ग्लोबल वॉर्मिंगचा मुद्दा उपस्थित झाला आणि हवेतील हरित वायूंची आर्थिकरूपात उलाढाल होऊ लागली. नांगरणीरहित शेती, कुरणांची वाढ, वृक्ष लागवड, गुरेढोरे पालनात निर्माण होणाऱ्या मिथेन वायूची जप्ती; यांसारख्या कृतीतून शिकागोतील क्लायमेट एक्स्चेंजसारख्या शेअर बाजाराच्या धर्तीवर चालणाऱ्या अर्थयंत्रणेद्वारा शेतकऱ्यांना पसा मिळू लागला. या व्यवहारात सुसूत्रता यावी म्हणून अमेरिकेतील केलॉग बायोलॉजिकल स्टेशनवरील संशोधकांनी हरितगृह-वायू उत्सर्जन मोजणाऱ्या एका हिशेबनीसाची निर्मिती केली आहे.
हा ई- कॅल्क्युलेटर म्हणजे एखाद्या वेबसाइटसारखाच असून त्याच्या पहिल्या पानावर अमेरिकेबाहेरील देशाचे नाव, पिकाचा प्रकार, नांगरणी प्रणाली, नायट्रोजनयुक्त खताचा वापर, उत्पादन ही माहिती भरायची असते. ही हिशेबयंत्रणा भराभर मोजमाप करून एखाद्या विशिष्ट भूप्रदेशात किती प्रमाणात कार्बन वायू साठलेला आहे किंवा हवेत मुक्त होतो आहे, याचा आढावा घेते. खताच्या वापरामुळे जमिनीतून मुक्त होणाऱ्या नायट्रस ऑक्साईडचे प्रमाण, ट्रॅक्टरच्या वापराने (इंधन ज्वलनातून) बाहेर पडणारा कार्बनवायू, तसेच वापरलेल्या खतांची निर्मिती करण्यासाठी जाळलेल्या इंधनाद्वारा उत्सर्जति झालेला कार्बनवायू यांचे मोजमाप करतो.
प्रारंभी अमेरिकेतील शेतीतज्ज्ञांनी या गणक यंत्रणेद्वारे मका, सोयाबीन आणि गहू यांच्या उत्पादनांसाठी नांगरणी केलेली व नांगरणी न केलेली जमीन वापरून हरित-वायूंची तुलनात्मक मोजणी केली. तेव्हा आढळले की, दोन्ही प्रकारांत अशा वायूंचे उत्सर्जन होत असते. ऊस लागवडीसाठी भरमसाट खत वापरल्याने त्यातून जास्तीत जास्त हरितगृह वायू मुक्त होतात. त्या मानाने गव्हाच्या लागवडीला कमी खत लागते आणि सोयाबीनसाठी खताची गरज लागत नाही. मात्र न नांगरलेल्या शेतातून हरित वायूचे उत्सर्जन ५० टक्क्यांनी कमी होत असते. त्यामुळे वातावरणात होणारी कार्बनमुक्ती काही प्रमाणात टळते. उत्पादन कपात न करता खताचा माफक वापर केला तर नायट्रस ऑक्साइड या हरित वायूचे उत्सर्जन १२ टक्क्यांनी घटते. शेतकरी व शेती तज्ज्ञांसाठी ही नवी यंत्रणा खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे, कार्बन ट्रेडिंगच्या व्यवहारातील विश्वासार्हता वाढू शकते.
