डॉ. श्वेता चिटणीस, मराठी विज्ञान परिषद
जगभरातील डॉल्फिनच्या अनेक प्रजातींपैकी ‘डेल्फिनस डेल्फिस’ ही प्रजाती ध्रुवीय प्रदेश वगळता उष्ण, समशीतोष्ण आणि शीत समुद्रांत, तसेच मोठय़ा नद्यांत, सरोवरांत किंवा खाडीमध्ये आढळते. हे निरुपद्रवी आणि खेळकर प्राणी समूहाने राहतात. त्यांची कर्णेद्रिये उत्तम असतात. डॉल्फिन एकमेकांशी शिट्टय़ा वाजवून किंवा कमी कंप्रता (फ्रिक्वेन्सी) असणाऱ्या आवाजाच्या ध्वनी लहरी व प्रतिध्वनी यांच्या माध्यमातून संपर्क साधतात. डॉल्फिनमध्ये संवादासाठी भाषा असावी असाही कयास आहे. समुद्रातील जहाजे व मासेमारी करणाऱ्या बोटींमुळे ध्वनिप्रदूषण होते. त्यामुळे प्रतिध्वनीत अडथळे निर्माण होतात आणि त्याचा डॉल्फिनच्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो. तसेच भक्ष्य शोधतानाही अडथळे येतात. ‘प्रतिध्वनी स्थान निर्धारण’ (इको लोकेशन) पद्धतीने डॉल्फिन भक्ष्य मिळवतात.




अनेक देशांत डॉल्फिनला मानवाच्या मनोरंजनासाठी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून पकडून मत्स्यालयात बंदिस्त करतात. डेन्मार्कमधील अर्ध स्वायत्त असलेल्या फेरोद्वीप समूहात या प्राण्यांची निर्घृण हत्या करण्याची ‘डॉल्फिन ग्राइंड’ ही जुनी प्रथा आहे. १२ सप्टेंबर २०२१ रोजी एकाच वेळी एक हजार ४२८ श्वेत अटलांटिक डॉल्फिनची निर्घृण कत्तल केली गेली. संपूर्ण किनारी प्रदेश त्यांच्या रक्ताने लाल झाला. त्यांच्या स्मरणार्थ अनेक प्राणीप्रेमी संघटना एकत्र आल्या. अशा क्रूर आणि मूर्ख परंपरा बंद करून त्याऐवजी डॉल्फिनच्या संरक्षण, संवर्धनासाठी क्रियाशील व्हावे यासाठी ‘१२ सप्टेंबर’ हा दिवस ‘जागतिक डॉल्फिन दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध स्तरांवरून या परंपरेविरोधात दबाव आणला जात आहे. मानवाने या निष्पाप सागरी जीवांना आपले सहचर मानावे, असे अनेक संघटनांचे मत आहे.
अनेकदा डॉल्फिनची मासेमारीच्या जाळय़ात चुकून धरपकड होते. तरी भारतीय मच्छीमार त्यांना देवाचा अवतार मानत असल्याने, जाळय़ात आलेल्या डॉल्फिनला जीवदान देतात. अन्यथा पाश्चिमात्य देशांत यांची मांसासाठी आणि चरबीसाठी शिकार केली जाते. भारतात २०१० मध्ये डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले गेले. त्यानंतर ५ ऑक्टोबरला राष्ट्रीय डॉल्फिन दिन साजरा करण्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे नियोजन आहे. गंगेतील डॉल्फिनच्या संवर्धनाबद्दल जनसामान्यांत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.