scorecardresearch

कुतूहल : लाखेचा किडा

लॅसीफर लॅक्का (Laccifer lacca) किंवा केरींया लॅक्का (Kerria lacca) या कीटकाची मादी लाखेची, तसेच मेणाची निर्मिती करते, हाच तो भारतीय लाखेचा किडा!

पांडवांचे जळालेले लाक्षागृह पुराणात प्रसिद्ध होते. तीच लाख  महत्त्वाच्या टपालावरही आपण पाहतो. ही लाख नक्की काय असते? लाखेचा किडा हा भारत आणि थायलंडमधील निरनिराळ्या  ४०० प्रकारच्या  जंगली वृक्षांवर आढळतो.  पळस, कुसुम आणि बोराच्या झाडांवर यांचे वास्तव्य अधिक असते. लॅसीफर लॅक्का (Laccifer lacca) किंवा केरींया लॅक्का (Kerria lacca) या कीटकाची मादी लाखेची, तसेच मेणाची निर्मिती करते, हाच तो भारतीय लाखेचा किडा!  यांच्या  जीवनचक्रात पहिली अवस्था ‘क्रॉलर्स’ किंवा  अळीची असते. या  अळ्या यजमान झाडाच्या फांद्याच्या अंत:परिकाष्ठ  (phloem)  भागात शिरून पोषण मिळवतात. या शिरकावाच्या वेळी पडणाऱ्या छिद्रांना बुजवण्यासाठी त्यांच्या शरीर उत्सर्जनातून लाख निर्माण होते.

लाख-कीटकाची मादी, वृक्षाच्या खोडांवर, फांद्या-फांद्यांवर पसरत जाणाऱ्या बोगदेवजा नळ्या तयार करते. या नळ्यांना ‘ककूनर’ किंवा कोशही म्हटले जाते  एक किलो लाख तयार करण्यासाठी ५० हजार ते लाखभर कीटकांची गरज असते. लक्षावधी कीटक एकत्र येऊन लाख तयार होते. यावरून ‘लाख’ हा केवळ भारतीय गणनेत वापरला जाणारा शब्द तयार झाला असावा, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे.

या वृक्षांची साल आणि त्यावरचे लाखेचे किडे खरवडून काढले जातात. नंतर त्यांना मोठ्या  कॅनव्हासच्या नळ्यांमध्ये ठेवून आगीत गरम केले जाते. यामुळे लाख वितळते आणि कॅनव्हासमधून बाहेर पडते, कॅनव्हासच्या नळ्यात किडे आणि झाडाच्या सालीचे तुकडे अडकून राहतात. हा जाडसर द्रव नंतर पसरट भांड्यात टाकून वाळवला जातो. त्यापासून लाखेचे पसरट थर बनवतात आणि त्यापासून जशी आवश्यकता असते तसे त्याला स्वरूप देतात. याच लाखेची पूड  ईथाइल अल्कोहोलमध्ये विरघळवून द्रवरूप लाख देखील बनवता येते. रंग, चकाकी देणारे वार्निश, प्रायमर, विद्युत उपकरणात, सरकारी दस्ताऐवजात बंधक अशा अनेक ठिकाणी लाखेचा वापर केला जातो. १९५०च्या अगोदर ग्रामोफोन रेकॉर्ड लाखेच्या असत. नंतर मात्र त्या विनाईलपासून बनवल्या जाऊ लागल्या. एकोणिसाव्या शतकात तेल आणि मेणाची जागा लाख घेऊ लागली.

लाख हे नैसर्गिक पॉलीमर असून त्यात हायड्रॉक्सी मेदाम्ले ‘(अ‍ॅल्युरिटिक’ आणि ‘सेसक्वीटरपेनिक आम्ल’) असतात.  लाखेच्या व्यवसायात आजही भारत आघाडीवर आहे. जगभरातील अर्धी लाख आपल्या देशामध्येच तयार होते. 

– डॉ. नंदिनी विनय देशमुख

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipa.org

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Laccifer lacca kerria lacca phloem akp

ताज्या बातम्या