-जोसेफ तुस्कानो मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..  – जाहिरात
जी गोष्ट जीवनाला खऱ्या दृष्टीने आवश्यक नाही, आणि जी गोष्ट आम जनतेला माहीत नाही असल्या गोष्टींना बाजारात आणण्यासाठी आणि त्यांची भरमसाट विक्री होईल याची व्यवस्था करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते त्याला जाहिरातबाजी म्हणतात. हा आजमितीला फार मोठा व्यवसाय/धंदा आहे. ह्यावर लक्षावधी लोकांचे संसार चालतात आणि यामुळे माणसांवर चांगले- वाईट (मुख्यत: वाईटच) संस्कार होऊ शकतात. दोनाच्या किमतीत तीन घ्या असे म्हणतात तेव्हा मुळात दोनाचीच गरज नसते हे विसरवण्याचा हा व्यवसाय आहे. एक रुपयाचा माल ‘अतिउत्तम’ म्हणून दहा रुपयाला विकणे. मग नफा झाला की उरलेला माल पाच रुपयाला स्वस्तात मिळणार आहे अशी माया निर्माण करणे आणि या जंजाळात जनतेला घेरणे हेही या व्यवसायाचे काम.
जे विधात्याला जमले नाही ते म्हणजे त्वचेचा रंग काळ्याचा गोरा करणे एका चाळीस रुपयाच्या मलमाने होऊ शकते, हा संदेश माणसाच्या मनात बिंबवणे आणि त्यातून गोरेपणा हा एक भारी गुण आहे ही माणसाच्या मनातली विकृती दृढमूल करणे असली कुलंगडीही ह्याचीच. आमचा भ्रमणध्वनी  (cell phone) इतरांपेक्षा कसा सरस आहे अस भ्रम इतक्या सुंदर तऱ्हेने मांडला जातो की ती जाहिरातच मनोरंजनाचा भाग बनू शकते. आमचा साबण चांगला आहे हे सांगताना सुंदर विवस्त्र स्त्री हमखास लागते. दाढीच्या साबणाची जाहिरात असेल तर देखण्यातला देखणा पुरुष उभा करतात. सगळ्याच साबणांनी अंग स्वच्छ होते आणि दाढी चांगली होते हे सत्य दडूनच राहते. कपडय़ामुळे तुम्हाला नोकरी मिळते, नवरा मिळतो हे अर्धसत्य आता सत्य होऊ लागले आहे. कारण या जाहिरातीमुळे होणारा नवरा आणि नोकरी देणारा मालकही या अर्धसत्याच्या आहारी गेला आहे.
 खाण्याच्या गोष्टीच्या जाहिराती नुसत्याच फसवत नाहीत तर अपाय करतात. मीठ-साखर-तेल हे तीन माणसाचे आधुनिक काळात शत्रू झाले आहेत. त्याची रेलचेल असलेले खाद्यपदार्थ आणि शीतपेये यावर अब्जावधीची जाहिरातबाजी चालते. मग पैसे मिळवून झाले की आमच्या उत्पादनात या तिन्ही गोष्टी कशा कमी आहेत अशी मखलाशी करत नव्या जाहिराती करतात.
ही सर्व लबाडी माणसेच करतात आणि मंतरल्यासारखे जे भुलतात तीही माणसेच असतात. ज्योतीवर जसा पतंग झडप मारत स्वारी करतो तसेच हे असते. ह्य़ा भानगडीत मनाचे आणि शरीराचे दोन्ही गोष्टींचे नुकसान होते. कारण मन सतत ललचावले जाते आणि ते मुलांच्या बाबतीत घातक ठरते. असले खाण्याचे चोचले पुरवून शरीर बिघडले की मग ते कसे सुधरवायचे याच्या जाहिराती असतात त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस -अ‍ॅलर्जीवर आयुर्वेदीय उपचार – २
मागील लेखात आपण अ‍ॅलर्जीची कारणपरंपरा पाहिली. या सगळ्या अ‍ॅलर्जी समस्यांचे मूळ आपणाला मिळणाऱ्या हवेतील प्राणवायूची कमतरता व असा प्राणवायू बाहेरून घेण्याची आपल्या  फुफ्फुसाची क्षमता कमी होणे यात असते. थोर ज्ञानी वाचकांना मी दीर्घश्वसन, प्राणायामाचे महत्त्व सांगायची अजिबात गरज नाही. आपल्या फुप्फुसात, अप्पर रेस्पेरेटरी व लोअर रेस्पेरेटरी ट्रॅक असे दोन भाग असतात. त्यातील द्राक्षासारख्या घोसात  पुरेसा प्राणवायू वारंवार खेचला तर तिथे साठणारी अ‍ॅलर्जी, धुळीचे  कण, पोलन यांना त्या त्या अवयवात ठाण मांडायला ठिकाणच मिळत नाही.
