पन्नालालजींनी कथा, कादंबरी, कविता, नाटक, आत्मचरित्र अशा विविध साहित्य प्रकारांत विपुल लेखन केले आहे. रामायण, महाभारत व पुराणे यावर आधारित साहित्यामध्येही त्यांनी विपुल लेखन केले आहे.
५०-६० कुटुंब असलेल्या मांडलीसारख्या लहान गावात त्यांचे बालपण गेले. या खेडय़ात ना वीज, ना शिक्षणाची सोय, ना टपाल सेवेची व्यवस्था. या गावात पोस्टमन येतच नव्हता. कारण कुणालाही पत्र येत नसे. सर्व खेडूत निरक्षर. अशा या वातावरणाचा प्रभाव त्यांच्या लेखनावर पडणे स्वाभाविक होते. पुढे ते अहमदाबाद, मुंबईमध्ये आले. पण सुरुवातीचे हे संस्कार त्यांच्या साहित्यात दिसतातच. उजाड व दुर्लक्षित खेडूत जीवनाचा आरसा असणारे व दुसऱ्या बाजूने रामायण, महाभारतासारख्या वाङ्मयातील मूल्याची थोरवी दाखविणारे साहित्य अशा फार मोठय़ा जीवनपटाचे चित्रण त्यांच्या लेखनात दिसते.
ग्रामीण लोकांच्या अज्ञानावर व त्यांच्या दारुण दारिद्रय़ावर आधारित ‘नॅशनल सेव्हिंग्ज’, ‘लख चोरासी’, ‘बापूशो कुतरो’, ‘गवतो’ या त्यांच्या कथा गुजराती साहित्यातील उत्तम प्रतीच्या लघुकथा गणल्या जातात. ‘सुखदु:खना साभी’, ‘तटना राग’ ‘तिलोत्तमा’ हे त्यांचे काही प्रसिद्ध कथासंग्रह ‘वैतरजने काठे’, ‘ढोलीया सा, सीसमनी’ ही त्यांची गाजलेली नाटके आहेत. ‘भांग्याना भैरू’, ‘मानवीनी भवाई’, न घुटके’, ‘यौवन’, ‘सुरभि’, ‘कंकु’, ‘फकिरा’ या त्यांच्या काही कादंबऱ्या प्रसिद्ध असून वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी ‘दुर्गापुराण कथा’ लिहून पूर्ण केली. हे विशेष. एवढय़ासाठी की शेवटी त्यांना प्रकृतीची साथ नव्हती. पोटाच्या विकाराने, क्षयाने ते त्रस्त होते. बहिरेपण आले होते. दृष्टी मंद झाली होती पण लेखनाची ऊर्मी तरुण होती. मनाला जे भावले ते सच्चेपणाने लेखणीद्वारे त्यांनी मांडले.
१९४१ मध्ये त्यांची ‘मळेला जीव’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आणि अफाट गाजली. ही त्यांची एक उत्तम कादंबरी आहे. काजजीव व जीवी या खेडवळ प्रेमिकांची जात वेगळी असल्याने ते लग्न करू शकत नाहीत, अशा या निष्फळ प्रेमाची ही कथा आहे. या कादंबरीचे अन्य भारतीय भाषांत अनुवाद झाले असून, त्यावर निघालेला चित्रपटही लोकप्रिय झाला. ‘पाछले दरवाजे’चे कथानक वेगळेच आहे. ही एक मातृहृदयाची गाथा आहे. आपल्या मुलाला राज्याच्या हितासाठी दत्तक देणाऱ्या कुँवरबाईच्या मन:स्थितीचे चित्रण करणारी ही कादंबरी आहे. दत्तकविधानामुळे परका झालेला पुत्र, त्याला वस्तुस्थितीची जाणीव झाल्यावर, आईच्या तिरडीला खांदा देण्यासाठी मागच्या दाराने घरात प्रवेश करतो. बदलणारी सामाजिक, राजकीय विचारधारा मांडणारी ही एक महत्त्वपूर्ण कादंबरी आहे.अशिक्षित म्हणविणाऱ्या पन्नालालांचे साहित्य आजही वाचकप्रिय आहे. त्यांनी इतर भाषांतील साहित्य बिल्कूल वाचलेले नव्हते. कित्येक वर्षे १२-१३ तास मोलमजुरी केल्याने त्यांच्या हाताला घट्टे पडले होते. पण त्याच हातांनी लेखन करून ग्रामीण जीवनाला, त्यांच्या वेदनेला त्यांनी शब्दरूप दिले. आपल्या मातीशी नाते सांगणाऱ्या लोकभाषेमुळे त्यांची अभिव्यक्ती वाचकांच्या मनाला जाऊन भिडली आहे.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
