हिंदी चित्रपटसृष्टीतली, ब्रिटिश नागरिकत्व असलेली सध्याची आघाडीची चित्रतारका कटरिना कैफ हिचा पहिला यशस्वी चित्रपट होता तेलुगू भाषेतील ‘मल्लेश्वरी’. हा चित्रपट लोकप्रिय झाला आणि कटरिनाला याचा पंचाहत्तर लाख रुपयांचा भरभक्कम मोबदला मिळाला. याच काळात तिने कोकाकोला, एलजी, फेविकॉल, सॅमसंगसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या जाहीरातींसाठी मॉडेिलग केले. कटरिनाचे िहदी उच्चार सुधारल्यावर तिला प्रथम ‘सरकार’ या चित्रपटात राम गोपाल वर्मानी एक छोटी भूमिका दिली.

डेव्हिड धवन यांच्या ‘मने प्यार क्यूं किया’(२००५) आणि ‘हमको दिवाना कर गये’ (२००६) या दोन चित्रपटांतील तिच्या लक्षवेधी भूमिकांनी तिची िहदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द सुरू झाली. या चित्रपटांबरोबरच तिने २००६ साली ‘अल्लरी पिदुगू’ (तेलुगू) आणि ‘बलराम तारादास’ (मल्याळम) या दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं. २००७ साली कटरिनाच्या प्रमुख भूमिका असलेल्या नमस्ते लंदन, पार्टनर, वेलकम, अपने या चित्रपटांनी तिची एक आघाडीची नायिका अभिनेत्री अशी ओळख करून दिली.

कटरिनाचे आतापर्यंत एकूण अडतीस चित्रपट प्रदर्शित झाले. त्यामध्ये दोन तेलुगू आणि एक मल्याळम यांचा समावेश आहे, बाकी पस्तीस चित्रपट िहदीत आहेत. त्यापैकी नमस्ते लंदन (२००७), अपने (२००७), वेलकम (२००७), रेस (२००८), सिंग इज किंग (२००८), अजब प्रेमकी गजब कहानी (२००९), बॉडीगार्ड (२०११), अग्निपथ (२०१२), एक था टायगर (२०१२), धूम-३ (२०१३) आणि मल्लेश्वरी (२००४) या चित्रपटांतील कटरिनाच्या भूमिकांनी तिची ओळख एक आघाडीची चित्रतारका अशी केली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त लक्स, लॅक्मे, लॉरेल, स्लाइस, पॅनासॉनिक या उत्पादनांची बँड्र अम्बॅसिडर म्हणूनही कटरिनाने करार केला आहे. २०१५ साली लंडनच्या मादाम तुसाँमध्ये कटरिनाची मेणाची प्रतिकृती तयार केली आहे. कटरिनाला स्क्रीन, आयफा, स्टारडस्ट, झी आदी चित्रपट-पुरस्कार मिळालेले असले, तरी राष्ट्रीय पुरस्कारासाठी तिचा विचार झालेला नाही.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com