डॉ. यश वेलणकर

मेंदूतील ‘पोस्टेरिअर सिंग्युलेट कॉर्टेक्स’ हा भाग ‘मी’ या भावनेचे महत्त्वाचे केंद्र आहे. माणसाला त्याचे कुटुंब, गाव यांविषयी प्रश्न विचारले, की हा भाग अधिक सक्रिय होतो. जेथे ‘मी’चा काही संबंध नसतो असे- उदा. ब्राझीलची राजधानी कुठे आहे?- प्रश्न विचारले तर हा भाग शांत राहतो. माणूस स्वत:च्या शरीर-मनाला ‘मी’ म्हणत असतो. त्यामुळे त्याविषयी कोणताही विचार मनात असतो, तेव्हा हा भाग सक्रिय असतो. माझे गुरू, माझी उपासना असा विचार मनात असतो, तेव्हाही व्यक्तीच्या मेंदूतील हे ‘मी’ केंद्र उत्तेजित असते. ध्यानावर आधारित मानसोपचारात ‘मी’मुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी एक तंत्र उपयोगात आणले जाते.

अशी कल्पना करायची की, आपण परिस्थितीशी बुद्धिबळ खेळतो आहोत. परिस्थितीने एक खेळी केली, की साऱ्या शक्यतांचा विचार करून आपण कर्ताभाव ठेवून खेळी करायची. आपण खेळाडू असू तर काही वेळा जिंकणार; काही वेळा समोरील खेळाडूच्या चाली लक्षात आल्या नाहीत तर फसणार, आपले मोहरे मारले जाणार. आयुष्याच्या खेळात कर्ताभाव ठेवून कृती करायची आहेच; पण असे जे काही करता येणे शक्य आहे, ते केल्यानंतर या खेळाकडे थोडा वेळ  प्रेक्षक म्हणून साक्षीभाव ठेवून पाहणे शक्य असते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माणूस दुसऱ्याच्या आयुष्याच्या कथा आवडीने ऐकतो. स्वत:च्या आयुष्याकडेही असे तटस्थपणे पाहणे शक्य असते. ‘एक झाड आणि दोन पक्षी..’ या विश्राम बेडेकरांच्या आत्मचरित्रात त्यांनी स्वत:चे आयुष्य काहीशा तटस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. असे तटस्थपणे पाहणे आत्मभान असलेल्या प्रत्येक माणसाला शक्य आहे. योगी, संत असा साक्षीभाव ठेवतात. त्यांच्या मेंदूतील ‘पोस्टेरिअर सिंग्युलेट कॉर्टेक्स’ पूर्णत: निष्क्रिय झालेले असते, असे निरीक्षण ‘द सायन्स ऑफ मेडिटेशन’ या पुस्तकात (लेखक : डॅनियल गोलमन, रिचर्ड डेव्हिडसन) नोंदवले आहे. ‘आणि मी, ऐसे स्मरण। विसरले जयाचे अंत:करण। पार्था, तो संन्यासी जाण। निरंतर।।’ या ज्ञानेशांच्या ओवीचे प्रत्यंतर त्यांच्या मेंदूत दिसून येते. आपण संत नाही, संसाराचा उपभोग घेणारे आहोत. त्यामुळे आपण सतत साक्षीभाव ठेवू शकत नाही. पण प्रत्येक तासात ५५ मिनिटे कर्ता आणि भोक्ता असलो, तर पाच मिनिटे साक्षी होणे शक्य असते. ते जमले की आयुष्याचा खेळ खेळताना त्याचा आनंदही घेता येतो.

yashwel@gmail.com