डॉ. वा. द. वर्तक हे पुण्याच्या फर्गुसन  महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असताना, डॉ. माधवराव गाडगीळ हे त्यांचे विद्यार्थी होते. या गुरुशिष्यांनी महाराष्ट्रातील देवरायांवर विपुल संशोधन तर केलेच, पण त्यावर अनेक वृत्तांतही लिहिले. त्यांच्या अशाच एका वृत्तांताचा एक छोटा नमुना खास कुतूहलच्या वाचकांसाठी देत आहोत.

‘निसर्गरक्षणाच्या अनेक चांगल्या परंपरा भारतीय संस्कृतीचे भूषण आहेत.’ आपल्या देशभर वड-पिंपळ- उंबर- नांदुरकीची झाडे विखुरली आहेत. यांना पवित्र मानून संरक्षण देण्यात आले आहे. आज परिसर शास्त्रज्ञांच्या लेखी या सर्व वृक्षजाती कळीची संसाधने आहेत. इतर झाडा-झुडपांना जेव्हा फळे नसतात, अशा दिवसांतसुद्धा या जाती फळतात. यांच्या फळांवर अनेक किडे, पक्षी, माकडे, घारी, वटवाघळे तग धरून राहतात. म्हणून निसर्गरक्षणाच्या दृष्टीने त्यांना पूर्वीपासून आपल्या लोकपरंपरेत महत्त्व आहे. मध्य प्रदेशातल्या शिवणी जिल्ह्यातल्या छपरा ब्लॉकमधल्या १३ गोंड आदिवासी गावांच्या आसपासच्या जंगलात चारोळी भरपूर पिकते. पण एकमेकांवर विश्वास नसला, सहकार नसला की लोक फळे वाढता वाढताच ओरबाडतात. त्यांना पुरेसे मोठे होऊ देत नाहीत. कारण एक थांबला तर दुसरे कोणीतरी ते तोडेल ना! २००४ साली या १३ गावांतील लोक संयुक्त वनव्यवस्थापनासाठी एकत्र आले. तेव्हा त्यांनी ठरविले की सगळय़ांनीच संयम बाळगून चारोळी व्यवस्थित पिकू द्यायची. गोंडाच्या परंपरेप्रमाणे चारोळी पूर्ण वाढल्यावर मगच सर्वानी मिळून पंडुम नावाची पूजा करायची. तोपर्यंत कोणीही चारोळी तोडायची नाही. ही परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केली. हे करताच त्या वर्षी त्यांचे चारोळीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी वाढले.

अशाच आणखी एका वृत्तांतामध्ये डॉ. माधवराव गाडगीळ म्हणतात, ‘राजस्थानातल्या अल्वार जिल्ह्यात पूर्वी एक प्रथा होती. गावाच्या चार दिशांना असलेली चार जंगले गाव सांभाळत असे. काकडबनी एका दिशेला जेथून दररोजची गरज पूर्ण होत असे, रजतबनी दुसऱ्या दिशेला जी फक्त दुष्काळामध्येच मदतीला धावत असे, तिसऱ्या दिशेच्या देवबानीला केव्हातरी हात लावायचा मात्र चौथ्या दिशेच्या देवारण्याला कधीच हात लावायचा नाही. गावाचे स्थलांतर झाले तरीसुद्धा! निसर्गपूजन यालाच तर म्हणतात.

निसर्गाच्या प्रत्येक घटकासाठी असे शहाणपण आपल्या सर्वामध्येच येणे गरजेचे आहे. विज्ञानाचा योग्य पद्धतीने कुशलहस्ते वापर केला तरच निसर्गाचे संवर्धन आणि सरंक्षण होऊ शकते हेच डॉ. वर्तक आणि डॉ. गाडगीळ तरुण सुशिक्षित पिढीस अशा वृत्तांतामधून सांगतात, फक्त त्यांना समजून घेता आले पाहिजे.

(डॉ. माधवराव गाडगीळ)

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : http://www.mavipa.org