रक्तदाबाशी घनिष्ठ संबंध असणारे कोलेस्टेरॉल हे जैवरसायन म्हणजे पेशीपटलाचा एक आवश्यक घटक आहे. कोलेस्टेरॉलची उत्पत्ती यकृतात होते. मात्र शरीराला आवश्यक असणारे हे संप्रेरक शरीरात अनेक ठिकाणी अनावश्यक प्रमाणात गोळा होऊन व्याधींना कारणीभूतही ठरते. १७५८ साली फ्रेंच वैद्यकतज्ज्ञ फ्रँकाय पुलेटिए याने पित्ताशयातील विकारांवर संशोधन करताना पित्ताशयातील काही अज्ञात स्वरूपाचे खडे वेगळे केले. यानंतर १८१५ साली मायकेल-युजिन शेव्हरूल या फ्रेंच वैद्यकतज्ज्ञाने पित्ताशयातील या खडय़ांपासून स्फटिकरूपातील, कालांतराने ‘कोलेस्टेरॉल’ या नावे ओळखला गेलेला पदार्थ वेगळा केला. परंतु या कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी असलेला संबंध स्पष्ट होण्यास आणखी एक शतक जावे लागले.मानवी शरीरातील रोहिण्यांत जाडसर पदार्थ जमा होत असल्याचे जर्मन वैद्यकतज्ज्ञांना एकोणिसाव्या शतकातच लक्षात आले होते. १९१० साली जर्मन रसायनतज्ज्ञ अॅडॉल्फ विंडॉस याने रक्तदाबाची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या रोहिणीच्या आत जमा झालेल्या जाडसर थराचे पृथ:करण केले. त्या थरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे सर्वसाधारण रोहिण्यांतील थरात असणाऱ्या कोलेस्टेरॉलपेक्षा २५ पट अधिक असल्याचे त्याला आढळले. त्यानंतर १९१३ साली निकोलाय अनित्शोकॉव या रशियन वैद्यकतज्ज्ञाने सशावर केलेल्या प्रयोगात, सशाला आहारातून शुद्ध कोलेस्टेरॉल दिले. यामुळे सशात रक्तदाबाची लक्षणे निर्माण झाली. यावरून आहारातून येणारे कोलेस्टेरॉल हे, हा थर जमा होण्यामागचे कारण असल्याची शक्यता दिसून आली. सन १९५० मध्ये जर्मनीच्या कोनराड ब्लॉख याने अॅसिटेटपासून होणाऱ्या कोलेस्टेरॉलच्या रेणूंच्या निर्मितीमागील गुंतागुंतीची प्रक्रिया शोधून काढली. या प्रक्रियेत अवघे दोन कार्बनचे अणू असणाऱ्या अॅसिटेटचे बहुवारिकीकरण (पॉलिमरायझेशन) होऊन त्यापासून कार्बनचे २७ अणू असणाऱ्या कोलेस्टेरॉलचे रेणू कसे तयार होतात, हे समजू शकले. यानंतर १९५५ सालच्या आपल्या संशोधनात, अमेरिकेच्या जॉन गॉफमॅन याने, त्या वेळी नुकत्याच उपलब्ध झालेल्या, अतिशय उच्च वेगाने स्वत:भोवती फिरणाऱ्या अपकेंद्री (सेंट्रिफ्यूज) यंत्राचा वापर केला. या यंत्राद्वारे त्याने कोलेस्टेरॉलमधील वेगवेगळी घनता असलेले दोन घटक शोधून काढले. गॉफमॅनच्या संशोधनात, हृदयविकाराचा झटका येऊन गेलेल्या रुग्णांतील रक्तात कमी घनता असलेल्या कोलेस्टेरॉलसंलग्न मेदप्रथिनांचे प्रमाण वाढले असल्याचे व अधिक घनता असलेल्या कोलेस्टेरॉलसंलग्न मेदप्रथिनांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. गॉफमॅनच्या या संशोधनाने कोलेस्टेरॉलवरील प्रगत संशोधनाला मोठी गती मिळाली.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2019 रोजी प्रकाशित
कुतूहल : हृदयविकाराचे मर्म
१९१० साली जर्मन रसायनतज्ज्ञ अॅडॉल्फ विंडॉस याने रक्तदाबाची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या रोहिणीच्या आत जमा झालेल्या जाडसर थराचे पृथ:करण केले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 03-09-2019 at 00:10 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart disease cholesterol abn