उज्जनच्या माधव कॉलेजमधून इंटर झाल्यावर नरेश मेहता पुढील शिक्षणासाठी काशीला आले. तिथे केशवप्रसाद मिश्र आणि आचार्य विश्वनाथ प्रसाद मिश्र यांसारख्या शिक्षकांनी त्यांना वैदिक साहित्य आणि परंपरा याविषयी जागृत केले. त्यांनी १९४२च्या स्वातंत्र्यलढय़ात आणि विद्यार्थी आंदोलनातही सहभाग घेतला. मग काही वर्षे कम्युनिस्ट पार्टीचे काम केले. १९४६ मध्ये शिकत असतानाच वाराणसीतून प्रकाशित होणाऱ्या ‘दैनिक आज’ आणि ‘संसार’मध्ये काम केले. काही काळ गांधी प्रतिष्ठानचे काम बघितले आणि नंतर राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे मुख्य साप्ताहिक ‘भारतीय श्रमिक’चे मुख्य संपादक म्हणूनही काम केले. लखनौ आणि नंतर नागपूर आकाशवाणीवर ते कार्यरत होते. पण १९५६ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि केवळ लेखन करायचे ठरवले. हे सोपे नव्हते. पण पत्नी महिमा हिच्या पूर्ण पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कथा, कादंबरी, काव्य, नाटक अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले. १९६१ मध्ये ‘तथापि’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. आठ कथांचा हा संग्रह आहे. यापैकी ‘चांदनी’ ही एका शिक्षित मध्यमवर्गीय कुमारीची कथा आहे. प्रेम सर्वाच्या मनात असते. प्रेमाकर्षण ही मानसिक अवस्था आहे, शारीरिक नाही, हे सांगण्याचा प्रयत्न या कथेत केला आहे. ‘किसका बेटा’ या कथेत स्त्रीशोषण आणि गरिबीमुळे भोगावे लागणारे शोषण चित्रित केले आहे. १९४७च्या फाळणीच्या चटक्यांचे चित्रण करणारी कथा आहे. ‘वह मर्द थी’. अतृप्त कामवासनेमुळे एका स्त्रीच्या झालेल्या मनोदशेचे चित्रण करणारी कथा- ‘तिष्यरक्षिताकी डायरी’. मनामध्ये वासना पण मुखवटा नैतिकतेचा, शिष्टाचाराचा- अशा दोन स्तरांवर जगणाऱ्या माणसाची कथा – ‘दूसरे की पत्नी के पत्र’. स्त्रीच्या घुसमटीचे, अस्वस्थतेचे चित्रण करणारी, प्रेम अव्यक्त न ठेवता, ते व्यक्त करायला हवं हे सांगणारी शीर्षक कथा आहे- ‘तथापि’. थोडक्यात, या पहिल्याच कथासंग्रहातील कथांद्वारे नरेश मेहतांनी स्त्रीजीवनाचे, तिच्या समस्यांचे अनेक अंगांनी मार्मिकपणे चित्रण केले आहे.

१९६५ मध्ये त्यांचा ‘एक समर्पित महिला’ हा पाच कथांचा संग्रह प्रकाशित झाला. त्यातील शीर्षक कथा  ही जन्माने भारतीय पण पाश्चात्त्य संस्कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीची कथा आहे. तर हिन्दी कथेला एक नवी दिशा, नवे सामथ्र्य देणारा त्यांचा एक सर्वोत्तम कथासंग्रह आहे- ‘जलसाघर’

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

 

पेट्रोलचा ऑक्टेन क्रमांक

पेट्रोल या इंधनावर धावणारी वाहने ‘स्पार्क इग्निशन’ तत्त्वावर कार्यरत होतात. द्रवइंधनाचे वायूत रूपांतर होते. या वायूला इंजिनाद्वारे एक ठिणगी मिळाली की, तो वायू छोटेछोटे स्फोट होऊन जळतो आणि इंजिन सुरू होते. हे जे छोटे स्फोट होतात, त्याला ‘नॉकिंग’ म्हणतात. इंजिनातील सिलेंडरमध्ये इंधन जळू लागले की इंजिन हादरते व आवाज येतो. या ‘नॉकिंग’मुळे इंजिनाचे भाग खराब होऊ शकतात. त्याला आवर घालणे गरजेचे असते. पेट्रोलची ही नॉकिंग क्षमता ‘ऑक्टेन क्रमांक’ देऊन मोजली जाते. जेवढा हा क्रमांक मोठा, तेवढी इंधनाची गुणवत्ता चांगली आणि इंजिनाची सुरक्षितता जास्त. ऑक्टेन क्रमांक मोजण्यासाठी ‘कोऑपरेटिव्ह फ्युएल रिसर्च’ (सी.एफ.आर.) हे इंजिन वापरतात.

आयझोऑक्टेन या रासायनिक द्रावणाचा ऑक्टेन क्रमांक १०० समजला जातो, तर नॉर्मल हेप्टेन या दुसऱ्याद्रावणाचा हा क्रमांक शून्य धरला जातो. या दोन रसायनांचे मिश्रण बनवून त्यांच्या नॉकिंग क्षमतेशी इंधनांशी तुलना केली जाते व त्या मिश्रणातील आयझोऑक्टेनचे प्रमाण हा त्या इंधनाचा ऑक्टेन नंबर मानला जातो. उदा. आपल्याकडे ९१ आणि ९७ ऑक्टेन क्रमाकांची पेट्रोल इंधने सर्रासपणे वापरली जातात; म्हणजेच ९१ टक्के व ९७ टक्के आयझोऑक्टेन रसायनाचे नॉर्मल हेप्टेनसोबत होणाऱ्या मिश्रणाइतकीच या इंधंनांची अनुक्रमे नॉकिंग क्षमता असते.

पेट्रोलमध्ये अन्य स्वस्त इंधने नि द्रावणे यांची भेसळ झाली तर त्याचा ऑक्टेन क्रमांक कमी होतो व त्याची कार्यक्षमता कमी होते.

पूर्वी ऑक्टेन क्रमांक वाढीव असावा म्हणून त्यात अल्पप्रमाणात शिसेयुक्त (टेट्राइथाईल लेडसारखी) रसायने वापरली जात. पण इंधन जळताना शिशाची संयुगे वायुरूपातून हवेचे प्रदूषण करतात, असे आढळल्याने, जगभर सुमारे ८० वष्रे वापरत असलेल्या या रसायनावर बंदी आली आणि अनलेडेड पेट्रोल (यू.एल.पी.) उदयास आले.

पुढे ऑक्टेन बूस्टर म्हणून मिथाईल-टर्शरीब्युटाईल-ईथरसारखी सेंद्रिय रसायने वापरली जाऊ लागली;  परंतु त्यातूनही कर्कप्रेरकी रसायने उत्सर्जित होत असल्याचे आढळले.

आता, पेट्रोलची निर्मिती करताना त्यातील सरळ शृंखलायुक्त  संयुगाचे चक्रिय शृंखलायुक्त रसायनात रूपांतर करून ऑक्टेन क्रमांक वाढविला जातो. या प्रक्रियेला ‘हायड्रोकार्बन रिफॉर्मिग’ म्हणतात. यात बेंझीनसारख्या कर्कप्रेरकी चक्रीय सेंद्रिय रसायनाचे इंधनात अत्यल्प प्रमाण राहील; याची दक्षता घ्यावी लागते. बेंझीनचे प्रमाण मोजण्यासाठी गॅस क्रोमेटोग्राफसारखे उपकरण वापरतात.

जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh mehta
First published on: 26-07-2017 at 04:04 IST