scorecardresearch

कुतूहल : महासागरातील ऑक्सिजनची कमतरता

सजीवांच्या आरोग्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्याचा परिणाम कार्बन, नायट्रोजन आणि इतर प्रमुख जैवभूरासायनिक चक्रांवर देखील होतो.

kutuhal sea plots

डॉ. बाळासाहेब कुलकर्णी

सजीवांच्या आरोग्यासाठी ऑक्सिजन आवश्यक आहे. त्याचा परिणाम कार्बन, नायट्रोजन आणि इतर प्रमुख जैवभूरासायनिक चक्रांवर देखील होतो. समुद्रकिनाऱ्यापासून ते थेट महासागराच्या अतिखोल पाण्यापर्यंत सर्वत्रच सागरी जीवनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो. वातावरणातील एकूण ऑक्सिजनपैकी अर्धा ऑक्सिजन महासागरातून मिळतो.

ऑक्सिजन दोन प्रकारे महासागरांत मिसळतो. एक म्हणजे वातावरणातून थेट, तर दुसरा म्हणजे प्रकाशसंश्लेषणाने जे वनस्पतीप्लवक आणि इतर सागरी वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागालगत ऑक्सिजन तयार करतात तो. मात्र महासागर जितका ऑक्सिजन निर्माण करतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्याचा वापर होतो. असे झाल्यास महासागरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, म्हणजेच डीऑक्सिजनेशन होते. परिणामी सागरी परिसंस्थेचे नैसर्गिक संतुलन बिघडून जीवसृष्टी धोक्यात येते. ‘निसर्ग संवर्धन आंतरराष्ट्रीय संघ’ (‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचर’) यांच्या अहवालानुसार १९५० पासून जगातील महासागरातील विरघळलेल्या ऑक्सिजनच्या पातळीत एकूण दोन टक्के घट झाली आहे आणि २१०० पर्यंत त्यात आणखी १ ते ७ टक्के तूट होऊ शकते.

ऑक्सिजनची पातळी निरनिराळय़ा समुद्रांत वेगळी असून महासागराच्या बहुतेक भागांमध्ये ऑक्सिजनची घट होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक तापमानवाढ. पाण्याचे तापमान वाढले की पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो. तापमानवाढीमुळे पाण्याच्या थरांची सरमिसळ कमी होते. यामुळे महासागर आणि वातावरणातील ऑक्सिजनची देवाणघेवाण कमी होऊन ऑक्सिजनची पातळी घटते.

मुख्यत: किनारपट्टीच्या पाण्यात प्रदूषणामुळे नायट्रेट आणि फॉस्फेटसारख्या पोषकतत्त्वांचे प्रमाण अधिक असल्याने विषारी शैवाल अतिप्रमाणात वाढते, त्यामुळेही ऑक्सिजन कमतरता निर्माण होते. सागराच्या वरच्या १ किमी भागामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. याच भागात जास्तीत जास्त सागरी प्रजाती असतात. या सजीवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी जैवभूरसायनचक्र आणि प्रजाती वितरण या दोहोंत बदल होतात. या बदलांचा संपूर्ण सागरी परिसंस्थेवर परिणाम होतो. प्रादेशिक किनारपट्टीच्या पाण्यात ऑक्सिजन स्तर कमी झाल्याने जैवविविधता आणि अधिवासांवर परिणाम होतो.

महासागरातील तापमानवाढ कमी करण्यासाठी कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन तात्काळ कमी केले जाणे आवश्यक आहे. तसेच, शेती आणि सांडपाणी या दोन्हींमधून पोषकतत्त्वांचा होणारा निचरा थांबवण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून किनाऱ्यावरून वाहून येणाऱ्या पाण्यातील पोषकद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन विषारी शैवाल वाढीस आळा बसेल.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 00:02 IST
ताज्या बातम्या