एका गावात एक पाटील राहात होता. गावात त्याला फार मान असे. त्याचा शब्द कोणी खाली पडून देत नसे. जणू सगळय़ा प्रकारचे ज्ञान फक्त या पाटलालाच. त्याच्या जवळ पैसाही खूप असल्याने कोणतेही संकट आले की तो ते संकट निवारण करण्यासाठी विनाकारणच पैसा खर्च करीत असे. उदा. लेकाला जरा सर्दीपडसे झाले तरी लगेच मोठय़ा डॉक्टरकडून दवापाणी कर, हॉस्पिटलमधे दाखल कर, असे चालायचे त्याचे. जेव्हा ते दुखणे गंभीर असे तेव्हा ही खबरदारी घ्यायलाच हवी. पण डॉक्टरही म्हणायचे ‘‘ अहो ! अगदी मामुली सर्दी, पडसे आहे. कशाला दाखल करताय उगीच? काही गंभीर दुखणे नसेल तेव्हा इतके टोकाचे पाऊल उचलायची काही आवश्यकता नाही.’’ पण पाटील ऐकतील तर ना!

हे त्यांचे वर्तन बघून गावातले एक अनुभवसमृद्ध वैद्य हसत हसत म्हणत असत, आता पाटील पडली मोठी आसामी ! मालदार गडी ! पण खरं सांगायचं तर त्यांचा एकंदर खाक्या बघून असं म्हणावंसं वाटतं,‘‘कोंबडी लारगावली अन् म्हैस ओवाळली.’’

जुन्या म्हणींची गंमत असते. त्या म्हणीतून काही नवीन शब्द कळतात. जसा या म्हणीत ‘लारगावली’ हा शब्द येतो. ‘लारगावली’ याचा अर्थ ‘भुताने झपाटली’. भुताने झपाटलेल्या कोंबडीसाठी पूर्वी मांत्रिकाचेच उपाय चालत असत. (आता तो जमाना गेला.) ते करायचे सोडून कोंबडीवरून म्हैस ओवाळून टाकायची? कारण कोंबडीची किंमत ती काय असणार? पण म्हशीची किंमत मात्र कोंबडीच्या कितीतरी पटीने जास्त असते! असे करणे म्हणजे अव्यवहार्य नाही का ?

या म्हणीचा लक्ष्यार्थ असा की क्षुल्लक कारणासाठी किंवा छोटय़ाशा लाभासाठी मोठे नुकसान करून घेणे. काही जुन्या म्हणी, काही जुने शब्द आता विस्मरणात गेलेले आहेत. काही विचारही आता कालबा झालेले आहेत. पण म्हणींमधून लक्ष्यार्थ किंवा सूचितार्थ व्यक्त होत असतो. त्यातून मानवी व्यवहार, स्वभाव, वर्तणूक, यावर मार्मिक भाष्य, टिप्पणी केलेली असते. ती बघण्यासारखी असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– डॉ. माधवी वैद्य madhavivaidya@ymail.com