बनारसी साडीमध्ये जामदनी, जंगला, जामवार-तंचोई, टिश्यू, कटवर्क, बुट्टीदार असे अनेक प्रकार आहेत. या सर्व प्रकारांना भारतात मागणी आहे. जामदनी हा प्रकार तांत्रिकदृष्टय़ा ‘फिगर्ड मस्लीन’ या पद्धतीने विणून तयार केला जातो. नक्षीचा नमुना जेवढा लहान-मोठा असेल त्यानुसार त्याचे विणकाम केले जाते. हे सर्वच विणकाम कौशल्यपूर्ण असते. जामदनी साडीमध्ये चमेली, पन्ना हजार, झेंडूच्या फुलाच्या आकाराची बुट्टी, पान बुट्टी, तिरके पट्टे असे पारंपरिक नक्षीकाम केले जाते. साडीच्या कोपऱ्यात आंब्याच्या मोहरासारखे बुट्टे हा पण खास प्रकार आहे.
जंगला हा प्रकार विणताना ‘मुगा’ या जातीचे रेशीम वापरले जाते. मुगा रेशीम जंगली झाडावर रेशीम किडे पोसून, मुख्यत्वे आसामात मिळवले जाते. जंगलाचा वापर रेशीम निर्मितीसाठी होतो म्हणून ही ‘जंगला’ प्रकारची साडी म्हणून ओळखली जाते. मुगा रेशमाचा रंग सोनेरी असतो. पाने, फुले, वेलबुट्टी अशा प्रकारचे नक्षीकाम या साडीत नेहमी केले जाते. तर साडीचे काठ मुगा रेशमाबरोबर सोन्या-चांदीची जर वापरून विणले जातात, त्यामुळे साडीचे सौंदर्य वाढते. मुगा रेशीम हे तुती रेशमापेक्षा स्वस्त असते त्याचा काही प्रमाणात फायदा किंमत कमी राहायला होतो. कधी कधी जंगला साडीवर मीनाकामही केले जाते. या नक्षीकामामुळे साडी पूर्ण व्हायला वेळ लागतो आणि त्यामुळे साडीची किंमत वाढते. सहसा अशा किमती साडीचा उपयोग विवाहप्रसंगी केला जातो.
तंचोई साडी विणताना बाण्यासाठी जास्तीचे धागे वापरून नक्षीकाम केले जाते. तंचोई साडीला देशातच नव्हे तर परदेशातही मागणी आहे. सॅटिन विणीचा वापर करून बहुतांश वेळा मरून रंगाची साडी, ज्यामध्ये काश्मीरच्या प्रसिद्ध जामवार शालीचे नक्षीकाम विणलेले असते, ती साडी जामवार साडी म्हणून ओळखली जाते.
बनारसच्या विणकरांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण कौशल्याने विणलेली सोनेरी दिसणारी साडी टिश्यू साडी म्हणून ओळखली जाते. या साडीसाठी जरीचा बाणा आणि रेशमाचा ताणा वापरतात. शिवाय जास्तीच्या रेशमाचा बाणा वापरून साडी विणली जाते. या साडीचे नक्षीकाम तलावात सोनेरी कमळे तरंगत आहेत अशा प्रकारचे असते. कटवर्कच्या तंत्राने पाण्याचे थेंब असल्याचा भास निर्माण केला जातो.
दिलीप हेर्लेकर (मुंबई)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्थानांची बखर – पिंक सिटीचे वास्तुवैभव
अंबरचा महाराजा सवाई जयसिंह द्वितीय याने १७२७ साली जयपूर शहर वसविले. अंबर किल्ल्याच्या सभोवती वसविलेले जयपूर हे भारतातील पहिले सुनियोजित शहर. जयसिंहाने तत्कालीन वास्तुविशारद, बंगालचे विद्याधर भट्टाचार्य याच्याकडून शहराचा आराखडा तयार करवून जयपूर वसविले आहे.
स्वत: जयसिंह खगोलशास्त्र व स्थापत्यशास्त्रातला जाणकार अभ्यासक होता. त्याने त्याच्या कारकीर्दीत जयपूर, दिल्ली, उज्जैन, मथुरा, वाराणसी येथे इ.स. १७२४ ते १७३५ या काळात ‘जंतरमंतर’ या नावाच्या वेधशाळा बांधल्या. त्यांपकी जयपूर आणि दिल्ली येथील जंतरमंतरचे अवशेष अजून बऱ्यापकी अवस्थेत टिकून आहेत. जंतर म्हणजे यंत्र आणि मंतर म्हणजे मंत्र. यंत्र आणि मंत्राच्या साहाय्याने या वेधशाळांमध्ये चंद्र, सूर्य ग्रहणे, कालमापन, ग्रह तारे यांचे स्थान वगरे खगोलशास्त्रीय अंदाज वर्तविले जात. त्यासाठी जंतरमंतरमध्ये चक्रयंत्र, दक्षिण भित्तियंत्र, धृवदर्शक, कपाळयंत्र, दिशायंत्र इत्यादी १९ यंत्रांचा अंतर्भाव होता. इ.स. १८०० पर्यंत या वेधशाळांचा वापर केला जात होता.
जयपूर शहरात विशेष उठून दिसणारी वास्तू म्हणजे हवा महल. महाराजा प्रतापसिंह याने १७९९ मध्ये तत्कालीन वास्तू रचनाकार लालचंद उस्ताद याच्या आराखडय़ाप्रमाणे सिटी पॅलेसचा एक भाग म्हणून हवा महलचे बांधकाम केले. श्रीकृष्णाच्या मुकुटाच्या आकाराची, पाच मजल्यांची इमारत ही प्रामुख्याने राजघराण्यातील, जनानखान्यातील स्त्रियांना तिथे बसून रस्त्यावरील आणि संपूर्ण शहरातील देखावा पाहण्यासाठी बांधली गेली. स्त्रियांना बसता येईल अशा ९५० खिडक्यांची रचना अशा पद्धतीने केली गेली की बाहेरून आतील व्यक्ती दिसू नये! महाराजा रामसिंगच्या काळात प्रिन्स ऑफ वेल्स येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी जयपूरच्या सर्व इमारतींना गुलाबी रंग दिला गेला आणि जयपूर िपक सिटी म्हणून ओळखले जाऊ लागले!
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jamdani saree
First published on: 26-08-2015 at 05:07 IST