डॉ. नंदिनी विनय देशमुख

‘हॉटन्टटोंटा’ किंवा ‘मेसोबथस टॅम्युलस’ असे विचित्र नाव धारण करणारा प्राणी आपल्या सगळय़ांना विंचू म्हणून चांगल्याच परिचयाचा आहे. भारतातल्या या विंचवाला ‘इंडियन रेड स्कॉर्पिअन’ म्हणतात. नावाप्रमाणे हा पूर्ण लाल रंगाचा नसून याला मातकट, हिरवट झाक असते. हा विषारी विंचू उत्तर कोकणात सापडतो. त्याच्या शेपटीच्या टोकाशी असणाऱ्या नांगीत विष असते. आपली शेपटी उलटी वळवून विंचू शक्यतो स्वसंरक्षणासाठी डंख मारतात. मांसाहारी असणारे हे विंचू रात्रीच्या अंधारात छोटे कीटक, पाली, झुरळे आणि उंदराची पिल्ले खातात. एक ते तीन वर्षांचे विंचू प्रजनन करतात, क्वचित फलन न करताही (पार्थेनोजेनेसीस पद्धतीने) पिल्ले निर्माण करतात. विंचवाच्या नर-मादीचा प्रणयाराधनाचा ‘बॉल डान्स’ सारखा भासणारा नाच खूप प्रसिद्ध आहे. मात्र बऱ्याचदा नराने शुक्राणू स्खलित केल्यावर मादी त्याला खाऊन टाकते. मादी पिल्लांना जन्म देते. ही पिल्ले काही काळासाठी आईच्या पाठीवर बसून असतात. ‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ म्हणूनच म्हटले जात असावे. पांढरट दिसणारी ही बाळे थोडी मोठी झाल्यावर आईलाच कुरतडून खातात आणि तिचा बळी घेतात.

विंचवावर पाय पडल्यास किंवा त्याला डिवचल्यास तो माणसाच्या शरीरात नांगीवाटे विष सोडतो. लहान बालकांवर त्वरित उपचार न केल्यास त्यांचा मृत्यू होतो. नांगी मारलेल्या ठिकाणी तीव्र वेदना होणे, उलटी होणे, घाम फुटणे, श्वासास अवरोध, रक्तदाबावर नियंत्रण न राहणे, हृदयाची अतिवेगाने धडधड वाढणे अशा लक्षणांनी विंचूदंश झाला आहे, हे समजते. या विषावर प्रतिकार करणारे परिणामकारक प्रतिविष इंजेक्शन अद्याप उपलब्ध नाही, मात्र प्राझोसीन या औषधाने मृत्यूचे प्रमाण खूप कमी झाले आहे. या शोधाचे श्रेय डॉ. हिम्मतराव बावस्कर यांना जाते. विंचू चावलेल्या व्यक्तीचे हृदय आणि फुप्फुसे यांच्या कार्यावर सतत लक्ष ठेवावे लागते. फुप्फुसाला सूज येऊन श्वासोच्छवासात अडथळा येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण या औषधोपचाराने खूप कमी झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विंचवाच्या नांगीत जे विष असते त्यात पोटॅशिअम वाहिनी बंद करणारी पेप्टाईडस असतात. त्यांचा वापर हृमॅटॉईड संधिवात आणि एकाधिक स्केलोरीस अशा ऑटोइम्युन रोगांवर केला जातो. शिवाय कर्करोगाच्या उपचारांत, त्वचा रोगांत आणि हिवतापविरोधी औषधे करण्यासाठी यातील विषद्रव्यांचा वापर केला जातो. काही ठिकाणी विंचू पाळले जातात. तर काही ठिकाणी त्यांचे कृत्रिमरीत्या प्रजनन करून त्यांना वैद्यकीय संशोधनासाठी प्रयोगशाळेत ठेवले जाते.