अतिशय उत्क्रांत आणि प्रगत मेंदूच्या साहाय्याने मानवाने जगातील प्रसिद्ध वास्तूंची निर्मिती केली आहे. या लेखात, पृथ्वीवर अब्जावधी कालावधीपासून स्थायिक असलेल्या जिवाणूंच्या स्थापत्य आणि रचनाकौशल्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सूक्ष्मदर्शकाशिवाय न दिसणारे जीव त्यांच्या वसाहतींचा रंग, त्यांचा गंध, त्यांची वाढ जिथे झाली असेल त्या जागेतील भौतिक अथवा रासायनिक बदल, अशा गुणधर्माने त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात. निसर्गातील विविध अधिवासांमधील पोषक द्रव्यांमध्ये कार्बन व नत्राचे स्रोत, त्यांची मात्रा, तेथील सामू, तापमान, आणि जड धातूचे (उदा. पारा, अर्सेनिक, इ.) प्रमाण यांसारख्या घटकांवर त्या अधिवासातील सूक्ष्मजीवांचे प्रकार आणि त्यांची वाढ अवलंबून असते.

प्रत्येक सूक्ष्मजीव विशिष्ट रचनेचे, विविध रासायनिक घटकांचा वापर करून, उपजत विभाजन पद्धतींचा अवलंब करून आणि चयापचयात योग्य ते बदल करून आपापली वैशिष्टय़पूर्ण वसाहत घन माध्यमाच्या पृष्ठभागावर घडवितात. जसे एखाद्या इमारतीच्या, सुंदर वास्तूचा व इतर रचनांचा कुणीतरी एक कल्पक आणि हुशार स्थापत्यकार/रचनाकार असतो, व तो त्यातील रचनात्मक, सौंदर्यात्मक, आणि कार्यकारी घटकाचे नियोजन करतो, अगदी तसेच सूक्ष्मजीवांची एक पेशी त्याच्या डी.एन.ए.मधील वसाहतीची सांकेतिक आखणी अभिव्यक्त करत विशिष्ट वसाहत निर्माण करते. प्रथम एक पेशी घन पृष्ठ माध्यमावर स्थिरावते. त्या माध्यमातील पोषक घटकांचा वापर करून त्या पेशीचे विभाजन होते व नवजात पेशी तयार होतात. या दोन प्रक्रिया चक्रीय पद्धतीने पुन्हा पुन्हा घडत राहतात. काही कालावधीनंतर करोडो निकटवर्तीय पेशींचा ढीग तयार होतो. या राशीस ‘वसाहत’ असे म्हणतात. प्रत्येकाच्या वसाहती वेगवेगळय़ा असतात. त्यांचे रंग, घनपृष्ठापासूनचा उंचवटा, पृष्ठभागाचा पोत, आकार, मिती, चिकटपणा, पाणीदार आणि तारयुक्त आहे का? अशा अनेक गुणधर्माची नोंद केली जाते. सर्वसामान्य जिवाणूसदृश वसाहत तयार करण्यास सुमारे १६-१८ तास लागतात.

सूक्ष्मजीवांनी निर्माण केलेली कबरेदके (पॉलीसॅकराइड) सिमेंट आणि काँक्रीटप्रमाणे वसाहतीला निश्चित आकार देण्याचे व पेशींना बद्ध करण्याचे कार्य करतात. वसाहतीच्या मध्यभागी अधिक जुन्या (परिपक्व) पेशी असतात व कडेला असलेल्या पेशी अधिक सक्रिय आणि जोमाने वाढणाऱ्या असतात. मिक्जोबॅक्टेरिया आणि स्लाईम मोल्ड हे जीव स्वत:च्या वसाहतीभोवती अतिशय तरल पापुद्रा तयार करतात आणि मध्यभागी अतिशय आकर्षक रंगाचे आणि रचनेचे फलसदृश उद्गमे तयार करतात. सूक्ष्मजीवांच्या वसाहतींच्या या रचना कौशल्यतेने, रंग आणि सौंदर्याने अनेक वास्तुविशारदांना अचंबित केले आहे.

– डॉ. गिरीश ब. महाजन

मराठी विज्ञान परिषद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल : office@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org