सागर विज्ञानाचे महत्त्वाचे पैलू म्हणजे मासेमारी आणि मत्स्यशेती. मासेमारी या संज्ञेत गोडे, निमखारे व समुद्री पाण्यातील मासे व इतर जलचर यांना पाण्यातून जिवंत/मृत अवस्थेत बाहेर काढणे अभिप्रेत आहे. गळाने, काठीने, हाताने वेचून, विविध प्रकारच्या जाळय़ांनी (फेकीचे, स्थिर रोवलेले पडद्यासारखे, होडी चालवत ठरावीक क्षेत्र व्यापणारे, रापण, बोक्शी, वाणा, जलमध्यावर वा तळावर चालणारी यांत्रिक, इ.) वा आवाज, प्रकाश, वीज यांच्या धक्क्याने जलचर मारले/पकडले जातात.
मासेमारीचे पारंपरिक व आधुनिक असे दोन प्रकार ढोबळमानाने होतात. कमीतकमी कृत्रिम ज्ञान-तंत्रज्ञान-साधनांचा वापर हा पारंपरिक मच्छीमारीत केला जातो. पगोळी (खेकडे पकडायचे), बोक्शी (खाडीतील छोटे), वाणा (नदी, खाडीतील भरती-ओहोटीवर चालणारे), रापण (मानवी संघाने समुद्रातून ओढून काढलेले) अशा जुन्या पद्धती आज क्वचितच आढळतात. यांत्रिकतेने कार्यरत छत्रीजाळी (चायनीज डीपनेट), ओढजाळी (ट्रॉलर) ही आधुनिक प्रकारची उदाहरणे. प्रगत तंत्रज्ञानाने मासेमारीचा आवाका वाढल्याने उत्पन्न वाढले; मात्र, स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक नुकसान व पर्यावरणाची हानीही वाढली.
जागतिक पातळीवर वर्तमानात एकूण मत्स्योत्पादन साडेअठरा कोटी मे. टन असून त्यातील मासेमारीचा वाटा ५१% आहे (४९% मत्स्यशेती उत्पादन). भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर (जगाच्या ८% हून अधिक) असून मासेमारी उत्पादन जवळपास १/३ प्रमाणात आहे (एकूण १.६४ कोटी टन, मत्स्यशेती १.२ कोटी टन). भारतावर ही वेळ आली याला कारण अतिप्रमाणावर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने, निसर्गाचा-मानवी भविष्याचा सारासार विचार न करता केलेली (विशेषत: समुद्रातील) मच्छीमारी. पारंपरिक व आधुनिक पद्धतींची सांगड घालून, पर्यावरण-रक्षणाकडे खास लक्ष देऊन, जिवंत अंडीधारी माद्या व लहान शिशू जाळय़ात आलेच तर त्यांना पुन्हा पाण्यात सोडून देणे, जाळयांचा आस (प्रत्येक छिद्राचा व्यास) पकडीच्या माशांच्या प्रकारानुसार ठेवणे, इ. बाबींचा अवलंब केल्यास मासेमारी सर्वार्थाने लाभदायी ठरेल. वातावरण-बदल, पृथ्वीचे वाढते तापमान याचाही जलचर-उत्पादनावर व पर्यायाने, मासेमारीवर विपरीत परिणाम होतो.
स्थानिक पातळीवर, आपले राज्य मासेमारीत देशात सातवे असून त्यापैकी निम्म्याहून अधिक वाटा हा आपल्या मुंबईचा आहे. मुंबईत भाऊचा धक्का, ससून डॉक, वर्सोवा ही मासे उतरवण्याची महत्त्वाची ठिकाणे आहेत. तसेच अर्नाळा, भाईंदर, सातपाटी अशा ठिकाणीदेखील महत्त्वाची केंद्रे आहेत.
डॉ. प्रसाद कर्णिक ,मराठी विज्ञान परिषद