समुद्र म्हणजे सजीवांच्या जैवविविधतेची खाणच! सागराच्या खारट पाण्यात असंख्य विषाणू, जिवाणू, आदिजीव, बुरशी, प्राणी आणि वनस्पती वास्तव्य करतात. सागरी सूक्ष्म जीव ऑक्सिजनची निर्मिती करतातच, शिवाय मोठय़ा प्रमाणात कार्बनचे शोषणही करत असतात. हे जीव किनाऱ्याचे संरक्षण करतात. प्रवाळासारखे सागरी जीव नवीन जमीन किंवा खडक तयार करण्यास मदत करतात. जलीय एकपेशीय वनस्पती सागरी परिसंस्थेत वाढतात.
प्राथमिक उत्पादक वनस्पतीप्लवक हे सागरी अन्नसाखळीचा पाया आहेत. त्यांचे भक्षण करून गुजराण करणारे प्राणीप्लवक असतात. सूक्ष्म जीव सुमारे ७० टक्के सागरी जैवभार म्हणजेच बायोमास निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात. समुद्र तळाशी अनेक विघटक जिवाणू असतात. काही जिवाणूंमध्ये जीवदीप्ती असते. किनाऱ्याने वाढणाऱ्या निमखाऱ्या पाण्यातील कांदळवनातील वनस्पती सागरी जीवांना पूरक पर्यावरण उपलब्ध करून देतात.

जलचर पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन घेतात. त्यासाठी त्यांच्यात अनुकूलन दिसून येते. माशांमध्ये कल्ले असतात. अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये विविध प्रकारची श्वसनेंद्रिये आढळतात. समुद्रातील सस्तन आणि सरीसृप प्राणी मात्र प्रत्येक श्वासासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्यांना पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन घेता येत नाही. फुप्फुसे असल्याने प्रत्येक श्वासासाठी त्यांना वर यावे लागते.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

सागरात जवळजवळ प्रत्येक अपृष्ठवंशीय प्राणिसंघाचे प्राणी आढळतात. त्यात रंध्री, आंतरगुही, वलयीकृमी- विशेषत: पॉलिकीट प्रजाती, अनेकविध संधिपाद प्राणी, हरतऱ्हेचे मृदुकाय प्राणी, कंटकचर्मी प्राणी, अर्धपृष्ठवंशीय प्राणी इत्यादींचा समावेश होतो. कमी ऑक्सिजन असलेल्या पाण्यातही ते जगतात. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीचे युरोकोर्डेट, सेफालोकोर्डेट आणि चक्रमुखी हे प्रथमत: समुद्रातच उदयास आले आणि त्यांचे वास्तव्य अजूनही समुद्रात आढळते. विविध मत्स्य प्रजाती येथे आढळतात. जगभरात चालणारा मत्स्यव्यवसाय हादेखील सागरातील या जीवांवर अवलंबून असतो.

समुद्रात सरीसृप वर्गातील कासवे, साप असतात. अनेक सस्तन प्राण्यांचा अधिवास खोल समुद्र असतो. ‘निळा व्हेल’ हा जगातील सर्वात भव्य प्राणी आहे. सस्तन वर्गातील डॉल्फिन, व्हेलच्या इतर प्रजाती, उदमांजर, सील यांचे सागरात वास्तव्य आहे. अशा प्राण्यांची गेल्या शतकात मोठय़ा प्रमाणात शिकार झाली. परंतु आता त्या संरक्षित प्रजाती असल्याने त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे प्रयत्न केले जातात. आजतागायत दोन लाख समुद्री प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. परंतु अजूनही वीस लाख प्रजातींची नोंद होणे बाकी आहे.

प्राचार्य किशोर पवार,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org