डॉ. नंदिनी वि. देशमुख

समुद्रअभ्यासाची काही उपकरणे पूर्वापार वापरण्यात येत होती, पण आता वापर कमी झाला आहे. उदाहरणार्थ, नॅन्सेन रिव्हर्सिग बॉटल! या उपकरणाचा वापर करून समुद्रजलाचे नमुने गोळा केले जातात. हायड्रोग्राफिक तारांवरून कप्पीच्या साहाय्याने ‘नॅन्सेन बॉटल’ ठरावीक ठिकाणी पाण्यात सोडल्या जातात. या धातूच्या बाटल्यांना दोन्ही बाजूला बिजागर असलेली झाकणे असतात. त्या एका बाजूने या तारेवर घट्ट जोडलेल्या असतात, तर तारेच्या दुसऱ्या टोकाला सहज निघतील अशा हलकेच जोडलेल्या असतात. बाटलीची दोन्ही तोंडे उघडी ठेवून ती अलगद पाण्यात सोडली जाते. प्रत्येक बाटलीच्या कडेला एक खास तयार केलेला रिव्हर्सिग तापमापी जोडलेला असतो. ज्या खोलीवर पाण्याचे नमुने घ्यायचे असतात तितके अंतर ही बाटली पोहोचली की कप्पी थांबवल्याने नॅन्सेन बॉटलही थांबते. त्याच वेळी एक मेसेंजर नावाचा, मधोमध छिद्र असलेला धातूचा ठोकळा वरच्या बाजूने तारेवरून वेगात सोडला जातो. हा मेसेंजर बाटलीवर आपटला की बाटलीची वरची बाजू तारेवरून निसटते. ही सुटलेली बाटली १८० अंशात गोल फिरून तिच्या घट्ट बाजूवर तारेवरच अडकून पाण्यात हिंदूकळत राहते. त्याच वेळी तिची दोन्ही तोंडे आपोआप बंद होतात. त्यामुळे ठरावीक खोलीवरचे दीड लिटर पाणी त्यात भरते. सोबत असलेल्या तापमापीवर तेथील स्थानिक तापमानाची नोंददेखील होते. त्याच वेळी दुसरा मेसेंजर सुटतो आणि तारेवरून घसरत दुसऱ्या बाटलीला उलटवतो. अशा पद्धतीत एकाच वेळी अनेक नॅन्सेन बॉटल वापरून पूर्वनियोजित खोलीवरच्या पाण्याचे नमुने मिळवता येतात. हे नमुने संशोधन नौकेवरच्या प्रयोगकक्षात आणून त्यांची घनता, क्षारता आणि तापमान तपासले जाते. निरनिराळय़ा ठिकाणच्या पाण्याच्या घनतेतील फरक लक्षात घेतल्यास पाण्यातील प्रवाहांचे अंदाज बांधता येतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नॅन्सेन बॉटलमध्ये एका वेळी दीडच लिटर पाणी पकडता येत असल्याने ‘एन.आय.ओ.बॉटल’ हे नवे उपकरण ‘एन.आय.ओ.’ने शोधून काढले आहे. मेसेंजर आपटल्यावर ही बाटली उलटी होत नाही. केवळ तळातील झाकण गच्च बंद होते. तसेच ‘वॉटर बॅरल’ नावाचे उपकरण एका वेळी २२० लिटर पाणी गोळा करते. या उपकरणाचा वापर पाण्यातील किरणोत्सार समजून घेण्यासाठी अधिक प्रमाणात करतात. अर्थात आता कृत्रिम उपग्रहांच्या तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारच्या उपकरणांचा वापर कमी झाला आहे.