२७ लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला कझाकस्तान हा मध्य आशियातला देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित स्वतंत्र देश आहे. क्षेत्रफळानुसार जगातील नववा मोठा देश असलेल्या कझाकस्तानची लोकसंख्या दोन कोटींच्या जवळपास आहे. जगातील अत्यंत विरळ लोकवस्ती असलेल्या देशांमध्ये या देशाची गणना होते. जगातील सहा तुर्की वांशिक देशांपैकी कझाकस्तान हा एक आहे. मध्य आशिया आणि पूर्व युरोपच्या सीमा मिळतात त्या प्रदेशात हा देश वसलेला आहे. कझाकस्तानच्या उत्तरेला रशिया, पूर्वेकडे चीन, तर दक्षिणेला किरगीजस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत. या देशाच्या पश्चिमेकडील काही प्रदेश कॅस्पियन समुद्राला लागून आहेत. या देशाच्या पूर्व सीमेपासून मंगोलियाची हद्द केवळ ३७ कि.मी.वर आहे. नूरसुल्तान ही कझाकस्तानची राजधानी. १६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत युनियनमधून मुक्त होऊन कझाकस्तान हा स्वायत्त, सार्वभौम देश अस्तित्वात आला.

मुस्लीम बहुसंख्येने असले तरी कझाकस्तान हा देश सर्वधर्मसमावेशक आहे. राज्यघटनेनेच कोणत्याही धार्मिक परंपरा पालन करण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य दिले असल्याने अनेक धर्मांची प्रार्थना मंदिरे मोठ्या संख्येने इथे आढळतात. येथील दोन कोटींच्या आसपास असलेल्या लोकवस्तीपैकी ७२ टक्के इस्लाम धर्मीय, २५ टक्के ख्रिश्चन आणि उर्वरितांमध्ये बौद्ध, ज्यू वगैरे आहेत. मध्ययुगीन काळात या प्रदेशात ‘कजाख’ या तुर्की वंशाच्या जमातीच्या टोळ्यांनी वस्ती केली आणि त्यामुळे या प्रदेशाचे नाव कझाकस्तान झाले. कझाख या नावाचे दोन-तीन अर्थ आहेत, परंतु येथे भटके, विमुक्त, स्वच्छंदी आणि योद्धा असा अर्थ घेतला आहे. कझाख लोकांच्या वस्त्या रशिया, उझबेकिस्तान वगैरे मध्य आशियाई प्रदेशातही मोठ्या प्रमाणात आढळतात. कझाख हीच यांची भाषा. कझाख लोक बरेचसे मंगोलियन लोकांसारखे दिसतात. या लोकांचे पूर्वज मंगोलियन पितृवंशाचे होते आणि त्यामुळे बहुतेकांची चेहरेपट्टी आणि वर्ण मंगोलियनांप्रमाणे झाला. शंभरहून अधिक वंशांच्या लोकांची वस्ती या देशात आढळते. त्यामध्ये अधिकतर कझाक, तातार, रशियन, उझबेक, युक्रेनियन, जर्मन वांशिक आहेत. अश्वपालन आणि उत्तम प्रतीच्या घोड्यांची पैदास हा कझाख लोकांचा जिव्हाळ्याचा विषय. घोडीचे दूध आंबवून तयार केलेले येथील वैशिष्ट्यपूर्ण पेय लोकप्रिय आहे, ते त्यांचे राष्ट्रीय पेय आहे! – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com