डॉ. निधी पटवर्धन
‘अर्जदास्त अर्जदार बंदगी। बंदेनवाज अलेकं सलामथ। साहेबांचे सेवेसी बंदे शरीराकार. जीवाजी शेखदार। बुधाजी कारकून। प्रगणे शरीराबाद। किल्ले कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालों’, ‘ममताई देशपांडीण इणें तमाम प्रगणा जेरदस्त केला क्रोधाजी नाईकवाडी याणें तमाम तफरका केला.’
हे कोणी अरबी-फारसी लेखकाने लिहिलेले नसून ही संत एकनाथांच्या ‘अर्जदस्त’ मधील वाक्ये आहेत. राजकीय कारणांनी मराठी भाषा फारसी भाषेशी जवळजवळ ४५० वर्षे संबंधित राहिली आणि त्यातूनच फारसी मधील शब्द, काही उपसर्ग, वाक्प्रचार हे मराठीत सामावून गेले. एकनाथांच्या काळात भक्तिपर व वेदान्तपर लेखनात फारसी शब्द फार आले नाहीत पण इतर लेखनात त्यांचे प्रमाण बेसुमार वाढले. जमादार/ शिलेदार/ हवालदार/ सरदार अशा पदव्या ऐकू येऊ लागल्या. सरकारदरबारी फारसी भाषा सुरू झाली. ‘अर्जदारां’च्या फिर्यादींचा ‘काज़ी ’पुढे जाऊन ‘फैसला’ किंवा ‘इन्साफ’ होऊ लागला. पत्रांबद्दल ‘कागद’ आले व त्यांत प्रमाणांसाठी ‘साक्षी’ होत्या त्या ‘गोही’ झाल्या. अधिकाऱ्यांचे ‘मोकादम’ झाले. प्रतिवर्षी मिळणाऱ्या वार्षिक वेतनाबद्दल ‘सालिना मुशाहिरा’ देण्याचा ‘सिलसिला’ सुरू झाला. आता काही फारसी शब्दांना मराठी पर्याय सुचवून पाहू या. जाजम- बैठक पथारी, गैदी- आळशी, नेभळा, हजार- सहस्र, दहादा शंभर, हंगाम- वेळ, सुगी, नग- दागिना, वस्तू, कसाई- खाटिक, खामोश- स्तब्ध, शांत, खुश- आनंदी, खुशामत- तोंडपुजेपणा, छापा- अचानक हल्ला, हवालदिल- घाबरलेला, हरकत- विरोध, अडथळा, विलंब, पागा- घोडशाळा, तंबू- कापडीघर, डेरा, तयार- सिद्ध, दिवाना- वेडा, पिसाट, मूर्ख, जाब- उत्तर, जादू- मंत्रटोणा, इंद्रजाल, चुणी-वळी, घडी, निरी, खस्ता- काळजी/ संकट/ त्रास/ श्रम. साबण हा शब्दही फारसीच (साबून) पण तुकाराम महाराजांच्या ‘नाही निर्मळ जीवन। काय करील साबण।।’ या सुभाषितात तो आलाच आहे की!
अंजीर, बदाम, किसमिस, तुती, कुल्फी या अरबी- फारसी शब्दांना प्रतिशब्द शोधून ते अट्टहासाने रुजवणे, हे काही खरे नाही. साबण, खास, सुरमा, अत्तर (इत्र), सरदार, सरकार, किल्ला हे अरबी- फारसी शब्द मराठीने इतके आपलेसे केले की त्यांना अर्धचंद्र देणे अशक्य! nidheepatwardhan@gmail.com