जमिनीवरून वाहणारे पाणी
जमिनीवरून वाहणारे पाणी ओढे-नाले यांद्वारे नदीत येते आणि शेवटी समुद्राला मिळते. नदीतून वाहणारा प्रवाह, नदीच्या मुखाजवळ वर्षभर मोजून; नदीच्या खोऱ्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा अंदाज बांधता येतो. यामध्ये जमिनीमध्ये मुरून, भूस्तरातून उताराच्या दिशेने वाहून, नदीप्रवाहात मिसळणाऱ्या भूजलाचादेखील अंतर्भाव होतो. म्हणजेच जमिनीवरून वाहणारे पाणी आणि भूजल हे वेगवेगळे नसून, जमिनीवर पडणाऱ्या पाण्याचे दोन घटक आहेत आणि ते एकमेकांत रूपांतरित होत असतात.
बाष्पीभवन या घटकाची मोजणी बाष्पीभवन मापकाद्वारे मोजली जाते. यासाठी धातूचे गोलाकार आकाराचे उथळ भांडे वापरले जाते. बाष्पीभवनामुळे दिवसभरात आलेली तूट ही पूर्वमापित पाणी टाकून दररोज सकाळी आठ वाजता मोजली जाते. बाष्पीभवनाचे एकक इंच वा मिलिमीटर आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने दररोज पडणारा पाऊस आणि होणारे बाष्पीभवन हे फार महत्त्वाचे घटक आहेत. म्हणूनच प्रत्येक गावात किमान एका ठिकाणी, पर्जन्य आणि बाष्पीभवन मोजण्याची सोय असणे गरजेचे आहे.
भारतीय हवामान विभाग आणि राज्याचे कृषी, महसूल, जलसंपदा व वन विभागातर्फे पावसाची मोजणी केली जाते. देशपातळीवर जवळपास गेल्या १०० वर्षांपासून काही ठिकाणच्या नोंदी आहेत. महाराष्ट्रात कृषी विभागाच्या मदतीने २०६५ ठिकाणी स्वयंचलित वेधशाळा स्थापन करण्यात येणार आहेत.
जमिनीवरून वाहणाऱ्या पावसाचे नाते हे पडणाऱ्या पावसाशी असते आणि ते पुढील समीकरणाद्वारे मांडण्यात येते.
अपधाव फ = पर्जन्य ढ – ऱ्हास छ (बाष्पीभवन + झिरपा + अवरोध इ.) नदी-नाल्यांतून वाहणाऱ्या वा तलावात साठणाऱ्या पाण्याची मोजणी करून अपधाव निश्चित करता येते. थायसन पॉलिगॉन पद्धतीने पाणलोटात पडणारा सरासरी पाऊस काढला जातो. अशारितीने अपधाव आणि पर्जन्याचा योग्य त्या समीकरणाद्वारे संबंध जोडला जातो. यालाच फ-फ मॉडेल म्हटले जाते.
पाणलोटाच्या क्षेत्रफळाच्या मदतीने अपधाव पाणी इंच वा मिलिमीटरमध्ये मांडले जाते. अशा रीतीने लहानमोठय़ा पाणलोटांसाठी, अनेक वर्षांच्या पावसाच्या नोंदीवरून अपधावाची श्रेणी (मालिका) निर्माण करण्यात येते. या श्रेणीच्या साहाय्याने वेगवेगळ्या विश्वासार्हतेचा अपधाव ठरवून, तलावाची साठवणक्षमता निश्चित करता येते. या साठवणक्षमतेचे एकक दशलक्ष घनमीटर (द. ल. घ. मी.) वा दशलक्ष घनफूट (द. ल. घ. फू.) असे आहे.
– डॉ. दि. मा. मोरे
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org

