आपल्या नेहमीच्या वापरातले वर्ष हे ऋतुचक्राशी निगडित आहे. ऋतूंचा आवर्तनकाळ हा ३६५ दिवस, ५ तास आणि ४९ मिनिटांचा आहे. परंतु पृथ्वी ही सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ३६५ दिवस, ६ तास आणि ९ मिनिटांत पूर्ण करते. दोहोंतील २० मिनिटांच्या फरकामुळे पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण होण्याच्या अगोदरच, नव्या ऋतुचक्राला सुरुवात झालेली असते. शेतीसारखे अनेक व्यवहार ऋतूंशी संबंधित असल्याने, वर्षकालाची सांगड ही पृथ्वीच्या सूर्यप्रदक्षिणेपेक्षा ऋतुचक्राबरोबर असणे, हे व्यावहारिक ठरते.

इ.स. पूर्व पहिल्या शतकातील रोमन सम्राट ज्युलिअस सिझरच्या काळापूर्वी, रोमन साम्राज्यात वर्षांचा कालावधी हा ३५५ दिवसांचा होता. वर्षकाळ आणि ऋतुचक्र यांचा मेळ घालण्यासाठी, त्याकाळी अधूनमधून अधिक मासाचा वापर केला जायचा आणि वर्षांचा कालावधी ३६५ दिवसांच्या आसपास आणून ठेवला जायचा. मात्र त्यातील अनियमिततेमुळे उडणारा गोंधळ टाळण्यासाठी, सॉसिजेनेस या खगोलज्ञाच्या सूचनेवरून ज्युलिअस सिझर याने इ.स. पूर्व ४५ या साली, वर्षांचा कालावधी सरासरी ३६५ दिवस आणि ६ तासांचा निश्चित केला. ही सरासरी राखण्यासाठी, चारने भाग न जाणारी वर्षे ३६५ दिवसांची, तर चारने भाग जाणारी वर्षे ३६६ दिवसांची – लीप वर्षे – मानली गेली. परंतु या ‘ज्युलिअन वर्षां’चा कालावधी हा ऋतूंच्या आवर्तनकाळापेक्षा ११ मिनिटांनी मोठा होता. त्यामुळे प्रत्येक वर्ष हे ऋतुचक्रापेक्षा उशिरा पूर्ण होऊ लागले. दरवर्षीचा ११ मिनिटांचा फरक जमा होऊ लागल्याने, वर्ष सुरू होण्यास दर १२८ वर्षांनी ऋतुचक्राच्या तुलनेत एक दिवसाचा उशीर होऊ लागला.

सोळाव्या शतकापर्यंत हा फरक वाढून १२ दिवसांचा झाला. यावर उपाय म्हणून रोमच्या पोप ग्रेगरीने इ.स. १५८२ मध्ये लीप वर्षांची संख्या कमी करून, हा फरक कमी करायचे ठरवले. त्यानुसार त्याने चारने भाग जाणारी वर्षे ही लीप वर्षे म्हणूनच मानली. परंतु यातली चारशेने भाग न जाणारी शतकाच्या अखेरची वर्षे या लीप वर्षांंतून वगळली. परिणामी, १७००, १८००, १९०० ही लीप वर्षे न ठरता, फक्त १६००, २००० ही लीप वर्षे ठरली. यामुळे वर्ष हे सरासरी सुमारे ३६५ दिवस, ५ तास आणि ४९ मिनिटांचे झाले. ऋतूंच्या आवर्तनकाळातील व वर्षकाळातील फरक हा यामुळे अर्ध्या मिनिटाहून कमी झाला. हा फरक एक दिवसाइतका होण्यास आता एकूण सुमारे ३,२०० वर्षां चा दीर्घ कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी या ‘ग्रेगोरिअन वर्षां’च्या कालावधीत बदल करण्याची आवश्यकता भासत नाही. पोप ग्रेगरीचे हे गणित साधे, पण दूरगामी परिणाम करणारे ठरले आहे.

– डॉ. राजीव चिटणीस

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org