प्रचंड मोठी हाडे खडकांमधून बाहेर पडतात हे सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीसुद्धा आपल्या पूर्वजांना माहिती होते. पण ते डायनोसॉरचे जीवाश्म आहेत याची मात्र त्यांना सुतराम कल्पना नव्हती. चीनमध्ये लोक त्या हाडांना ड्रॅगनची हाडे समजत, तर युरोपात त्यांना लोककथांमधल्या राक्षसांची हाडे मानले जाई.

१६७६ मध्ये इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डशायर परगण्यातल्या कॉर्नवेल गावानजीक असलेल्या चुनखडकाच्या खाणीत एका कामगाराला हाडाचा एक भला मोठा तुकडा सापडला. ऑक्सफर्डच्या अॅशमॉलियन संग्रहालयाचे रॉबर्ट प्लॉट यांच्याकडे तो सुपूर्द करण्यात आला. तो मांडीच्या हाडाचा तुकडा आहे, हे प्लॉट यांनी अचूक ओळखले. पण इतके मोठे हाड सरड्याच्या वर्गातल्या प्राण्याचे असावे असे त्यांच्या मनातही आले नाही. आकाराने अवाढव्य असणाऱ्या मानवाच्याच पूर्वजाचे ते हाड असावे असा निष्कर्ष त्यांनी काढला.

वास्तविक ज्या चुनखडकात हे हाड मिळाले होते तो निर्माण झाला होता साडेसोळा कोटी वर्षांपूर्वी. इतक्या प्राचीन काळी मानव अस्तित्वातसुद्धा आला नव्हता. पण साडेतीनशे वर्षांपूर्वी ते माहितीच नव्हते. डायनोसॉर हा शब्द तर कुणी ऐकलाही नव्हता. त्यामुळे असेल, निष्कर्ष काढण्यात प्लॉट यांची गफलत झाली होती.

पुढे १८२२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील भूविज्ञानाचे प्राध्यापक विल्यम बकलँड यांना एका प्राण्याचा खालचा जबडा, मांडीचे हाड आणि काही मणके ऑक्सफर्डजवळ सापडले. ती हाडे सरड्याची होती हे त्यांनी अगदी अचूक ओळखले. हाडांच्या आकारावरून तो सरडा प्रचंड मोठा होता हेही त्यांनी दाखवून दिले. जबड्याच्या वरच्या दातांवरून तो सरडा मांसाहारी होता हेही त्यांनी सांगितले. त्या नामशेष झालेल्या सरड्याच्या प्रजातीला त्यांनी ‘मेगॅलोसॉरस’ हे नाव सुचवले. मेगॅलोसॉरस म्हणजे महाकाय सरडा. पूर्वी जे मांडीचे हाड सापडले होते, ते मेगॅलोसॉरसचेच होते असेही बकलँड यांनी दाखवून दिले.

त्यानंतर १८२६ मध्ये इंग्लंडच्या ससेक्स परगण्यातल्या खडकांमध्ये इग्वानोडॉन या महाकाय सरड्याच्या प्रजातीचा शोध लागला, आणि १८३२ मध्ये हायलिओसॉरस नावाच्या दुसऱ्या एका महाकाय सरड्याच्या प्रजातीचा शोध वील्ड प्रांतात लागला. या दोन्ही शोधांचे श्रेय गिडियन मांटेल आणि त्यांची पत्नी चारलट मांटेल या इंग्लिश दाम्पत्याकडे जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या काळातले इंग्लंडमधले ख्यातनाम प्राणी वैज्ञानिक रिचर्ड ओवेन यांनी या तिन्ही महाकाय सरड्यांच्या जीवाश्मांचा अभ्यास केला. विलुप्त (एक्स्टिंक्ट) झालेल्या सरड्यांच्या या समूहाला त्यांनी १८४१ मध्ये डायनोसॉर असे नाव दिले. भयप्रद सरडे असा डायनोसॉर या शब्दाचा अर्थ आहे.