भाषा ही ध्वनिरूप असते, ती श्राव्य असते. उच्चार हा भाषेच्या अस्तित्वाचा पुरावा आहे, हे जरी खरे असले, तरी ध्वनी हे क्षणभंगुर असतात. आपण बोलत असताना ते हवेत विरून जातात. आपले विचार, कल्पना, भाव चिरकाल टिकावेत, समकालीनांनाच नव्हे, तर पुढच्या पिढय़ांनाही ते कळावेत, या जाणिवेतूनच लेखनाचा जन्म झाला. लेखन हे चिरकाल, स्थिर स्वरूपाचे असते. ते प्रदीर्घ काळापर्यंत उपलब्ध होऊ शकते.
मराठी भाषेच्या संदर्भात विचार करताना हे लक्षात घेतले पाहिजे, की मराठी भाषक मराठीची कोणती तरी बोली बोलत असतात. त्या बोलींमध्ये विविधता असते; मात्र त्या अशुद्ध असतात, असे म्हणणे अयोग्य आहे. पण ‘आपण बोलतो तसेच लिहिणार’ असा आग्रह धरणे चुकीचे आहे. (औपचारिक लेखन म्हणजे वैचारिक, वैज्ञानिक, शास्त्रीय लेखन, ललितेतर साहित्य, रस्त्यावरच्या पाटय़ा, वर्तमानपत्रे (बातम्या, संपादकीय इ.), मासिके, शासकीय पत्रव्यवहार इ.) या लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करणे आवश्यक आहे. प्रमाणभाषा ही एक संकल्पनाच आहे. मराठी भाषा बोलणारे प्रमाणभाषा बोलत नाहीत, मात्र औपचारिक लेखनात प्रमाणभाषेचाच वापर करायला हवा. या प्रमाणभाषेच्या लेखनात एकवाक्यता यावी, म्हणून तज्ज्ञ समितीने सुचवलेले आणि शासनाने मान्य केलेले नियम सर्व मराठी लेखकांनी पाळणे आवश्यक आहे. लेखनातील ही स्थिरता अत्यंत आवश्यक आहे, याचे भान आपण ठेवणे महत्त्वाचे आहे. औपचारिक लेखनात कोणालाही मनमानी करता येणार नाही.
मराठी आपल्या महाराष्ट्रातील लोकांची मातृभाषा आहे. तिचे संरक्षण, संवर्धन करणे मराठी भाषकांचे- विशेषत: सुशिक्षितांचे, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्या भाषेचे जे प्रदूषण होत आहे ते दु:खदायक आहे. शब्द, वाक्यरचना, अर्थ या संदर्भात चुका होणार नाहीत, याची दक्षता आपण घ्यायला हवी, पण दुर्दैवाने आपणच आपल्या भाषेची मोडतोड करतो, बोलण्यात, लिहिण्यात होणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष करतो, इतकेच नव्हे, तर त्या स्वीकारतोही! भाषेचे हे हाल थांबवणे व तिची जपणूक करणे ही आपली जबाबदारी आहे. या दृष्टीने ‘लोकसत्ता’ने भाषारक्षणाचा हा नवा उपक्रम या नव्या वर्षांत करण्याचा निर्धार केला आहे.
– यास्मिन शेख