डॉ. नीलिमा गुंडी nmgundi@gmail.com

वाक्प्रचारांमध्ये विविध अलंकार सुखाने नांदत असतात. एकाच वाक्प्रचारात शब्दालंकार आणि अर्थालंकार असे दोन्ही अलंकारही असू शकतात. उदा. ‘रजाचा गज करणे’ हा वाक्प्रचार पाहा. त्यातील अनुप्रास- (एक शब्दालंकार)- आधी आपले लक्ष वेधून घेतो. मग ‘एखाद्या (सूक्ष्म) धूलिकणाचा (महाकाय) हत्ती करणे’ हा वाच्यार्थ कळतो. ‘फुगवून वर्णन करणे’, हा त्याचा सूचितार्थ पुढे लक्षात येतो. तेव्हा लक्षात येते की, हा तर अतिशयोक्ती अलंकार आहे!

तोंडातून बाहेर पडणाऱ्या शब्दांना मोत्यांची उपमा दिली जाते. मात्र ‘मुक्ताफळे उधळणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, शिव्या देणे, अपशब्द उच्चारणे! (मुक्ताफळे हा शब्द मुळात ‘मोती’ या अर्थाचा आहे) यात शिव्यांना मोत्यांची उपमा देऊन ‘उपरोध’ साधला आहे. ‘पखाल सोडणे’ या वाक्प्रचारात थोडे वेगळे घडले आहे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, मूत्रविसर्जन करणे. पखाल म्हणजे चामडय़ाची पिशवी. मूत्राशयाला पखाल म्हणताना साधलेले अलंकरण हे शारीरिक क्रियेचा उल्लेख टाळण्यासाठी आले आहे. वाक्प्रचारांमधील अलंकार कधी सौंदर्यनिर्मिती साधताना चाकोरीबद्ध व्यवहार झाकतातही!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उंबरघाट ओलांडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, घर सोडून जायची वेळ येणे. यातील उंबरठारूपी घाट हे रूपक भावपूर्ण आहे. घर आणि बाह्य जग यातील सीमारेषा ठरणारा उंबरठा दिसायला खरे तर फार उंच नसतो, मात्र घराने आपलेपणाने पुरवलेले संरक्षक कवच लक्षात घेता, घर सोडताना होणारी मन:स्थिती अवघड घाट ओलांडण्यासारखीच भयकंपित असते. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य विनोदी शैलीत वर्णन करताना ‘पाणी’विषयक काही वाक्प्रचार वापरले आहेत. उदा. ‘पाणीदार मनुष्य’ याचा अर्थ ‘तेजस्वी मनुष्य’ मात्र आता त्याचा अर्थ ‘ज्याच्या दारी पाणी आहे असा मनुष्य’, असा झाला आहे. कोल्हटकरांनी लेखात कोटी (श्लेष अलंकार) साधण्यासाठी काही वाक्प्रचार मार्मिकपणे योजले आहेत. दुष्काळामुळे भाषेवरही कसा परिणाम होतो, अर्थाची  कशी उलथापालथ होते, हे त्यातून प्रभावीपणे जाणवते. वाक्प्रचारांची ही आलंकारिक लकब व्यवहारात भाषेची प्रसरणशीलता टिकवून ठेवायला उपयोगी पडते.