पिकांचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी पिकांना आवश्यक असलेली पोषक अन्नद्रव्ये जमिनीत असावी लागतात. ही अन्नद्रव्ये धारण करण्याच्या जमिनीच्या क्षमतेला जमिनीची सुपिकता म्हणतात. माती परीक्षणामुळे जमिनीची सुपिकता समजते. जमिनीचा कस हा तिच्या सुपिकतेचा एक भाग आहे. पुष्कळ वेळा जमिनी सकस असूनही त्या सुपीक असतातच असे नाही. परंतु सुपीक जमिनी मात्र निश्चितच कसदार असतात.
जमिनीची सुपिकता ही तिच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मावर तसेच मशागतीच्या पद्धतींवर अवलंबून असते. ज्या खडकापासून जमीन तयार झाली, त्या खडकात भरपूर खनिजे असल्यास त्यापासून सुपीक जमीन तयार होते. आयन विनिमयामुळे पिकास अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. मॉन्टमोरिलोनाइट खनिजाची आयन विनिमय शक्ती जास्त असते. हे खनिज मातीत असल्यास जमिनीची सुपिकता वाढते.
अतिपावसाच्या प्रदेशात जमिनीतील अन्नद्रव्ये वाहून गेल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. गवताळ आणि थंड कटिबंधातील जमिनीत भरपूर सेंद्रीय पदार्थ असल्याने त्या प्रदेशातील जमिनी सुपीक असतात.
उष्ण कटिबंधातील कमी पावसाच्या भागात सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण कमी असते. या प्रदेशातील जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे विघटन झपाटय़ाने होते. म्हणून जमिनी लवकर नापीक होतात. जास्त पावसाच्या प्रदेशातील जमिनीत सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण दोन ते तीन टक्के असते. टेकडय़ांच्या उतारावरील जमिनी कमी सुपीक असतात. अशा जमिनीत गाळाबरोबर वाहून आलेली अन्नद्रव्ये गोळा होतात व साठतात.
जमिनीच्या सुपिकतेच्या घटकांमध्ये मातीची जोपासना, सेंद्रीय व रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर, पाणी व जमीन व्यवस्थापन, योग्य मशागत, पिकांची योग्य फेरपालट, रोग व किडींचा योग्य बंदोबस्त यांचा समावेश होतो. जमिनीतील सेंद्रीय द्रव्यांमुळे जमिनीची घडण, निचरा शक्ती, आयन विनिमय शक्ती सुधारते आणि जमिनी सुपीक बनतात.
शेतजमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी जमिनीत ज्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, ती अन्नद्रव्ये आवश्यक त्या प्रमाणात घालून त्याची योग्य पातळी राखावी. जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रीय आणि रासायनिक खते घालून जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक घडण सुधारून घ्यावी आणि द्विदल पिकांची योग्य प्रमाणात फेरपालट करावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जे देखे रवी.. – दोष की प्रवृत्ती?
स्त्री आणि पुरुष यांच्यामधली ओढ ही आदिम आहे. त्यातून मूल होते आणि मग आई ही गोष्ट निर्माण होते आणि म्हणून या ओढीच्या मानाने आईचे प्रेम दुय्यम ठरते, असे मी लिहिले खरे; पण त्यामुळे भाबडी मानवजात रागावण्याची शक्यता आहे. इथे स्त्री-पुरुषांची एकमेकांमधली ओढ आणि हे आईचे प्रेम मी तराजूत टाकत नाही. प्रेमाला तराजू लावता येत नाही. स्त्री-पुरुषांबद्दलच्या सगळ्याच पुराणातल्या कथा मोठय़ा गमतीदार आहेत. ब्रह्मातून विश्व निर्माण करणारा देव म्हणजे ब्रह्मदेव, त्याची मुलगी सरस्वती अशी आख्यायिका आहे. हिचे वर्णन ज्ञानेश्वरांनी वागविलासिनी असे केले आहे. ती हवीच, कारण नाहीतर माणसाचा बौद्घिक आणि सांस्कृतिक विकास व्हायचा तरी कसा? या आपल्या मुलीच्या प्रेमात ब्रह्मदेव पडला अशी एक अस्पष्ट कथा पुसण्याचा प्रयत्न करूनही शिल्लक आहे. त्यावरही ज्ञानेश्वरांची ओवी आहे. त्यात हीच ती आदि (पुरुषाची) माया। ब्रह्मदेवही पडला होता पाया। अशी रचना आहे. वरील ओढीचीच ही आदिम आकृती. अकराव्या अध्यायात मला विश्वरूप दाखव, असा हट्ट अर्जुन धरतो तेव्हा श्रीकृष्ण जे स्वत:च्या बायकोला म्हणजे लक्ष्मीलाही दाखवले नाही ते अर्जुनाला दाखवायला एकदम उत्सुक होतो. याचे वर्णन करताना
। जरी लंपटाला। सुंदरी कह्य़ात घेते। तसे श्रीकृष्णाचे झाले। अर्जुनाशी।  या ओवीतला लंपट श्रीकृष्ण आणि अर्जुन म्हणजे ती सुंदरी. ज्ञानेश्वरांसारखे सभ्य संत असे दृष्टांत देतात तेव्हाही ते एका आदिम आकर्षणाचीच आठवण करतात. शेवटी पुरुष थोडा तरी लंपट असतोच आणि असावाच लागतो. ही निसर्गाची रीत आहे. नाहीतर सुंदऱ्यांनी कह्य़ात कोणाला घ्यायचे, असा प्रश्न निर्माण होईल. अ‍ॅडम आणि ईव्हच्या मध्यपूर्वेतील जुन्या करारातली गोष्ट बघा. अ‍ॅडमला एका बागेत ठेवले आहे. तो कंटाळतो म्हणून त्याला मैत्रीण देण्याच्या उद्देशाने त्याच्या बरगडीतून एक स्त्री निर्माण केली जाते आणि ‘तुम्ही मजा करा, पण निष्पाप तऱ्हेने’ असे त्यांना बजावण्यात येते. ते कोठले व्हायला? जे व्हायचे तेच होते आणि त्याचे खापर ईव्हच्या माथी फोडण्यात येते. हे ‘पुरुष मेले करून सवरून वेगळे’ असे बायका म्हणतात ते काही खोटे नाही.
दोष तुमच्या दोघांचा आहे, असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते जरी खरे असले तरी त्याला दोष हा शब्द चुकीचा असतो, कारण ही वृत्ती किंवा प्रवृत्ती असते. ती आदिम असते. ही तात्कालीन शरीरात भिरभिरणाऱ्या रसायनांवर ठरते. असा विचार केला की मग, मुळात या पौराणिक कथाच मुळी पूर्वग्रहदूषित आहेत असेच म्हणावे लागते, कारण मानववंशशास्त्र म्हणते- ‘पहिल्यांदा मुळी पुरुष नव्हताच, होती केवळ एक आदिस्त्री.’
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did we come to know about fertile land
First published on: 22-02-2013 at 12:02 IST