scorecardresearch

बहुगुणी बेरिलियम

बेरिलियम हा वजनाने हलका, चमकदार, राखाडी रंगाचा, कठीण आणि सामान्य तापमानाला ठिसूळ धातू आहे.

बहुगुणी बेरिलियम

बेरिलियम धातूची एकूण बारा समस्थानिके असून त्यांपैकी निसर्गात केवळ एकच म्हणजे Be9 हे समस्थानिक आढळते. अन्य समस्थानिके, जी स्थिर आणि अस्थिर असतात, ती ताऱ्यांमध्ये विखंडन क्रियेत तयार होतात. त्यांचा अर्धआयुष्यकाल खूपच कमी असतो.

बेरिलियम हा वजनाने हलका, चमकदार, राखाडी रंगाचा, कठीण आणि सामान्य तापमानाला ठिसूळ धातू आहे. मात्र उच्च वितळिबदू असलेला व वजनाने हलका असा हा एकमेव स्थिर धातू आहे. तसेच तो चांगला विद्युतवाहक, उष्णताशोषक आणि उच्च स्थितिस्थापक असून उच्च तापमानाला त्याचे यांत्रिक गुणधर्म टिकून राहतात, अशा निरनिराळ्या विशिष्ट गुणधर्मामुळे त्याचा उपयोग विविध क्षेत्रांत केला जातो. सेलफोन्स, कॅमेरा, विमाने, क्षेपणास्त्रे, अवकाशयाने आणि कृत्रिम उपग्रह यांच्या संरचनेसाठी लागणारे भाग तयार करण्यासाठी, काही उच्च दर्जाचे ध्वनिक्षेपक तयार करण्यासाठी बेरिलियम वापरतात.

बेरिलियमचा सर्वाधिक उपयोग संमिश्रांमध्ये कमी प्रमाणातील घटक म्हणून करण्यात येतो. अ‍ॅल्युमिनियम, लोह, तांबे आणि निकेल या धातूंमध्ये बेरिलियम मिसळल्याने ती संमिश्रे कठीण बनतात. अशा संमिश्रांचा उपयोग ठिणगीविरहित हत्यारे, जायरोस्कोप्स, स्प्रिंग्ज इत्यादींसाठी होतो.

बेरिलियमपासून तयार केलेली लिंडेमन काचेतून (एफ.ए. लिंडेमन या भौतिकशास्त्रज्ञाच्या कल्पनेतून उतरलेली संरचना) क्ष-किरण आरपार जात असल्याने क्ष-किरण नलिकांतील ‘खिडक्या’करिता बेरिलियम मुलामा दिलेल्या रूपात वापरतात. डोळ्याच्या शस्त्रक्रियेत लागणाऱ्या लेझर किरणांना काबूत ठेवून निश्चित जागी एकवटण्यास बेरिलियम सिरॅमिक्सचा वापर केला जातो.

बेरिलियमची चव गोड असली तरीही अत्यंत विषारी असल्यामुळे याच्या हवेत तरंगणाऱ्या सूक्ष्म कणांमुळे ‘बेरिलिओसिस’ नावाचा श्वसनमार्गाचा प्राणघातक विकार होऊ शकतो. बेरिलियम धातूच्या संपर्कामुळे तसेच बेरिलियमच्या विरघळणाऱ्या संयुगांच्या द्रावणामुळे कोरडी धूळ वा बाष्प यांच्यामुळे त्वचेला दाहयुक्त सूज येते. बेरिलियमने होणारे शारीरिक अपाय काही वेळा बऱ्याच कालावधीनंतर लक्षात येतात. त्यासाठी बेरिलियम, त्याची संयुगे यांच्याशी काम करणाऱ्यांचा संपर्क येऊ नये अशा विशेष पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत. बेरिलियममुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याची भीती असते. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅ न्सर या संस्थेने बेरिलियमचे वर्गीकरण कर्करोग निर्माण करणाऱ्या पदार्थामध्ये केले आहे.

मीनल टिपणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

भारतीय अरब

अरब लोक साधारणत सहाव्या सातव्या शतकात भारतीय प्रदेशात आले ते प्रामुख्याने व्यापारासाठी. या अरबांचा प्रवेश भारतीय प्रदेशात प्रथम केरळ आणि गुजरातेत झाला. रेशीम, हिरे आणि इतर किमती वस्तूंचा व्यापार हे लोक सुरतेत राहून करीत. त्यामुळे सुरतेच्या परिसरात अरबांची वस्ती वाढली. बरेचसे तरुण अरब जामनगर, जुनागढ, भावनगर वगैरे संस्थानांच्या सन्यदलांत नोकरीत होते. इराक आणि पíशयातून आलेले हे अरब सुन्नी पंथीय मुस्लीम आहेत. सर्व व्यवहारांसाठी गुजराती भाषेचा वापर करणारे हे गुजराती अरब इतर गुजराती समाजात पूर्णपणे मिसळले आहेत.

इराकमधून केरळात आणि गुजरातेत आलेल्या अरबांचे पुढच्या पिढीतले काही वंशज कर्नाटकातही स्थायिक झाले. कानडी अरबांची वस्ती उडपी, मंगलोर, शिरवा, तोकूर या शहरांमधून आढळते. टिपू सुलतानाच्या काळात हे अरब कर्नाटकात स्थलांतरित झाले असावेत. टिपूचे पूर्वजही इराकी अरबच होते.

येमेनमधून आलेले हध्रामी वंशाचे अरब तरुण, हैदराबादच्या निजामाच्या शरीररक्षक दलात आणि सन्य दलातही नोकरीत होते. निजामाचे असफजाही घराण्याचे पूर्वजही असर या अरबस्तानातल्या परगाण्याचेच होते. हध्रामी वंशाचे सईद थांगल हे धर्मप्रचारक सतराव्या शतकात इस्लाम धर्म प्रसारासाठी केरळात आले. हध्रामी अरबांना तेलंगणात ‘चाऊस’ असेही म्हणतात.

भारतीय अरब प्रामुख्याने सौदी अरेबिया, येमेन, इराक येथून स्थलांतरित झालेले आहेत. येमेनचे हध्रामी, तर अरेबियातले हेजाझी या दोन प्रमुख गटांमध्ये विभागले गेलेल्या या भारतीय अरबांची एकूण १६९ घराणी आहेत. या घराण्यांपैकी अकारी, अन्सारी, काथिरी, अकवोन, कुरेशी वगैरे घराणी अधिक महत्त्वाची मानली जात असली तरी त्यांच्यातही कुरेशी हे सर्वाधिक प्रतिष्ठेचे मानले जातात. याचे कारण त्यांचे पूर्वज प्रेषित मोहंमद पगंबराच्या जमातींपैकी होते. पवित्र मक्का धर्मपीठाचे बांधकाम करणारे मूळचे मकेरी अरब भारतात आल्यावर मुकेरी आणि शेख बंजारा अशा दोन गटात विभागले गेले. शेख बंजारांची विभागणी पुढे मकरानी, मुकरी, बारमाकी, सिद्दीकी वगैरे घराण्यांमध्ये झाली. फरीदी आणि मसुदी ही नावे लावणारे भारतीय अरब सुप्रसिद्ध सुफी संत फरूदुद्दीन गंजशाकरचे वंशज असल्याचे सांगण्यात येते.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.