– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com

चौदाव्या शतकात लिथुआनियाचे राज्य इतके सामर्थ्यवान होते की, पोलंडच्या जनतेला अनेक वेळा लिथुआनियाची मदत घ्यावी लागे. अखेरीस पोलिश जनतेने लिथुआनियाच्या राजाने पोलंडचेही राजेपद स्वत:कडे घ्यावे असे सुचविले. त्याप्रमाणे पुढे १५६९ साली पोलंड आणि लिथुआनियाच्या राज्यकर्त्यांनी आपसात सोयरीक केली आणि त्यातून पोलंड-लिथुआनिया राष्ट्रकुल निर्माण झाले. दोन्हीकडील राज्यकर्त्यांनी आपसात संगनमताने कारभार केल्यामुळे हे विशाल साम्राज्य १७९५ पर्यंत दोन शतके टिकले. युरोपात अधिक लोकसंख्येच्या साम्राज्यांपैकी एक असलेले पोलिश-लिथुआनियन राष्ट्रकुल प्रामुख्याने कृषिप्रधान होते. या राष्ट्रकुलावर १७९२ ते १७९५ या काळात रशियन साम्राज्य, प्रशियन साम्राज्य आणि ऑस्ट्रियन साम्राज्याने हल्ले करून ते मोडकळीस आणले आणि त्याचा प्रदेश या तीन जेत्यांनी वाटून घेतला. यापैकी लिथुआनियाचा प्रदेश रशियन झार साम्राज्याच्या वर्चस्वाखाली गेला. रशियाने लिथुआनिया त्यांच्या ताब्यात आल्यावर त्याचे रूसीकरण सुरू केले. हे करताना रशियाच्या झारशाहीने लिथुआनियन भाषेवर बंदी घातली, १८६४ साली कॅथलिक ख्रिस्ती धार्मिक लोकांवर, त्यांच्या स्थानिक परंपरा पाळण्यास बंधने घातली. विरोध करणाऱ्या कॅथलिकांचे हत्यासत्र सुरू केले. पण रशियन राज्यकर्त्यांच्या या रूसीकरणाचे परिणाम उलटेच झाले! लिथुआनियन समाजात त्यांच्या राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली. रशियन सत्ताधाऱ्यांनी जसजसे लिथुआनियनांवर रशियन भाषा आणि संस्कृती लादण्याचा प्रयत्न केला तसतसे लिथुआनियन लोकांमध्ये अधिकाधिक अस्मिता, मातृभाषा प्रेम वाढत गेले! रशियनांनी शैक्षणिक संस्थांमधून रशियन भाषा सक्तीची करून स्थानिक लिथुआनियन भाषेवर बंदी घातली. लिथुआनियन वृत्तपत्रांवर आणि पुस्तकांवर बंदी घातली. परंतु हे झाल्यावर लिथुआनियन लोकांनी गुप्तपणे वृत्तपत्रे प्रसारित करून गुप्तपणे शाळाही भरवून आपले रूसीकरण होऊ दिले नाही. त्याचबरोबर रशियन साम्राज्याचे जोखड उतरवून आपले एक स्वायत्त, स्वतंत्र राष्ट्र बनविण्याचा विचार काही लिथुआनियन तरुणांच्या मनात मूळ धरू लागली. पुढे पहिल्या महायुद्धात जर्मनांनी रशियन साम्राज्य प्रदेशावर आक्रमण करून रशियनांना पराभूत केले. त्यामुळे संपूर्ण लिथुआनिया जर्मनीव्याप्त बनला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.