नवदेशांचा उदयास्त : किर्गिजस्तान

किर्गिजस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावरसुद्धा यापूर्वीच्या ४० टोळ्यांचे प्रतीक म्हणून सूर्याभोवती ४० किरणे चित्रित केली आहेत

सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

किर्गिजस्तान हा मध्य आशियातला देश आणि बिश्केक ही त्याची राजधानी. ही दोन्ही नावे आपल्याकडच्या बहुतांश लोकांनी कधी ऐकली नसतील! अलीकडच्या काळात ३१ ऑगस्ट १९९१ रोजी किर्गिजस्तानचे प्रजासत्ताक सोव्हिएत युनियनमधून बाहेर पडले आणि स्वतंत्र, स्वायत्त प्रजासत्ताक किर्गिजस्तान अस्तित्वात आले. पूर्वीच्या सोव्हिएत युनियनमधील हे सर्वात गरीब राष्ट्र. मध्य आशियातील सध्याच्या गरीब राष्ट्रांमध्ये ताजिकिस्ताननंतर या राष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. साधारणत: येथील २३ टक्के जनता दारिद्रय़रेषेखाली जगते आहे.

सर्व बाजूंनी भूवेष्टित असलेल्या किर्गिजस्तानच्या पूर्वेला चीन, उत्तरेस कजाकस्तान, पश्चिमेस उझबेकिस्तान, दक्षिणेस ताजिकिस्तान अशा याच्या चतु:सीमा आहेत. या देशाचे वैशिष्टय़ म्हणजे याच्या दोन लाख चौ.कि.मी. क्षेत्रफळाच्या भूप्रदेशापैकी फक्त उत्तरेतील आठ टक्के जमीन लागवडीखाली आहे. किर्गिजस्तानचा साधारणत: ८० टक्के प्रदेश तियान शान पर्वतरांगांनी व्याप्त आहे. या पर्वतीय प्रदेशात असलेल्या अनेक सरोवरांमुळे हा प्रदेश निसर्गसुंदर बनलाय. युरोपीयन लोक किर्गिजस्तानला ‘स्वित्झर्लण्ड ऑफ सेंट्रल एशिया’ म्हणतात! किर्गिजस्तान हा शब्द किर्गिझ आणि स्तान या दोन शब्दांचा मिळून बनलाय. किर्गिझ या तुर्की शब्दाचा अर्थ आहे ४०. स्तान या इराणी शब्दाचा अर्थ आहे वसतिस्थान. मध्ययुगीन काळात या प्रदेशात लोक टोळ्याटोळ्यांनी राहत होते. मनास नावाच्या वीराने त्यापैकी ४० टोळ्यांचे संगनमत करून आक्रमकांना धूळ चारली. या घटनेला उद्देशून या प्रदेशाचे नाव किर्गिजस्तान झाले. किर्गिझ या शब्द येथे ‘आम्ही ४० जण’ अशा अर्थाने आहे. किर्गिजस्तानच्या राष्ट्रीय ध्वजावरसुद्धा यापूर्वीच्या ४० टोळ्यांचे प्रतीक म्हणून सूर्याभोवती ४० किरणे चित्रित केली आहेत. ६६ लाख लोकवस्तीच्या किर्गिजस्तानमध्ये किर्गिझ या तुर्की वांशिक लोकांशिवाय रशियन, उझबेक, ताजिक वगैरे अनेक वंशांचे लोक राहतात. बहुसंख्येने म्हणजे ९० टक्के लोकवस्ती सुन्नी इस्लामधर्मीय, आठ टक्के ख्रि्रश्चनधर्मीय आणि उर्वरित दोन टक्क्यांमध्ये बहाई, ज्यू, बौद्ध असूनही हा देश निधर्मी आहे. अनेक दशके सोव्हिएत कम्युनिस्ट अमलाखाली राहिल्याने हे लोक सार्वजनिक क्षेत्रांमध्ये निधर्मी असले तरी गेल्या काही वर्षांपासून इस्लामी आक्रमक वृत्ती प्रबळ होत चाललेल्या दिसत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Kyrgyzstan country in central asia zws

ताज्या बातम्या