जमिनीमध्ये निसर्गत: असंख्य जिवाणू व बुरशी आढळतात. प्रयोगशाळेत या जिवाणूंची वाढ योग्य अशा माध्यमात करून ते लिग्नाइटमध्ये मिसळतात. तयार झालेल्या अशा खतास जिवाणू खते (संवर्धन) म्हणतात. यात जिवाणूंची संख्या प्रति ग्रॅम १० कोटी ते एक अब्ज इतकी असते.
 रायझोबियम, एझ्ॉटोबॅक्टर, एझोस्पायरिलम, नीलहरित शैवाल आणि एझोला ही नत्र स्थिर करणारी खते आहेत, तर सुडोमोनस, बॅसीलस जिवाणू, मायक्रोरायझा बुरशी ही स्फुरद विरघळविणारी जिवाणू खते आहेत.
जिवाणू खते इतर खतांपेक्षा भिन्न आहेत. एकतर ही खते रासायनिक खतासारखी कारखान्यात रासायनिक क्रिया करून तयार केली जात नाहीत, तर प्रयोगशाळेत तयार केली जातात. ही खते इतर खतांच्या तुलनेत फारच स्वस्त असतात. इतर खतांमध्ये पिकाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य असते. ती खते पिकांना जमिनीत विरघळलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात. जिवाणू खताचे वेगळेपण असे आहे की, पिकांना आवश्यक असणारे कुठलेच मूलद्रव्य त्यात नसते. ही खते पिकांना लागणारी अन्नमूलद्रव्ये हवेतून किंवा जमिनीतून उपलब्ध करून देतात. जसे, नत्रवायू हवेत असतो, पण तो पिकांना घेता येत नाही. रायझोबियम जिवाणू द्विदल पिकाच्या बियाणांस चोळून पेरणी केली असता, पिकांच्या मूळांवर ते ग्रंथी स्वरूपात वास्तव्य करतात. तिथे त्यांची भरमसाट वाढ होते. स्वत:चे अन्न पिकाकडून मिळवित असतानाच हवेतील नत्र वायूचे स्थिरीकरण ते करतात व हा नत्र पिकांना अमोनियाच्या स्वरूपात मुळांवाटे उपलब्ध करून देतात. स्फुरद विरघळविणारे जिवाणू अनेक कार्बनी आम्लांचे स्रवण करून जमिनीतील अविद्राव्य स्वरूपात स्थिर झालेला स्फुरद द्राव्य स्वरूपात पिकांस उपलब्ध करून देतात. व्हिए-मायकोरायझा बुरशी जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळविण्याचे तसेच पिकांना ते थेट मुळावाटे मिळवून देण्याचे कार्य करते.
या खताद्वारे जमिनीत होणाऱ्या जैवरासायनिक क्रियेमुळे जमिनीचा पोत सुधारतो. वनस्पतीत अन्न तयार होण्याची क्रिया जलद होते. पिकाची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मुळांची जोमदार वाढ होते.
   
जे देखे रवी..      
शरीराला ‘स्वयंचलित’ कोण करते?
‘भावना आटोक्यात ठेवल्या तर जठर जास्त कार्यक्षम होते’ हे वाक्य पहिल्यांदा डॉ. मोघेंकडून ऐकले की डॉ. रिदानींकडून, हे आता आठवत नाही.. शरीरक्रियाशास्त्र किंवा ‘फिजिऑलॉजी’ शिकवायला आम्हाला हे दोघे प्राध्यापक होते. दोघांचे बोलणे मुद्देसूद, वक्तृत्व उत्तम. त्यामुळे एकेक वाक्य एखाद्या बाणासारखे आत शिरत असे..
जैसे अमृताचा निर्झरु। प्रसवे जयाच्या जठरु।
किंवा     तैसे हृदय प्रसन्न होये। तरी दुख कैचे की आहे॥
या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या मोठय़ा सूचक आहेत आणि त्यात जठर आणि हृदय यांचे उल्लेख आहेत.
पण भावना आटोक्यात ठेवल्या तर जठर कार्यक्षम होते हे ऐकायला ठीक, त्या आटोक्यात ठेवता येत नाहीत.. हे का होते? मेंदू शरीराचे नियंत्रण करतो खरा, म्हणजे आपण ‘मनात आणू’ तेव्हा हात उचलू शकतो, पायाने चालतो वा धावतो, तोंडाने अन्न गिळतो, बोलतो.. अनेक कृती करत असतो . पण शरीरात शेकडो हजारो पटीने जास्त अशा क्रिया ‘घडत’ असतात त्यावर आपले नियंत्रण नसते. या क्रिया असतात म्हणूनच शरीर चालते व त्यावर आधारित आपल्या गरजा भागतात.
