भारतात विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण राखण्यासाठी भारतीय वैद्याकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि अमेरिकेची रॉकफेलर फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहयोगाने २ फेब्रुवारी १९५२ रोजी पुणे येथे विषाणू संशोधन केंद्र (व्हायरस रिसर्च सेंटर) स्थापन झाले. हे केंद्र १९६७ सालापासून जागतिक आरोग्य संघटनेची सहयोगी प्रयोगशाळा म्हणून कार्य करू लागले. १९६९ सालापासून या केंद्राला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आग्नेय आशियाचे संधिपाद कीटकांमार्फत संक्रमण करणाऱ्या विषाणूंच्या (आर्बोव्हायरस) संशोधनाचे क्षेत्रिय केंद्र आणि संदर्भ प्रयोगशाळेचा दर्जा दिला. संशोधन आणि त्यासंबंधीच्या कार्याचे महत्त्व व वाढती व्याप्ती लक्षात घेऊन १ ऑगस्ट १९७८ रोजी या केंद्राचे रूपांतर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) झाले. भारतीय वैद्याकीय संशोधन संघटनेच्या अखत्यारीत असलेली ही संस्था भारतातील सर्व प्रकारच्या विषाणूजन्य आजारांवर संशोधन करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. या संस्थेची क्षेत्रीय कार्यालये मुंबई, बंगळूरु, गोरखपूर आणि अलाप्पूझा (केरळ) येथे आहेत.

विविध विषाणूंच्या संशोधनासाठी स्वतंत्र विभाग, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी, जनुकीय संशोधनात एकाचवेळी मोठ्या प्रमाणात डीएनए किंवा आरएनए अनुक्रमित करण्याच्या (हाय-थ्रूपुट इनसिक्वेन्सिंग) प्रक्रियेची व्यवस्था, रोगनिदानासाठीची साधनसामग्री, प्राण्यांवर प्रयोग करण्याची सुविधा, विविध विषाणू संग्रह असणारी ही संस्था, विषाणू विज्ञानातील भारतातील पहिली अत्याधुनिक राष्ट्रीय संशोधन संस्था आहे.

अणू विषाणू विज्ञान (मॉलिक्युलर व्हायरॉलॉजी) व रोगप्रतिकारशास्त्र यासारख्या आधुनिक विषयांवर या संस्थेत संशोधन केले जाते. रिकेटसिओसिस, कावीळ, संधिपादजनित (आरथ्रोपॉड बॉर्न) विषाणू संसर्ग, हिवताप, डेंगी, चिकुनगुन्या, झिका, यलोफिवर, पोलिओ, रोटाव्हायरस, नागीण, नेत्रदाह, कोविड, एड्स, रेबीज, गोवर, कांजिण्या इत्यादी आजारांच्या विषाणूंवर तसेच पशू, पक्षी व कीटक यांच्यामार्फत येणाऱ्या (व्हेक्टर बॉर्न) आणि हवा,पाणी, माती, धूळ यांच्यातून पसरणाऱ्या तसेच अनेक आजारांना कारणीभूत असणाऱ्या जीवाणू व विषाणूंचे संशोधन या संस्थेत केले जाते.

क्रिमियन – काँगो, इबोला, निपाह यांसारख्या गंभीर रोगजनक विषाणूंचे निदान करण्यासाठी ही संस्था आपल्या देशातील अधिकृत संदर्भ प्रयोगशाळा म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण भारतात गोचिडांमार्फत पसरणारा क्यासनूर वन विषाणू, आशिया व पश्चिम पॅसिफिक भागात आढळणाऱ्या क्युलेक्स प्रजातीच्या डासांमुळे पसरणारा आजार, मेंदूला सूज आणणारा जापनीज एनसेफलाइटिस तसेच साऱ्या जगाला ग्रासून टाकलेला सार्स-कोविड-२ या सर्व आजारांच्या चाचण्या व निदानासाठीची साधने तयार करणे आणि या आजारांच्या नियंत्रणासाठीच्या रोगप्रतिबंधक लशी तयार करणे यामध्ये राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचा सहभाग फार मोठा आहे.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org