क्लोनिंग, म्हणजेच एखाद्या सजीव गोष्टीची तिच्या जनुकांच्या आधारे हुबेहूब नक्कल तयार करणे. क्लोनिंग फक्त प्रयोगशाळेत होते असे आपल्याला वाटते, पण प्रत्यक्षात निसर्गच या कलेत पारंगत आहे. उदाहरणार्थ, बॅक्टेरिया हे एकपेशीय जीव स्वत:ची हुबेहूब नक्कल करून वाढतात. त्याचप्रमाणे माणसांमधील सारखे दिसणारे जुळे हेदेखील नैसर्गिक क्लोनिंगचेच एक रूप आहे.
प्रयोगशाळेमध्ये प्राण्यांचे क्लोनिंग हे दोन प्रमुख पद्धतींनी केले जाते. पहिली पद्धत म्हणजे ‘एम्ब्रियो ट्विनिंग’, जिथे एका सुरुवातीच्या गर्भाला दोन समान भागांत विभागले जाते. हे दोन्ही भाग वेगवेगळ्या मादींच्या गर्भाशयात टाकले जातात आणि त्यातून दोन समान जनुकं असलेले प्राणी जन्म घेतात. दुसरी पद्धत आहे ‘सोमॅटिक सेल न्यूक्लिअर ट्रान्स्फर’. या पद्धतीत एखाद्या प्राण्याच्या शरीरातील पेशीमधून डीएनए घेतला जातो आणि तो डीएनए काढून टाकलेल्या अंड्याच्या पेशीत टाकला जातो. त्यानंतर हे अंडे गर्भात वाढवले जाते व समान जनुकं असलेला प्राणी जन्म घेतो. क्लोनिंग केलेले प्राणी जनुकीयदृष्ट्या हुबेहूब असले तरी दिसायला सारखे असतीलच असे नाही.
स्कॉटलंडमधील रॉसलिन संस्थेमध्ये ५ जुलै १९९६ रोजी आयन विल्मट आणि कीथ कॅम्पबेल या शास्त्रज्ञांनी डॉली नावाची मेंढी क्लोन केली. ही प्रौढ मेंढीच्या स्तनपेशीतून तयार झालेली जगातील पहिली सस्तन क्लोन प्राणी होती. मात्र हे यश सहज मिळाले नव्हते, २७६ अयशस्वी प्रयत्नांनंतर डॉलीचा जन्म झाला होता. त्यानंतर डुक्कर, मांजर, ससे, घोडे आणि हरीण यांचेही क्लोन करण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
संशोधक क्लोनिंगद्वारे तयार झालेल्या भ्रूणातून स्टेम सेल्स म्हणजेच मूळ पेशी तयार करता येतात. या मूळ पेशींना अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरता येऊ शकते. त्याचप्रमाणे, विशिष्ट जनुकांमध्ये दोष असलेल्या प्राण्यांचे क्लोन करून वैज्ञानिक त्यांच्यावर संशोधन करतात आणि त्यातून मानवी रोगांविषयी माहिती मिळवतात. कृषीक्षेत्रातही क्लोनिंगचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो, अधिक दूध देणाऱ्या गायी किंवा जास्त मांस देणाऱ्या डुकरांचे क्लोन तयार केले जाऊ शकतात. क्लोनिंगचा वापर एखाद्या आवडत्या पाळीव प्राण्याचे क्लोन करण्यासाठीही केला गेला आहे. कॉपी कॅट नावाच्या मांजराचा क्लोन २००१ मध्ये तयार करण्यात आला, ती जगातील पहिली क्लोन केलेली पाळीव मांजर होती. भविष्यात क्लोनिंगच्या मदतीने वूली मॅमथ व इतर लुप्त प्रजातींनाही पुन्हा जिवंत करता येऊ शकते. मानवी प्रजनन क्लोन मात्र अद्याप शक्य झालेले नाही आणि हे अनैतिक मानले गेले आहे.
डॉ. विनायक पांडुरंग सुतार
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org