डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

विशिष्ट प्रकारची भाषा अनेक प्राणीदेखील वापरत असतात. इथं धोका आहे, प्रतिस्पर्धी जवळ आहे, सावज कुठं आहे.. अशा प्रकारच्या काही गोष्टी सांगण्यासाठी प्राणी वेगवेगळ्या पद्धतीनं संवाद साधत असतात. परंतु हा संवाद केवळ काही सूचनांपुरताच मर्यादित आहे. अन्न, अस्तित्व, प्रजोत्पादन अशा मूलभूत गोष्टींशी तो संबंधित आहे.

परंतु मानवाच्या मेंदूमध्ये भाषेला विशिष्ट स्थान आहे. अतिशय गुंतागुंतीची अशी भाषा माणूस वापरतो. सुरुवातीच्या काळात माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा ठळकपणे वेगळा झाला, त्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे त्याची भाषा!

आजवरच्या संशोधनानुसार सुमारे दीड ते दोन लाख वर्षांपूर्वीपासून माणूस भाषा वापरत आला आहे. सर्वप्रथम होमोसेपियननं काहीएक प्रमाणात वाक्यं वापरून बोलायला- म्हणजेच भाषा वापरायला- सुरुवात केली, असा अंदाज आहे. अन्न, अस्तित्व आणि प्रजोत्पादन यासंबंधीच्या सूचना होमोसेपियन्स देत असतीलच. परंतु त्याशिवाय आश्रय घेण्याच्या जागा, हत्यारं, अंगावर घालण्याची आवरणं यासाठी वेगवेगळे विशिष्ट शब्द अस्तित्वात येऊन वेगवेगळ्या शब्दांची संख्या वाढली असणार. प्राण्यांपेक्षा त्यांचं राहणीमान हे अधिक गुंतागुंतीचं होतं. त्यामुळे तशा प्रकारच्या राहणीमानाशी संबंधित अशा नव्या नव्या शब्दांची गरज पडून ते शब्द व्यवहारांमध्ये रुळले असणार.

माणसामध्ये ‘लिम्बिक सिस्टीम’ म्हणजे भावनांचं केंद्र इतर प्राण्यांच्या तुलनेत विकसित अवस्थेत असल्यामुळे मूलभूत भावनांशी संबंधित मोजकी शब्दनिर्मिती आणि तिचा वापर केला जात असणार. याला जोड मिळाली ती ‘निओ कॉर्टेक्स’ या मेंदूतल्या प्रथिनांच्या आवरणाची. या आवरणामध्ये भाषेची क्षेत्रं विकसित झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणसाची भाषा समृद्ध होण्याची हीदेखील काही कारणं आहेत. होमोसेपियन्सच्या भाषेनं रचनात्मक रूप धारण केलं. आज आपण त्यात कर्ता, कर्म, क्रियापद वापरतो. मात्र, अगदी सुरुवातीच्या काळात काहीशा अशा प्रकारची त्रोटक का होईना, वाक्यरचना माणसाने केली व त्यामुळेच तो अनेक संकटांपासून दूर राहू शकला. इतरांना धोक्याची जास्त स्पष्ट व गुंतागुंतीच्या सूचनाही देऊ  शकला.