मेंदूमुळे मानव तर मोठाच वाकबगार झाला. पण अमीबाला कुठे मेंदू असतो? तरी तोही जगतोच.. एवढेच नव्हे तर कधी लपावे, कधी बाहेर येऊन खावे, कधी बाळंत व्हावे हे अमीबाला कळत असते.. कारण त्याच्या केंद्रकापासून त्याच्या शरीरात एक स्वयंचलित जाळे असते. या जाळय़ाचे स्वरूप मूलत रासायनिक असते म्हणजे असे की, तिथे तंतूसारखे काही (वायरिंग) नसते. या जाळय़ामुळेच अमीबा बुद्धिमान नसला, तरी त्याचा तो सार्वभौम असतो.
आपल्याही शरीरातील प्रत्येक पेशी ही (वाचायला विचित्र वाटेल, पण अमीबासारखीच-) सार्वभौम असते. थोडे काही झाले की मेंदूला विचार आणि ठरव असे झाले असते तर सारे कधीच ढेपाळले असते. मज्जासंस्थेतले मज्जारज्जू अनेक कामे करत असतात, त्यापैकीच हे शरीरातील काही क्रिया स्वयंचलित राखण्याचे काम. प्रियकर-प्रेयसी भेटतात तेव्हा गाल लाल होतात, महत्त्वाची मुलाखत वा परीक्षा असेल तर तोंड कोरडे पडते.. टेन्शन नको, असे मेंदू सांगत असूनही हे होते, याचे कारण आपली ही स्वयंचलित यंत्रणा. ही संस्था मुख्यत रसायनांद्वारेच काम करते. दोन पेशींतला शेजारधर्म, रक्तदाब योग्य ठेवणे, जठर वा आतडय़ांत पचनासाठी रस योग्य प्रमाणात झिरपवणे वगैरे या संष्थेची कामे.
कधी ही संस्था दमते, बिथरतेही.. त्याबद्दल पुढल्या लेखात सवडीने बोलूच.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉर अँड पीस                                                       
खाज सुटणे : कंड
कंड या विकाराला लहान, वय, स्थळ, काळ यांचे काहीच बंधन नाही. अंगाला कंड सुटली असता त्याचेवर विजय मिळवणे फार अवघड काम आहे. बऱ्याच वेळा कामात असताना कंड सुटत नाही, पण वेळ फावला की तो रोग दुप्पट उसळी घेतो. कंड ही चोरपावलाने येते. वेळेवर योग्य उपचार झाले तर लवकर जाते. नेमके कारण शोधून पथ्य पाळणे याची गरज असते. दीर्घकाळची कंड जावयास दीर्घकाळाची औषधयोजना व मनोनिग्रह आवश्यक आहे. तत्कालिक कंड किंवा आगंतुक कंड बहुधा चटकन जाते. उदा. कावीळ, ताप इत्यादी. मात्र मधुमेह, कुष्ठविकार यातील कंड हे लक्षण बराच काळ मुक्काम करून राहते. रोग्याचे नेमके लक्षण समजून घेण्यामध्ये आम्हा डॉक्टर लोकांचाही घोटाळा असू शकतो. कंड रोगाचा राजा कफदोषच आहे हे आम्ही विसरून जातो.
कंड हा रोग आहे का एका वेगळ्या रोगातील एक लक्षण आहे हेही समजून घेणे आवश्यक आहे. कंड विकारग्रस्त रुग्णांनी दोन-चार दिवस मीठ पूर्णपणे बंद करूनही पाहावे. दिवसेंदिवस शीतपित्ताचे रुग्ण वाढते आहेत. या विकारात तूप व मिरेपूड एकत्र कालवून लावून खाज तात्पुरती थांबते का हे बघावे. लघुमालिनी वसंत सहा गोळ्या, प्रवाळ, कामदुधा, लघुसूतशेखर प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. रात्री त्रिफळाचूर्ण घ्यावे. आराम मिळतो. मधुमेही रुग्णाची रक्तशर्करा वाढल्यास व त्यामुळे खाज असल्यास आरोग्यवर्धिनी, लघुसूतशेखर, चंद्रप्रभा, गोक्षुरादी गुग्गुळ, मधुमेहवटी प्रत्येकी तीन गोळ्या, रसायन चूर्ण एक चमचा दोन वेळा सुंठ चूर्णाबरोबर घ्यावे. कावीळ विकाराची खाज असल्यास जेवणानंतर कुमारी आसव चार चमचे, जेवणाअगोदर आरोग्यवर्धिनी, त्रिफळा गुग्गुळ दोन वेळा, झोपताना त्रिफळा किंवा गंधर्वहरितकी चूर्ण घ्यावे. बाह्य़ोपचारार्थ संगजीरे चूर्ण, करंज-कर्पूर तेल, शतधौत घृत यांचेपैकी एक निवडावे. सोरायसिस विकारात महातिक्त घृत घ्यावे. मांसाहार, शिळे अन्न, लोणची, पापड दही टाळावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

More Stories onनवनीतNavneet
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Microbe fertility and their type
First published on: 25-01-2013 at 01:27 IST