीतरी कमी प्रमाणात न्युरल नेटवर्क कनेक्शन्स असतात, पण या प्रणाली इतक्या सक्षम आहेत की त्या स्वत:चा संगणक कोड लिहून स्वत:त सुधारणा करतील. त्यामुळे या प्रणाली माणसाच्या नियंत्रणातून सुटू शकतील. तेव्हा माणसानीच त्यांच्या धोक्यांबद्दल गंभीरपणे काळजी घेणे गरजेचे आहे.

जेफ्री हिंटनना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट संशोधनासाठी काही विद्यापीठांकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यांच्या अग्रगण्य आणि अत्यंत प्रभावशाली कार्यासाठी त्यांना अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. डीप न्युरल नेटवर्कला संगणकाचा महत्त्वाचा घटक बनविणाऱ्या जेफ्री हिंटनना संकल्पनात्मक प्रगतीसाठी २०१८चे ‘ट्युरिंग अॅवॉर्ड’ मिळाले.

डॉ. सुनंदा ज. करंदीकरमराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org