scorecardresearch

कुतूहल : सागराचे विभाग

अपतटी विभाग हा खुल्या सागराचा किनाऱ्यापासून दूर असलेला मोकळय़ा पाण्याचा सर्वात वरचा भाग होय.

kutuhal sea dep
कुतूहल : सागराचे विभाग

प्राचार्य डॉ. किशोर पवार

सागराची परिसंस्था प्रामुख्याने दोन प्रकारांत विभागली जाते. पृष्ठभागाजवळील आणि पाण्याच्या खुल्या स्तंभातील अपतटी (पेलॅजिक) विभाग आणि खोल तळातील किंवा भूभागाशी संपर्कात असलेला तलस्थ (बेंथिक) विभाग.

अपतटी विभाग हा खुल्या सागराचा किनाऱ्यापासून दूर असलेला मोकळय़ा पाण्याचा सर्वात वरचा भाग होय. येथे सागरी जीव मुक्तपणे पोहू शकतात. या विभागातल्या वरच्या थरांत भरपूर सूर्यप्रकाश असतो. येथे सूर्याची उष्णता शोषून घेतली जाते. तसेच हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळतो. वनस्पतीप्लवकांद्वारे प्रकाशसंश्लेषण होत असते. इतर स्वयंपोषी जसे सूक्ष्मजीव डायटम्स आणि विविध शैवाल प्रजाती व समुद्रतण इत्यादीदेखील अन्न तयार करतात. अपतटी विभाग समुद्री जीवांसाठी पोषक मानला जातो. म्हणूनच इथे वनस्पती व प्राणी मोठय़ा संख्येने आढळतात. अन्ननिर्मिती करणाऱ्या वनस्पतींच्या उपलब्धतेमुळे त्यांच्यावर उपजीविका करणारे शाकाहारी प्राणी व मांसाहारी प्राणी या विभागात अत्यंत सक्रिय असतात. सागरी अन्नसाखळी येथे सुव्यवस्थितपणे कार्यरत असते. या विभागात क्रील, कोपेपोडस, जेलीफिश, रोटीफर्स, स्थलांतरित मासे, शिकारी मासे, पाणसाप, समुद्री कासवे, सागरी पक्षी, सागरी सस्तन प्राणी जसे डॉल्फिन, व्हेल इत्यादी मोठय़ा प्रमाणात असतात. अपतटी परिसंस्था ही वनस्पतीजन्य प्लवकांवर आधारित असते. मासेमारीचे क्षेत्रदेखील येथेच जास्त प्रमाणात असते. सागरी दळणवळण याच भागावर अवलंबून असते.

 परंतु अपतटी विभागाच्या खालच्या थरांत मात्र प्रकाश, ऑक्सिजन व तापमान कमी होत जाते व पाण्याचा दाब मात्र वाढत जातो. या विभागाला तलस्थ विभाग म्हणतात. तलस्थ विभाग दोन प्रकारचा असतो. समुद्राच्या खोल तळाचा भाग आणि  त्याचप्रमाणे किनाऱ्यानजीकचा भूभाग. किनाऱ्याच्या तलस्थ भागात वास्तव्य करणारे विविध संधिपाद, मृदुकाय जीव ओहोटीच्या वेळीदेखील दृष्टीस पडतात. सागरतळाच्या खोल भागात सूर्यप्रकाश नसल्यामुळे येथे स्वयंपोषी सजीव नसतात. ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते. सागरतळावरच्या या तलस्थ प्राण्यांत विविध प्रकारची अनुकूलने आढळतात. त्यामुळे येथील सजीव वरच्या विभागातून आलेल्या मृत व विघटित सेंद्रिय पदार्थावर अन्नासाठी अवलंबून राहतात. त्यांना स्वच्छताकर्मी जीव असे म्हणता येईल. तलस्थ प्राणी म्हणजे विविध कंटकचर्मी, जसे तारामासा, भंगुर तारामासा, समुद्र काकडी, विविध मृदुकाय शिंपले, शंख आणि संधिपाद शेवंडे, कोळंबीच्या अनेक प्रजाती तसेच काही प्रकारच्या लेपटय़ांसारख्या माशांच्या प्रजाती येथे आढळतात.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या