सर्जनशील कलाकारांच्या अस्सल कलाकृतींना आदराचे स्थान आहे. त्याच वेळी हुबेहूब नक्कल हीच मूळ कलाकृती दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण कलाविश्वात पुष्कळ आहे. संग्राहकांना आणि कलाकृतींची खरेदी-विक्री करणाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. म्हणूनच या क्षेत्रात कलाकृती अस्सल की मूळ कलाकृतीची नक्कल, हे सिद्ध करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिथे आता कृत्रिम बुद्धिमत्तेची मोठी मदत होत आहे.

एखादी कलाकृती बनावट आहे का हे पारंपरिक प्रकारे तपासताना तांत्रिक चाचण्या आणि तज्ज्ञांच्या मतांचा आधार घेतला जातो. हे काम अतिशय किचकट, वेळखाऊ असते. तज्ज्ञांची मतेही प्रसंगी वादग्रस्त ठरतात. इथे कृत्रिम बुद्धिमत्ता कलाकाराच्या शैलीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून नवी दिशा देते. ब्रशचे विशिष्ट फटकारे, रंगांची निवड, चित्रातील घटकांची रचना इत्यादी गोष्टी कलाकाराची शैली निश्चित करतात. त्याच्या कारकीर्दीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर शैलीत बदल झालेलेही असू शकतात. यासाठी विशिष्ट कलाकाराच्या प्रमाणीकृत चित्रांच्या विशाल डेटासंचावर प्रणालीला प्रशिक्षण दिले जाते. त्यातून शैलीतील सूक्ष्म बारकावे प्रणाली समजून घेते. या गोष्टी काही वेळा मानवी नजरेतून सुटू शकतात. पण प्रणाली ब्रशच्या फटकाऱ्यांचे काटेकोर विश्लेषण करून त्याची तुलना कलाकाराच्या शैलीशी करू शकते. स्वाक्षरी आणि रेखाटनातील गुंतागुंतीचे तपशील टिपू शकते. त्यात जराही विसंगती आढळून आल्यास इशारा देऊ शकते.

हेही वाचा >>> कुतूहल : वन संरक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे कवच

चित्रामध्ये वापरलेले रंग, ते टिकवण्यासाठी वापरलेले घटक, कॅनव्हासचा पोत यावरूनही चित्रे खरोखरच त्या कलाकाराची आणि त्या कालखंडातील आहेत का, याचा अंदाज कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली घेऊ शकते. जॅक्सन पोलॉकच्या एका चित्राबाबत असे विश्लेषण करून वापरलेली सामग्री पोलॉकच्या ज्ञात पद्धतींशी विसंगत असल्याचा निर्वाळा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने दिला होता.

ही प्रणाली लाखो उदाहरणांवरून शिकते. तांत्रिक बाबींचे विश्लेषण झपाट्याने आणि अचूक करते. कलाकृतीचा मूळ मालक आणि हस्तांतरित होत गेलेल्या मालकीच्या इतिहासाचा मागोवा घेऊन उपलब्ध नोंदींशी वेगाने ताडून पाहते. त्यावरून कलाकृती अस्सल आहे की नक्कल याचा अंदाज मांडते. व्हॅन गॉ, पोलॉक, रेम्ब्रा यांच्या नावावर विकली गेलेली काही चित्रे बनावट आहेत हे अशा प्रणालीने ओळखून दाखवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कलाक्षेत्रातील फसवणुकीला आळा बसेल आणि अस्सल कलाकृतींचे मोल कायम राहील हे निश्चित.

मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकेंतस्थळ : http://www.mavipa.org