रॉकफेलर संस्थेची मुख्य शाखा न्यूयॉर्क शहरात आहे. रॉकफेलरचे व्यवसाय सल्लागार फ्रेडरिक टेलर गेट्स यांनी रॉकफेलरना प्रोत्साहित करून मानवजातीच्या भल्यासाठी व कायमस्वरूपी परोपकार करण्यासाठी १४ मे १९१३ रोजी न्यूयॉर्क सनदेच्या मंजुरीनंतर रॉकफेलर फाउंडेशनची स्थापना केली. यासाठी रॉकफेलर कुटुंबाने १९१३-१९२९च्या दरम्यान ८ अब्ज डॉलर्सचे आर्थिक साहाय्य केले. आज त्यांची गुंतवणूक २६ अब्ज डॉलर्स इतकी आहे. २०१७ सालापासून डॉक्टर राजीव शाह हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
या फाउंडेशनमध्ये सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि कला यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. रॉकफेलर फाउंडेशन आणि भारतीय वैद्याकीय संशोधन परिषद यांच्यामध्येसुद्धा सुरुवातीला भागीदारी होती. यातूनच पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणेची स्थापना झाली. २०२२ च्या अहवालानुसार जागतिक स्तरावर ३०व्या क्रमांकाचे हे सर्वांत मोठे फाऊंडेशन असून त्यांनी अब्जावधी डॉलर्सचे दान केले आहे. १९१७ मध्ये रॉकफेलर (ज्युनियर) फाउंडेशनचे अध्यक्ष झाले. जागतिक आरोग्य संघटना, नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थदेखील या फाउंडेशनच्या आरोग्य विभागाच्या निधीवर आधारित आहेत.
सुरुवातीला रॉकफेलर कुटुंबाने फाउंडेशनचे नेतृत्व केले, परंतु नंतर त्यांनी स्वत:ला एक किंवा दोन प्रतिनिधींपुरते मर्यादित केले. जॉन एफ. केनेडी आणि लिंडन बी. जॉन्सन या राष्ट्राध्यक्षांच्या काळात अमेरिकेचे ट्रेझरी सचिव सी. डग्लस डिलन हे फाउंडेशनचे अध्यक्ष होते. ५ डिसेंबर १९१३ रोजी, फाउंडेशनने अमेरिकन रेड क्रॉसला एक लाख डॉलर्सचे पहिले अनुदान दिले. जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या अमेरिकेतील पहिल्या दोन संस्थांची स्थापना केली.
१९२७ मध्ये टोरंटो विद्यापीठात ‘स्कूल ऑफ हायजीन’ आणि इंग्लंडमध्ये ‘लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन’ची स्थापना केली. अमेरिकेत आणि अन्य २१ देशांत सार्वजनिक आरोग्य शाळा विकसित करण्यासाठी २५ दशलक्ष डॉलर्स खर्च केले. १९१४ मध्ये, फाउंडेशनने चायना मेडिकल बोर्डची स्थापना करून १९२१मध्ये चीनमधील पहिले सार्वजनिक आरोग्य विद्यापीठ आणि बीजिंग युनियन मेडिकल कॉलेजची स्थापना केली. १९४९ मध्ये आंतरराष्ट्रीय फेलोशिपचा कार्यक्रम सुरू केला. अनेक युरोपीय देशांत मलेरिया, पिवळा ताप आणि हुकवर्मविरुद्ध मोहिमा राबवल्या. मानसोपचार, महिला गर्भनिरोधक आणि मानवी प्रजनन प्रणालीलासुद्धा त्यांनी निधी दिला. १९५०मध्ये, फाउंडेशनने विषाणू संशोधनाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विस्तार करून अनेक देशांत क्षेत्रीय प्रयोगशाळा स्थापन केल्या.
– डॉ. गजानन माळी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org