पृथ्वी या एकमेव जिवंत ग्रहाचा सर्वांगाने अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे भूविज्ञान. पृथ्वीविषयीची सर्व माहिती देणारे शास्त्र म्हणजे भूविज्ञान. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तिच्यात झालेली सर्व स्थित्यंतरे, कालांतराने अस्तित्वात आलेली जीवसृष्टी, पृथ्वीचे भूभौतिक, रासायनिक, चुंबकीय गुणधर्म, तिची अंतर्गत रचना, तिच्या पोटात घडणाऱ्या हालचाली आणि घडामोडी या हालचालींचे अंतर्गत व बाह्य परिणाम, त्यांचा परस्परसंबंध हे सर्व घटक अत्यंत महत्त्वाचे आणि गुंतागुंतीचे असतात. या घटकांचे पृथ्वीवर व तिच्यावर अस्तित्वात असणाऱ्या जीवसृष्टीवर सतत परिणाम होत असतात.
आपली सूर्यमाला, त्यातील इतर ग्रह व पृथ्वी यांचे परस्परसंबंध, पृथ्वी व चंद्र यांच्यातील आकर्षण, त्याचे दृश्य परिणाम, पृथ्वीचे वय, तिच्या जन्मापासून झालेले बदल, हे बदल होत असताना अस्तित्वात आलेली खनिजे. त्यांचे साठे, या खनिजांचे पुरातन काळापासून होणारे विविध उपयोग, या खनिजांपासून बनलेले विविध प्रकारचे खडक, त्यांचे गुणधर्म, त्यांचे सर्व भूशास्त्रीय प्रक्रियांमध्ये असणारे महत्त्व व स्थान, त्यांच्यापासून तयार झालेली विविध भूरूपे, पृथ्वीवर असणारे पाणी, त्याची नदी, ओढे, तळी व समुद्र ही विविध रूपे, त्या रूपांचा व जीवसृष्टीचा आणि भूरूपांचा सहसंबंध हे सर्व भूविज्ञानाचेच भाग आहेत.
पृथ्वी कोणत्या घटकांपासून तयार झाली आहे, ते घटक पृथ्वीच्या कवचात कसे तयार होतात त्याच्या प्रक्रिया, (पाषाणविज्ञान आणि खनिजविज्ञान), पाषाणप्रस्तरांच्या संरचना, (संरचनात्मक भूविज्ञान) इत्यादी. हे मूलभूत भूविज्ञानाचे भाग आहेत. तर खनिजांचे व्यावसायिक उपयोग (आर्थिक भूविज्ञान); व त्या दृष्टीने त्यांचे उत्खनन (मिनरल एक्सप्लोरेशन), त्या उत्खननाच्या विविध पद्धती, (मायनिंग जिऑलॉजी) दूरस्थ संवेदन (रिमोट सेन्सिंग), भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) ज्याचा हवामान व इतर पर्यावरणीय घटकांची माहिती मिळवण्यासाठी उपयोग होतो; हे उपयोजित भूविज्ञानाचे प्रकार आहेत.
पृथ्वीवरील पर्यावरणीय घटक व जीवसृष्टीचा परस्पर संबंध म्हणजेच पर्यावरणीय भूविज्ञान (एनवायरॉनमेंटल जिऑलॉजी) पृथ्वीवरील पाणीसाठे आणि भूजल यांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच भूजलविज्ञान (हायड्रोजिऑलॉजी), खनिजांचे औषधी उपयोग म्हणजेच वैद्याकीय भूविज्ञान (मेडिसिनल जिऑलॉजी), भूकंपविज्ञान (साइस्मॉलॉजी), विविध अभियांत्रिकी प्रकल्प. त्यांचे भूवैज्ञानिक परिणाम आणि सहसंबंध अभ्यासणारी शाखा म्हणजे भूअभियांत्रिकी (इंजिनीयरिंग जिऑलॉजी). याशिवाय भूरासायनिकविज्ञान (जिओकेमिस्ट्री) ज्यात पृथ्वीचे व दगडांचे रासायनिक विश्लेषण व अभ्यास केला जातो. भूभौतिकी (जिओफिजिक्स) ज्यात पृथ्वीवरील विविध घटकांचा अभ्यास व खनिज उत्खनन यासाठी भौतिकविज्ञानातील पद्धती वापरल्या जातात, तसेच भूसांख्यिकी (स्टॅटिस्टिकल जिऑलॉजी) या भूविज्ञानाच्या उपशाखांचा तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास हा सर्व भूविज्ञानाचाच भाग आहे.
डॉ. योगिता पाटील
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org