त्याकरिता अनुलोम, विलोम, भस्त्रिका याचा नित्य अभ्यास, वापर कदापी चुकवू नये. त्याकरिता योगवर्गाना जायची अजिबात गरज नाही. सकाळी व सायंकाळी पाच मिनिटे मोकळा वेळ काढावा. व्यवस्थित बैठक मारून एक नाकपुडी दाबून, दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्यावा, थोडा वेळ ठेवावा, पहिल्या नाकपुडीने सोडावा. असे आलटून पालटून किमान दहावेळा करावे.  नंतर दोन्ही नाकपुडय़ांनी श्वास घ्यावा, थोडा वेळ ठेवावा, तोंडाने सोडावा.
देवांना आवडणाऱ्या तीन वनस्पती आहेत.  दूर्वा, तुळस, बेल. यातील तुळस ही आपल्याला भरपूर प्राणवायू देते. नियमाने दोन वेळा तुळशीची ताजी पाने चावून, प्रत्येक वेळेस दहा खावी. जेवणात पुदिना, आले, लसूण, ओली हळद अशी चटणी ठेवावी.  चांगल्या दर्जाच्या  काळ्या मनुका किमान तीस-चाळीस चावून खाव्या. सायंकाळी सूर्यास्ताअगोदर जेवावे. नाक वाहात असल्यास नाकात चांगले तुपाचे थेंब, नाक चोंदत असल्यास नस्य तेल सोडावे. वाहणाऱ्या नाकावर वेखंड कांडी उगाळून त्याचे गरम गंध लावावे. घरातील फ्रीज विकून टाकावा. त्यामुळे घरात मोकळी जागा वाढेल. कटाक्षाने रोजचे धुतलेले सुती कपडे वापरावे. केस वाढवू नयेत.
लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमा गोळी, लवंगादी गुग्गुळ, रजऱ्यावी वटी, एलादि वटी, नागरादी कषाप याचा वापर करावा.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ३० ऑक्टोबर
१८९८>  इतिहास आणि इतिहासशास्त्र यांचे गाढे अभ्यासक, लेखक, सूचीकार, संपादक आणि महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळीचे एक प्रवर्तक दिनकर विनायक काळे यांचा जन्म. ‘इतिहासशास्त्र व तत्त्वज्ञान’ हा विवेचनपर ग्रंथ, शिवचरित्र आणि ‘मराठी नियतकालिकांची सूची’सारख्या प्रकल्पांची पूर्तता, हे त्यांचे अनुकरणीय कार्य होते.
१९३०> समीक्षक आणि लोकसाहित्याचे संशोधक गंगाधर नारायण मोरजे यांचा जन्म. ‘मराठी लावणीवाङ्मय’, ‘राम जोशीकृत लावण्या’, ‘शाहीर परशुराम’, ‘शाहिरी वाङ्मय’,‘इतिहास व लोकसाहित्य’ ‘ख्रिस्ती मराठी वाङ्मय’, आदी पुस्तके लिहिणारे प्रा. मोरजे जुलै २००५ मध्ये निवर्तले.  
१९९८ >  मोजकेच, परंतु महत्त्वाचे लिखाण करणारे विश्राम चिंतामण बेडेकर यांचे निधन. ब्रह्मकुमारी, नरो वा कुंजरो वा, वाजे पाऊल आपुले, टिळक आणि आगरकर ही नाटके, ‘रणांगण’ ही कादंबरी आणि पत्नी मालतीबाई बेडेकर (विभावरी शिरूरकर) यांना लिहिलेली ‘सॅलिस्बर्गची पत्रे’ या पुस्तकांखेरीज त्यांनी लिहिलेल्या ‘एक झाड दोन पक्षी’ या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे (मुंबई, १९८६) ते अध्यक्ष होते.
– संजय वझरेकर