सागरी मासे हे प्राचीन काळापासून किनारी प्रदेशांतील लोकांच्या खाद्यसंस्कृतीचा भाग आहेत. त्यातील उच्च पोषणमूल्य आणि चवीमुळे अनेक प्रकारच्या आहारांत त्यांचा समावेश होऊ लागला. नव्याने मत्स्याहार करणाऱ्यांचा कल हा प्रामुख्याने पापलेट, हलवा, बांगडा, रावस, सौंदाळे, माकूळ, नळ, सुरमई, बोंबील, घोळ यांसारख्या कमी काटे, जास्त मांस असणारे आणि उग्र वास नसणारे मासे खाण्याकडे असतो, तर पट्टीचे मत्स्याहारी, मांदेली, मोतके, सुळे, बोय, पेडवे, लेपा, वाकट, तारली, जिताडा, काळुंद्र, कर्ली, मुडदुशे, शेंगटी अशा माशांचा समावेश आहारात करतात. याशिवाय कोळंबी, जवळा, कुल्र्या (चिंबोरी) असे संधिपाद तर तिसऱ्या, कालवं, नळ, माकूळ असे मृदुकाय त्यांच्या मत्स्याहाराचा महत्त्वाचा भाग आहेत.  खाण्यातले दर्दी मुशी, पाकट यांसारखे उग्र वास असणारे अस्थीमीन चवीने खातात. माशांपैकी बांगडे, ढोमे, लेपा, वाकटी, घोळ, सुरमई, मोतके हे मासे खारवून तसेच कोळंबी, जवळा, बोंबील हे न खारवता वाळवले जातात. काही माशांना फारशी चव नसल्याने (उदा. राणी मासा) बाजारात मागणी नसते परंतु त्यांचे पोषणमूल्य चांगले असल्याने मीट बॉल्ससारखी मूल्यवर्धित उत्पादने त्यापासून तयार केली जातात. मुशी, कुपा, यांच्या यकृतापासून जीवनसत्त्वयुक्त शक्तिवर्धक तेल काढले जाते. घोळीच्या ‘भोतीचा’ (वाताशय) वापर अनेक बाबींसाठी करतात. मत्स्योत्पादन परकीय चलन मिळवून देते म्हणून त्याकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे.

हेही वाचा >>> कुतूहल : केंद्रीय समुद्रीय मत्स्यकीय संस्था

पापलेटच्या उत्पादनात होणारी घट चिंताजनक असल्याने अलीकडेच पापलेट माशाला महाराष्ट्राचा ‘राज्य मासा’ म्हणून दर्जा देण्यात आला. पापलेटप्रमाणेच इतरही अनेक प्रजातींच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकारी पातळीवरून अनेक प्रयत्न केले जात आहेत. पावसाळय़ात मासेमारी बंद ठेवली जाते, कारण पावसाळा हा बहुतेक माशांचा प्रजनन काळ असतो. अशा वेळी अंडीधारी माद्या व लहान पिल्ले जाळय़ात अडकल्यामुळे मत्स्यसाठय़ावर त्याचा विपरीत दूरगामी परिणाम होतो.  मत्स्यसंवर्धनासाठी देशातील अनेक संशोधन संस्था जसे ‘फिशरी सव्‍‌र्हे ऑफ इंडिया’ प्रयत्नशील असून सीबा, सीएमएफआरआय या संस्थांनी मत्स्यबीज उत्पादनाचे तंत्र विकसित केले असून त्यामुळे जिताडा, बोय, काळुंद्र, सकला अशा माशांची व्यापारी तत्त्वावर शेती करणे शक्य झाले आहे.

डॉ. सीमा खोत

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org