नारायण वाडदेकर
दरवर्षी २२ एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन साजरा होतो. २०२३च्या त्रेपन्नाव्या पृथ्वी दिनाचे कार्यक्रमसूत्र, ‘पृथ्वी आपले घर आहे त्यात गुंतवणूक करा,’ असे घोषित झाले आहे. जगातील सर्वात मोठा जनजागरणाचा कार्यक्रम, असे या दिवसाचे वर्णन केले जाते.
अमेरिकेच्या सांता बार्बारातील तेलगळती पीडितांनी पृथ्वीवरचे जीवन वाचवण्यासाठी ‘२२ एप्रिल’ वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना प्रथम १९७० मध्ये मांडली. ती सर्वमान्य होऊन पहिल्या वर्षी त्यात २० लाख लोक सहभागी झाले. ही संख्या आता एक अब्जाहून जास्त झाली आहे. वसुंधरा दिनानिमित्तच्या देशोदेशींच्या कार्यक्रमांची अधिकृत माहिती आंतरजालावर (https:// http://www.earthday.org) देतात. वन्यप्राणी निधीसारख्या स्वयंसेवी संस्थादेखील कार्यक्रमांत सहभागी होतात.
या दिवशी शैक्षणिक संस्था, विविध गट, मंडळांतर्फे पृथ्वीच्या संरक्षणासाठीचे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘‘आपण सामान्य लोक काय करणार? शासनाने ही जबाबदारी घ्यावी’’ हा प्रचलित दृष्टिकोन बदलण्यासाठी पर्यावरण आणि परिस्थितीकी शास्त्राचे ज्ञान दिले जाते. जसे प्रत्येकजण आपले घर व्यवस्थित ठेवतो, तसेच त्याने पृथ्वी चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी काळजी घ्यावी हे यमनिमित्ताने अधोरेखित केले जाते. शाश्वत जीवनपद्धती संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. हवामान बदलाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचत, हरितीकरण, प्रदूषणमुक्त परिसर, घनकचरा व्यवस्थापन अशा साध्या आणि सहज करता येतील अशा उपायांबद्दल जाणीवजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
सध्या आपल्याला मिळालेल्या अंतराळाबद्दलच्या माहितीनुसार जीवसृष्टी असणारा पृथ्वी हा एकच ग्रह आपल्याला वास्तव्यासाठी उपलब्ध आहे. पर्याय नसाल्याने आपण इथेच काळजीपूर्वक शाश्वतरीत्या राहणे गरजेचे आहे. विनाकारण अतिप्रमाणात साधनसंपदा वापरून आपण प्रदूषणाचे डोंगर निर्माण करत आहोत. त्यामुळे इतर जैवविविधता धोक्यात येत आहे. विकासाच्या अनेक कल्पनांनी आपण निसर्गाची रचना बदलून टाकतो. मग निसर्गही त्याला वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देतो. त्यामुळे मानवाचे जीवन खडतर होते. ऊर्जा बचत करणे; सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय वापरणे; प्लास्टिक, थर्मोकोल किमान वा न वापरणे; वस्तूंचा पुनर्वापर, यांचा आग्रह धरणे एवढे तरी आपण सहजच करू शकतो.