बोमन फ्रामजी छापगर यांचा जन्म १ जानेवारी १९३१ रोजी झाला. बोमन यांच्या रूपाने संपूर्ण सागरीशास्त्र शाखेला एक चतुरस्र अभ्यासक व शास्त्रज्ञ लाभला. सूक्ष्मजीवशास्त्र (१९४८) व प्राणिशास्त्र (१९५०) अशा दोन विषयांत पदवी प्राप्त केलेल्या बोमन छापगर यांनी १९५१ साली ‘तारापोरवाला मत्स्य संग्रहालयाचे पहिल्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे पहिलेवहिले विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला. इथेच १९५९-६५ या कालावधीत त्यांनी ‘अभिरक्षक (curator) म्हणून मोलाची भूमिका बजावली. १९५५ साली महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य विभागात कनिष्ठ संशोधन साहाय्यक म्हणून कार्य सुरू करणारे छापगर तिथेच साहाय्यक संचालक झाले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या टाटा अणुऊर्जा संशोधन केंद्रातून त्यांनी १९७६ला विद्यावाचस्पतीची पदवी प्राप्त केली. याच संस्थेत त्यांनी सागरी अणुउत्सर्जनाचा या परिसंस्थेवर होणारा परिणाम अभ्यासला तो थेट निवृत्तीपर्यंत (१९८७). त्यातून ‘सागरी कर्करोगतज्ज्ञ’ म्हणून त्यांची ख्याती जगभर पसरली. अमेरिकेतील वॉशिंग्टन डी. सी. मधील जगद्विख्यात ‘स्मिथसोनिअन’ संस्थेच्या निसर्ग इतिहासाच्या राष्ट्रीय संग्रहालयात कर्करोगतज्ज्ञांच्या दालनात बोमन छापगर यांचे भित्तीचित्र झळकत आहे, ही सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
सागरी अभ्यासकांना बोमन छापगर ज्ञात आहेत ते उत्तम शिक्षक, मार्गदर्शक म्हणून. निवृत्तीनंतरही त्यांनी प्राणिशास्त्रातील अनेक विद्यार्थ्यांना घडविले. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी चौफेर अनुभव गोळा केला तो युनेस्कोच्या सागरी जीवशास्त्र उजळणी पाठय़क्रमातून (१९५७). हिंदी महासागर परिक्रमा (१९५९-६४; १९६१-६५) व अरबी समुद्रातील पर्जन्यमानाचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या भारतीय संशोधन जहाज ‘सागर-कन्या’वरील अगदी पहिल्यावहिल्या, भारतीय समुद्र विज्ञानाचा श्रीगणेशा करणाऱ्या मोहिमेतून त्यांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सागरी परिक्रमांतून कमावलेला अनुभव त्यांनी सर्व विद्यार्थी व सहकाऱ्यांना मुक्तपणे वाटला. या सफरीतूनच त्यांनी स्कुबा-डायव्हिंगमध्ये प्रावीण्य मिळवले आणि समुद्रातील पाण्याखालील सजीवांची रंजक दुनिया सर्वासमोर ठेवली.
मुंबई विद्यापीठ, राज्य सरकार व इतर शासकीय आस्थापनांच्या अनेक समित्यांवर विविध स्तरांवर महत्त्वाच्या भूमिका बजावतानाच समुद्रीजगताच्या अंतरंगात जाण्याची ओढ त्यांच्यात अखेपर्यंत कायम राहिली. त्यातून त्यांची चिकित्सकवृत्ती अधिकच बहरली. त्यांनी तीन खेकडे, दोन बारीक कोलंबी आणि (निवृत्तीनंतर) एका माशाच्या नवीन प्रजातीचा शोध लावला. त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके आज संदर्भासाठी वापरली जातात.
अशा बहुआयामी, अवलिया संशोधकाने ५ ऑगस्ट २०१८ रोजी अखेरचा श्वास घेतला असला तरीही त्यांच्या कार्यामुळे बोमन फ्रामजी छापगर हे चिरकाल आपल्या स्मरणात राहणार हे निश्चित.
– डॉ. प्रसाद कर्णिक
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org