अद्ययावत, दर्जेदार वैद्यकीय सोयीसुविधा आणि विविध प्रकारच्या वाद्यांच्या निर्मितीसाठी एक शतकापासून प्रसिद्ध असलेल्या मिरज या सांगली जिल्ह्य़ातील शहरात ब्रिटिशराजच्या काळात छोटे संस्थान होते. विजापूरच्या अदिलशाहीची एक महत्त्वाची जहागिरी असलेले. मिरज घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये दोन महिने मिरजेशेजारी वास्तव्य केले. १६८६ साली औरंगजेबाने मिरजेवर आपला अंमल बसविला. १७३९ साली छत्रपती शाहूंनी परत एकदा मिरजेवर ताबा बसविला. गोिवद हरी पटवर्धन आणि त्यांचे दोन बंधू मराठा लष्करात उच्चपदस्थ सेनाधिकारी होते. त्यांनी हैदरअली आणि टिपू सुलतानवरील मराठय़ांच्या मोहिमेत भरीव कामगिरी करून मराठा साम्राज्याची दक्षिण सरहद्द तुंगभद्रेपर्यंत वाढविली. गोिवदराव हरी पटवर्धन यास त्याच्या कामगिरीवर खूश होऊन माधवराव पेशवे यांनी १७६१ साली मिरजेची जहागीर आणि किताब देऊन ८ हजार घोडदळ राखण्यासाठी खर्चाचे वार्षकि २५ लाख रु. मंजूर केले. मिरज जहागिरीला अल्पकाळातच एका छोटय़ा राज्याचे स्वरूप आणणाऱ्या गोिवदरावांची राजकीय कारकीर्द इ.स. १७६१ ते १७७१ अशी झाली. १८२० साली मिरज राज्याचे थोरली पाती (मिरज सीनियर) आणि धाकटी पाती (मिरज ज्युनियर) असे दोन भाग झाले. तत्पूर्वी १८१९ साली मिरजच्या राजांनी ईस्ट इंडिया कंपनी सरकारबरोबर संरक्षणाचा करार केला. मिरज थोरल्या पातीच्या संस्थानाचे क्षेत्रफळ ८८० चौ.कि.मी. आणि १९०१ साली लोकसंख्या ८२ हजार होती. संस्थानचे राजे माधवराव पटवर्धन यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात मिरज थोरली पाती संस्थान विलीन केले. मिरज धाकटी पातीचे राज्यक्षेत्र ५५० चौ.कि.मी. होते आणि १९०१ साली संस्थानाची लोकसंख्या ३५ हजार होती. या संस्थानाच्या राजांचे वास्तव्य बुधगावात असे. हे संस्थान १९४८ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miraj presidency
First published on: 07-09-2015 at 01:44 IST