प्रत्येक शेअर बाजाराचे व्यवस्थापन हे एक ‘स्टॉक एक्सचेंज’ करते, ज्यामध्ये खरेदीची किंवा विक्रीची मागणी नोंदवणे, या मागण्या जुळवून व्यवहार (ट्रेड) घडवून आणणे, त्यानुसार पैसे वसूल करून त्या संसाधनाचे विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतर करणे वगैरे सुविधा वापरकर्त्यांना दिलेल्या असतात. २०२० मध्ये जगभरात ६० स्टॉक एक्सचेंजेस होती ज्यामध्ये सूचित कंपन्यांचे बाजारी भांडवलीकरण (मार्केट कॅपिटलायझेशन) ९३ ट्रिलियन डॉलर्स एवढे होते. इतक्या प्रचंड बाजारांचे नियंत्रण करण्यासाठी कायदे आहेत (उदा. भारतात सेबी अ‍ॅक्ट, डिपॉझिटरीज अ‍ॅक्ट इ.) आणि व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी शासकीय संस्थादेखील आहेत (उदा. भारतात सेबी). स्टॉक एक्सचेंजच्या संगणकांमध्ये खरेदी वा विक्रीची प्रत्येक मागणी, जुळलेला प्रत्येक व्यवहार (ट्रेड), मागणीतील दुरुस्त्या, रद्द केलेल्या मागण्या वगैरेंची विदा साठवलेली असते. इतक्या मोठय़ा प्रमाणावर पैसे खेळत असलेल्या शेअर बाजारांकडे घोटाळेबाजांचे लक्ष गेले नसते तरच नवल.

एखाद्या कंपनीच्या शेअरची रोजची किंमत बऱ्याच घटकांवर अवलंबून असते; उदा. नवीन कंत्राट, करार, उत्पादन वा परवाने, आर्थिक निकाल वगैरे. अंतस्थ माहीतगारांच्या माध्यमातूनही होणाऱ्या व्यवहारांतही (इनसायडर ट्रेडिंग) घोटाळे होतात. यात कंपनीतील अंतस्थ माहीतगार या गोपनीय माहितीचा (ती जाहीर होण्याआधी) वापर करून कंपनीचे शेअर खरेदी/ विक्री करून पैसे मिळवू शकतात. उदा., कंपनीला दोन दिवसांनंतर मोठे कंत्राट मिळणार असेल तर त्याविषयी आधीच माहिती असलेल्या व्यक्ती आज किंमत कमी असतानाच शेअर विकत घेऊन दोन दिवसांनंतर किंमत वाढल्यावर ते विकून नफा मिळवू शकतात. असे घोटाळे शोधण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. त्यात प्रथम भाषाआकलन तंत्रज्ञान वापरून अशा बातम्या शोधल्या जातात, ज्या प्रसिद्ध होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर एखाद्या कंपनीच्या शेअरच्या किमतीवर परिणाम झालेला दिसतो. मग या कालखंडातील या कंपनीचे ट्रेड तपासून असे लोक शोधले जातात ज्यांनी बराच नफा कमावला आहे. शेवटी या लोकांचा त्या कंपनीच्या अंतस्थाशी काही संबंध आहे का ते शोधले जाते. या सर्व पायऱ्या अचूकपणे करणे फार अवघड आहे त्यासाठी प्रचंड प्रमाणावर बातम्या आणि ट्रेड डेटा यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापरून सखोल विश्लेषण करावे लागते. तरीही सर्व घोटाळे शोधले जातीलच किंवा मिळालेले नमुनेही खरे घोटाळे असतील असे नाही. यातील संभाव्य नमुने निवडून त्यांबद्दल पुरावे जमवणे, चौकशी करणे आणि कारवाई करण्याची जबाबदारी अनुभवी तज्ज्ञांची असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– गिरीश केशव पळशीकर ,मराठी विज्ञान परिषद