मराठी विज्ञान परिषदेतर्फे ‘लोकसत्ता’साठी संयोजित करण्यात येत असलेल्या ‘कुतूहल’ सदराचे २०२५ हे विसावे वर्ष आहे. गेली १९ वर्षे दरवर्षी एकेक विज्ञानशाखा घेऊन त्यावर वर्षभरात सुमारे २५५ लेख छापून आले. या वर्षी भूविज्ञान हा विषय निवडला होता. त्याची सुरुवातही दिमाखात झाली होती. पण भौतिकविज्ञान, रसायनविज्ञान, वनस्पतीविज्ञान अशा काही विज्ञानशाखांमधल्या तज्ज्ञांच्या तुलनेत पुरातत्त्वविज्ञान, मानववंशशास्त्र (अँथ्रपॉलॉजी) आणि भूविज्ञान अशा विषयांमधल्या तज्ज्ञांची संख्या खूपच कमी असते. त्यामुळे पुरेसे लेख येऊ शकले नाहीत. शेवटी हा विषय जूनअखेर थांबवावा असा निर्णय घ्यावा लागला. आता १ जुलैपासून सहा महिने ‘सूक्ष्मजीवविज्ञान’ या विषयावर लेख येणार आहेत.
भूविज्ञान हा विषय सहा महिनेच चालला, तरी वाचक-प्रतिसाद चांगला होता. पहिल्याच लेखात ‘हजारो वर्षांचे जुने भूजलही वापरता येते’ असा उल्लेख आल्याने विनायक जाधव यांनी इतके जुने पाणी पिण्यायोग्य असते का असे विचारले होते. त्यांना असे कळवण्यात आले, की भूजल किती जुने आहे यावरून ते पिण्यायोग्य आहे की नाही हे ठरत नाही. ते प्रदूषित नसेल तर पिण्यायोग्यच असते. अर्सेनिक, पारा अशा मूलद्रव्यांची खनिजे भूजलात मिसळली तर भूजलाचे रासायनिक प्रदूषण होते; किंवा भूजलात घातक सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव झाला तर जैव प्रदूषण होते. प्रदूषण झाले नसेल तर ते भूजल पिण्यायोग्य असते.
अरविंद आवटी यांनी डॉ. दाराशॉ वाडिया यांच्यावरील लेखात त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अधिक माहिती हवी होती असे म्हटले होते. विवेक चव्हाण आणि कविता जोशी यांनी ‘किरणोत्सारी खनिजे’ लेखातील पोटॅशियमच्या उल्लेखाबाबत चर्चा केली होती. श्रीकांत बाळकृष्ण जोशी यांनी ‘दोन प्रतिमा दाखवणारे अद्भुत खनिज’ या लेखाबाबत, तर अशोक आचरेकर यांना डॉ. फर्डिनांड स्टॉलिक्ज्का यांच्यावरील लेखाबाबत शंका विचारल्या होत्या. धोंडीराम पाटील यांनी ‘समुद्राला न मिळणारी नदीह्ण हा लेख वाचल्यानंतर महाराष्ट्रातील नद्यांची एकत्रित माहिती कुठे मिळेल याची पृच्छा केली होती. ‘महाराष्ट्रातील नद्या’ हे श्रीकांत तापीकर यांचे पुस्तक उपलब्ध असल्याचे त्यांना कळवण्यात आले होते.
वानगीदाखल उल्लेख केलेल्या या पत्रातून लक्षात येते की हे सदर ‘लोकसत्ता’चे वाचक जागरूकपणे वाचतात. वाचल्यावर पडलेल्या प्रश्नाची उत्तरे मराठी विज्ञान परिषदेला पत्र लिहून मिळवतात. प्रसंगी एखादी चूकही परखडपणे दाखवतात.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org