हे वाक्य वाचा- ‘त्या समारंभाला खूप लोक जमले होते. वक्ते मुद्देसूद बोलले. तो समारंभ छान साजरा झाला.’

या वाक्यरचनेऐवजी अनेक मराठी भाषक हिंदीच्या अंधानुकरणाने ‘तो समारंभ संपन्न झाला,’ असे बोलतात आणि लिहितातही. ‘संपन्न होना’ याचा हिंदी भाषेत अर्थ आहे – ‘पूर्ण होणे, संपणे, व्यवस्थित पार पडणे’. मराठी भाषेत ‘संपन्न’ या संस्कृत भाषेतील तत्सम शब्दाचा अर्थ आहे – ने युक्त, श्रीमान, वैभवशाली, ऐश्वययुक्त. उदा- धनसंपन्न, ज्ञानसंपन्न, आशयसंपन्न इत्यादी. दि. ७ फेब्रुवारीच्या ‘लोकसत्ता’तील संपादकीयात ‘(लता) दीदींना प्रत्येकास स्वरसंपन्न करण्याची जिद्द अंगी बाळगावी लागली,’ असे वाक्य आहे. स्वरसंपन्न – स्वरांनी श्रीमंत, वैभवशाली असा या शब्दाचा अर्थ. वर दिलेल्या शब्दांचे अर्थही धनाने श्रीमंत (धनसंपन्न), ज्ञानामध्ये वैभवशाली (ज्ञानसंपन्न), आशयामुळे  श्रीमान, आशयाने युक्त (आशयसंपन्न) असे आहेत.

१६ फेब्रुवारी २०२२ च्या ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘भाषासूत्र’ या सदरात डॉ. नीलिमा गुंडी यांच्या लेखाचे शीर्षक आहे- ‘नादसंपन्न वाक्प्रचार’ त्यांनी लेखात वापरलेले शब्द आहेत- ‘नादयुक्त’, ‘नादवलयामुळे’- शब्दांचा योग्य वापर लेखिकेने केला आहे.

मराठी भाषेत ‘साजरा होणे’ याचे अर्थ ‘व्यवस्थित पार पडणे’, ‘सांगता होणे’, ‘पूर्तता होणे’ असे आहेत. ‘समारंभ साजरा झाला’ हे वाक्य ‘समारंभ उत्तम रीतीने पूर्ण झाला किंवा पार पडला,’ याच अर्थाचे आहे.

मराठीतील त्या शब्दाचा प्रचलित, योग्य अर्थ नाकारून हिंदीतील अगदी वेगळय़ा अर्थाचा शब्द स्वीकारणे योग्य नव्हे. मात्र ‘संपन्न झाला’ हीच वाक्यरचना योग्य आहे, सर्वमान्य आहे असे म्हणणारे अनेक मराठी भाषक आहेत. त्यांना मला एवढेच सांगायचे आहे, की आपली मातृभाषा आपणच विचारपूर्वक, काळजीपूर्वक जपायला हवी. अन्य भाषांचे अतिक्रमण रोखणे आपले कर्तव्य आहे.

शाब्दिक चुका – उपहारगृह की उपाहारगृह ?

‘उपहार’ याचा अर्थ देणगी, भेट, नजराणा असा आहे. ‘उपाहार’- (उप आहार) याचा अर्थ अल्प आहार. फराळ असा आहे. जेथे फराळाचे, अल्प आहाराचे खाद्यपदार्थ मिळतात ते दुकान. त्यामुळे उपहारगृह हा शब्द चुकीचा आहे. उपाहारगृह हा शब्द बरोबर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यास्मिन शेख