जगात जून १९८१ पर्यंत एड्स रोगाबद्दल, एचआयव्ही रोगकारकाबद्दल माहीत नव्हते. अमेरिकेत अनेक रुग्ण ‘कापोसी’च्या कर्करोगाने मरू लागले. ‘कापोसी’ बळींची संख्या १९८१अखेर ३३७ झाली. रोगनिदान वा उपचारांआधीच न्यूमोनियासारख्या रोगांनी केवळ सहा महिन्यांत यापैकी १३० जण दगावले. फ्रान्समधील ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’च्या फ्रान्स्वासिनूसी व ल्यूक मॉन्तानिये यांनी एचआयव्ही या एड्सकारक आरएनए विषाणूचा शोध १९८३ मध्ये लावला. त्यांना या संशोधनाबद्दल २००८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले.

१९८४ मध्ये ‘रॉबर्ट गॅलो’नी मेरिलँडच्या नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये एचआयव्ही-१ चे नमुने जमवले. टी-पेशी प्रयोगशाळेत एचआयव्ही-१ च्या प्रती बनवण्याची व्यवस्था लावली. पुढे हॉवर्ड टेमिन, डेव्हिड बाल्टिमोर यांच्या संशोधनामुळे हा एचआयव्ही ‘विरुद्धप्रतिलेखना’ने (रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज) स्वत:च्या प्रती बनवतो असे समजले. विरुद्धप्रतिलेखन म्हणजे सामान्यत: डीएनए केंद्रकाम्लधारी जीव हे डीएनएपासून आरएनए आणि आरएनएपासून प्रथिने बनवतात. याउलट एचआयव्ही हा ‘रेट्रो’ कुटुंबातील विषाणू मात्र आरएनए केंद्रकाम्लधारी असून विपरीत पद्धतीने रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या विकरामार्फत आरएनएपासून डीएनए बनवतो. एकदा ही या विषाणूची कार्यप्रणाली समजल्यावर त्याला निकामी करता येते.

एचआयव्ही विषाणू आपल्या शरीरातील विशिष्ट ‘पांढऱ्या पेशींत’, ‘टी-पेशी’त शिरून त्या मारतो. त्यांचे रक्तातील प्रमाण घटवून रोगप्रतिक्षमता कमकुवत करतो. परिणामी क्षयासारख्या रोगांना आपण बळी पडू शकतो. एड्स रोगावरील आधुनिक उपचारांत एकापेक्षा जास्त औषधे एकाच रुग्णस्नेही ‘कॉकटेल’ गोळीतून दिवसातून एकदाच रुग्णाला दिली जातात. ती विषाणूप्रभाव कमी करतात. एचआयव्ही विषाणू पेशीपटलाला चिकटू नये, चिकटलाच तरी पेशीपटलातून आत शिरू नये; आत गेला तरी त्याने आरएनएपासून डीएनए बनवू नये; जेणेकरून एचआयव्ही विषाणूसंख्या व घनता कमी राखली जावी, अशा प्रकारचे प्रयत्न सध्या चालू आहेत.

आधुनिक रोगोपचार पद्धतीत जनुकोपचार शक्य झाला आहे. विषाणू त्याच्या पृष्ठभागावरील प्रथिने (स्पाइक प्रोटीन्स) वापरून, पांढऱ्या पेशीच्या पृष्ठभागावरील सीडी-४ ग्राहकाद्वारे (रिसेप्टर) आणि सीसीआर-५ व सीएक्ससीआर-४ या सहग्राहकाद्वारे (को-रिसेप्टर) पांढऱ्या पेशीत (यजमान) प्रवेश करतात. म्हणून जनुकशास्त्रज्ञांनी सीसीआर-५ ला अवरोधक निर्माण केला. यामुळे विषाणू पांढऱ्या पेशीत प्रवेश करू शकणार नाहीत. ‘माराव्हिरॉक’ हे रसायन सध्या विषाणू अवरोधक म्हणून वापरले जाते. सीसीआर-५ हे जनुक कार्यरत नसलेल्या व्यक्तींना एड्स या रोगापासून नैसर्गिक संरक्षण मिळते.

नारायण वाडदेकर

मराठी विज्ञान परिषदई

मेल : office@mavipa.org