कोणत्या प्रकारचे संशोधन करायचे आहे? कशा प्रकारचा अभ्यास करायचा आहे? त्याप्रमाणे आधारसामग्री गोळा करणे आवश्यक असते. आणि त्याच्या स्वरूपावरून योग्य संख्याशास्त्रीय पद्धतीने तिचे गणन करता येते. ज्या प्राचलांसाठी (पॅरामीटर्स) आधारसामग्री उपलब्ध आहे ती प्राचले दोन प्रकारची असू शकतात. गुणात्मक आणि संख्यात्मक. गुणात्मक गणनात, निरीक्षणात अभ्यासाचे प्राचल आहे किंवा नाही हे सांगता येते. उदाहरणार्थ, बिया रुजल्या की नाही, लस टोचली आहे की नाही आणि साक्षर की निरक्षर? संख्यात्मक गणनात निरीक्षण संख्येच्या स्वरूपात नोंदता येते. उदाहरणार्थ, पाऊस (मि.मी.), विद्यार्थ्यांचे वजन (किलोग्राम), कंपनीच्या समभागाचा दर (रुपये).

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हा आधारसामग्रीचे गुणात्मकरीत्या गणन केले जाते तेव्हा तिचे वर्गीकरण करण्यासाठी कोष्टके तयार केली जातात. जितकी प्राचले अभ्यासायची असतील त्यानुसार एकमार्गी वा द्विमार्गी कोष्टक तयार केले जाते. अधिक विश्लेषणासाठी विविध प्रकारच्या आलेखांचा वापर केला जातो. संख्यात्मक गणनात चल व अचल असे प्रकार असले तरी अचल प्रकार विचारात घेतला जात नाही. कारण त्याचे मूल्य कायम असते. चल गणनात दोन प्रकार असतात – असंतत (डिस्कंटिन्युअस) आणि संतत (कंटिन्युअस). सदनिकेत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि सकाळी ८ ते ९ दरम्यान एका पुलावरून जाणाऱ्या दुचाकींची संख्या ही असंतत गणनाची, तर पाऊस (मि.मी.) आणि विद्यार्थ्यांचे वजन (किलोग्राम) ही संतत गणनाची उदाहरणे होत.आकलनासाठी स्तंभालेख, विभाजित वर्तुळाकृती व अन्य विविध प्रकारचे आलेख वापरून आधारसामग्रीची माहिती चित्रमय पद्धतीने मांडली जाते. असंतत चलाच्या आधारसामग्रीच्या  वर्गीकरणासाठी प्रथम त्याचे कमीत कमी व जास्तीत जास्त किती मूल्य आहे ते पाहून (उदाहरणार्थ, सदनिकेत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमीत कमी १ व जास्तीत जास्त ८) प्रत्येक मूल्याची किती निरीक्षणे आहेत यांची वारंवारता काढली जाते. त्याआधारे वारंवारता सारणी तयार केली जाते. संतत चलाच्या आधारसामग्रीची कक्षा पाहून (उदाहरणार्थ, तापमान कक्षा १५-४५ अंश से.) योग्य ते वर्ग अंतराळ तयार केले जातात; प्रत्येक वर्ग-अंतराळात किती निरीक्षणे आहेत यांची वारंवारता काढून ती सारणी सखोल केली जाते. या सारणीच्या आधाराने आधारसामग्रीची केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे मध्य (मीन – सरासरी), मध्यक (मीडियन -मूल्यानुसार क्रमवारीत मध्यभागी येणारे), बहुलक (मोड – वारंवारता जास्त असणारे मूल्य) यांचा तसेच प्रमाण विचलनाचा (स्टँडर्ड डेव्हिएशन) अभ्यास करून संगणकाच्या मदतीमुळे आता त्वरित अर्थपूर्ण सांख्यिकी विश्लेषण केले जाते.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meaningful statistical analysis statistics calculations zws
First published on: 15-06-2021 at 01:17 IST